केज : संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आणि केलेल्या छळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल आणि प्रसार माध्यमांतून प्रसिद्ध झाल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. सर्वत्र त्या घटनेचे निषेध व्यक्त होत असून केज आणि मस्साजोग येथे ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला. यावेळी आंदोलकांनी केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ टायर पेटवून धनंजय मुंडे यांचा निषेध व्यक्त करीत त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना त्यांच्या मारेकऱ्यांनी अत्यंत निर्दयपणे आणि त्यांचे छळ करून मारहाण केली. त्याचे फोटो सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांत प्रसिद्ध झाले. त्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड चीड आणि संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे आज केज आणि मस्साजोग येथे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला.
यावेळी केज शहरात नागरिकांनी रॅली काढून बंद पाळण्याचे आवाहन केले. यावेळी जमावातील तरुणांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर जाळून निषेध केला. यावेळी पोलिसांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणली. तसेच संतोष देशमुख यांचे गाव मस्साजोग येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी मनोज जरांगे, खा. बजरंग सोनवणे, विविध पक्ष व संघटनांचे अनेक पदाधिकारी व नागरिकांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.