प्रवाशांचा प्रवास होणार सुकर
मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) पॉड टॅक्सीच्या धर्तीवर मुंबई महानगर प्रदेशातही (एमएमआर) पॉड टॅक्सी प्रकल्प राबविला जाणार आहे. एमएमआर मधील (MMRDA) मेट्रो स्थानके आसपासच्या विविध परिसराशी, नजीकच्या रेल्वे स्थानकांशी जोडण्यासाठी पॉड टॅक्सीचा पर्याय स्वीकारण्यात आला असतानाच आता रोपवेचाही पर्याय मिळणार आहे. एमएमआर मधील मेट्रो स्थानके रोपवेशी जोडचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. या सल्लागाराच्या नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे.
३३७ किमीचे मेट्रोचे जाळे
एमएमआरडीएच्या (MMRDA) माध्यमातून एमएमआरमध्ये ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे विणले जात आहे. त्यातील काही मार्गिका सध्या वाहतूक सेवेत दाखल केल्या आहेत. काही मार्गिका येत्या काही वर्षांत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. अशात मेट्रो स्थानकांपासून इच्छित स्थळी पोहचणे प्रवाशांना सोयीचे व्हावे आणि मेट्रोकडे प्रवासी आकर्षित व्हावेत यासाठी एमएमआरडीएने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून आता एमएमआर मधील मेट्रो स्थानके नजीकच्या रेल्वे स्थानकासह अन्य परिसराशी पॉड टॅक्सीने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बीकेसीत प्रायोगिक तत्वावर पहिला पॉडटॅक्सी प्रकल्प राबविला जात आहे.
निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम सुरू
त्याच धर्तीवर एमएमआरडीएने (MMRDA) एमएमआरमध्ये पॉड टॅक्सी प्रकल्प राबविला जाणार आहे. तर आता पॉडटॅक्सीबरोबरच मेट्रो स्थानकांना नजीकच्या परिसराशी थेट रोप वे ने जोडण्याचाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली.
अभ्यास करून आराखडा तयार करणार
त्यानुसार एमएमआरमध्ये पॉड टॅक्सीसह रोप वे प्रकल्प राबविण्यासाठी एमएमआरडीएकडून (MMRDA) सविस्तर आराखडा तयार करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. कोणते मेट्रो स्थानक रोपवे द्वारे तर कोणते मेट्रो स्थानक पॉडटॅक्सीद्वारे जोडता येईल याचा अभ्यास करून आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे पॉडटॅक्सी आणि रोपवेचा आराखडा एकत्रितच केला जाणार आहे. त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करावी लागणार असल्याचे म्हणत त्यादृष्टीने निविदा प्रक्रिया राबविण्याचे काम सध्या एमएमआरडीएकडून सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात एमएमआरमध्ये मेट्रोसह रोप वे आणि पॉड टॅक्सीसारख्या सुविधा प्रवाशांचा प्रवास सुकर करण्यास मदत करतील.