मराठवाडा वार्तापत्र : अभयकुमार दांडगे
मराठवाड्यात एकूण आठ जिल्हे आहेत. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर वगळता अन्य सात जिल्ह्यांत उद्योगांची म्हणावी तशी प्रगती नाही. दळणवळणाची साधने असतील तर कुठलाही उद्योग टिकतो. मराठवाड्यातील लातूर व नांदेड जिल्ह्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळाले होते; परंतु या दोन्ही जिल्ह्यातही उद्योगांची पीछेहाटच आहे. आता मराठवाड्यात रोजगार मेळावे भरत आहेत. या मेळाव्यांच्या माध्यमातून कुशल कामगार तर मिळतील, परंतु मराठवाड्यात उद्योग आहेत का हा प्रश्न बेरोजगार व तरुण वर्गाला भेडसावत आहे.
मराठवाड्यात नवनवीन उद्योग आले पाहिजेत व ते टिकले पाहिजेत. या दृष्टीने हालचाली होणे गरजेचे आहे. राजकीय नेत्यांनी मनावर घेतले तर मोठ-मोठे उद्योग मराठवाड्याच्या जमिनीवर सुरू होऊ शकतात; परंतु त्या नेत्यांची उद्योजकांना मनधरणी करण्याची मानसिकता नाही की काय? असा प्रश्न मराठवाड्यातील बेरोजगार व युवा वर्ग उपस्थित करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून मराठवाड्यात सद्यस्थितीला राजकीय नेते रोजगार मिळावे भरवत आहेत. या रोजगार मेळाव्यांचा समाजाला किती फायदा होईल, ही वेगळी बाब असली तरी मराठवाड्यात उद्योग उभारणे व ते टिकविणे मोठे जिकिरीचे काम होऊन बसले आहे. दळण-वळणाच्या सुविधा असतील तर औद्योगिक वसाहतींद्वारे उद्योग टिकतात व वाढतात. यासाठी केवळ शासनाची सकारात्मक भूमिका असून चालणार नाही, त्यासाठी उद्योजकांचे प्रामाणिक प्रयत्न व मागणीप्रमाणे उद्योग असणे गरजेचे आहे. सध्या मराठवाड्याच्या बाबतीत एक आनंद वार्ता कानावर येत आहे. एका उद्योगाच्या निमित्ताने मराठवाड्याचे नशीब पालटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकन इलेक्ट्रिक कार निर्माते यांची कंपनी टेस्ला भारतात प्रवेश करणार आहे. मार्चनंतर कंपनीचे अधिकारी भारताला भेट देणार आहेत. ही कंपनी जगप्रसिद्ध आहे. इलॉन मस्क हे प्रसिद्ध उद्योगपती या कंपनीचे सर्वेसर्वा आहेत. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आणि गुजरात या ठिकाणी यासाठी चाचपणी झाली. टेस्ला कंपनी भारतात किमान पाच अब्ज गुंतवणूक करू शकते. टेस्ला भारतातील वेगवेगळ्या राज्यांत पाहणी करून सकारात्मक शोध घेत आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात आजही मोठ्या उद्योगांची प्रतीक्षा आहे, त्यासाठी छत्रपती संभाजीनगरात ही कंपनी सुरू झाल्यास मराठवाड्याचे भाग्य बदलणार आहे. टेस्ला कंपनीच्या ईव्ही कारचे पार्ट भारतातील आठ कंपन्या पुरवतात. यापैकी तीन कंपन्या छत्रपती संभाजीनगरात आहेत. त्यामुळे टेस्ला कंपनीच्या छत्रपती संभाजीनगरातील गुंतवणुकीला मोठा वाव आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होणार, असे एका कार्यक्रमात बोलले होते. त्यामुळे महाराष्ट्रात हा प्रकल्प सुरू झाला तर, तो छत्रपती संभाजीनगरात सुरू होऊ शकतो. मराठवाड्यात पूर्वी मोठ-मोठे उद्योग होते. हळूहळू या उद्योगांना उतरती कळा लागली, त्यामागील कारणे देखील तशीच आहेत. मोठमोठे कारखाने चालविणे अवघड आहे. मराठवाड्यात हळूहळू का होईना रस्ते चांगले होत आहेत. पाण्याची कमतरता भरून निघाली तर, आणखी उद्योग तग धरू शकतात. मनुष्यबळ पुरेसे आहे. निष्णांत मनुष्यबळ उपलब्ध होणे, हे देखील तसे पाहिले तर, अशक्य नाही. सध्या मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरबरोबर अन्य जिल्ह्यांतही उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण आहे. लातूर व नांदेडच्या बाबतीत बोलावयाचे झाले तर, या दोन्ही जिल्ह्यांच्या नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले; परंतू ते दोघेही नांदेड किंवा लातूरला मोठे उद्योग आणू शकले नाहीत. एकेकाळी नांदेडला असलेली टेक्सकॉम, एनटीसी मिल प्रसिद्ध होती. त्यावेळी मराठवाड्यातून संपूर्ण देशभरात मोठा व्यापार होत होता; परंतु नंतर वेगवेगळ्या कारणांमुळे मराठवाड्यातील उद्योगविश्वाला उतरती कळा लागली. आजही मराठवाड्यात असलेल्या औद्योगिक वसाहतीत अनेक उद्योग बंद अवस्थेत आहेत. अनेक उद्योजकांनी उद्योग सुरू करायचा म्हणून केवळ जमिनी लाटून घेतल्या आहेत. मराठवाड्यात उद्योग न टिकण्यामागे वेगवेगळी कारणे असली तरी खंडणीखोर, अधून-मधून वेगवेगळ्या सण-उत्सवांनिमित्त लाखो रुपयांच्या वर्गण्या मागतात. यामुळे अनेक उद्योजक त्रस्त आहेत. याशिवाय नको त्या कारणाने आरटीई टाकून पैशांची मागणी करणारेही उद्योग पळवून लावत आहेत. कोण्या एका ठिकाणी उद्योग सुरू होणार आहे, असे कळल्यावर केवळ जागा मिळावी या उद्देशातून भूखंड माफिया जागा स्वतःच्या नावावर गुंतवून ठेवतात. उद्योग सुरू करायचा नाही, जागा दडवून ठेवायची. त्या जागेला काही वर्षांनंतर चांगला भाव आला की, ती जागा चढ्या भावाने दुसऱ्याला हस्तांतरीत करायची, या पद्धतीतून अनेक भूखंड माफिया करोडोपती झाले आहेत.
शासनाने अशा भामट्या उद्योजकांना हाकलून लावावे. ज्यांनी ज्यांनी उद्योगाच्या नावाखाली जमिनी लाटल्या; परंतु त्यांनी उद्योग सुरू केले नाहीत, अशा लोकांना औद्योगिक वसाहतीतून बाहेर काढावे. जे खरोखर उद्योग उभारणार आहेत, अशांनाच जमिनी द्याव्यात व उद्योग वाढीसाठी त्यांना सोयी-सवलती देऊन मोठे करावे. तसे पाहिले तर, उद्योग उभारताना जे नियम व अटी घालून दिलेले असतात, ते अनेकदा कागदोपत्री पाळले जातात, प्रत्यक्षात त्या नियमांना नंतर पाहणारे देखील कानाडोळा करतात. या व अशा अनेक कारणांमुळे मराठवाड्यात किंबहुना महाराष्ट्रात उद्योग तग धरत नाहीत. उलट मोठ-मोठे उद्योग गुजरातला पळून गेले, अशी आरोळी ठोकली जाते व त्यावरून मोठे राजकारण केले जाते. गुजरातमध्ये उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण आहे.
एक खिडकी माध्यमातून गुजरातला उद्योग उभारता येतो. तशीच पद्धत महाराष्ट्रात किंबहुना मराठवाड्यात अवलंबविल्यास नक्कीच मराठवाड्याला उद्योगाच्या बाबतीत अच्छे दिन येतील, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. गुजरातमधील मोठमोठे उद्योजक परदेशात स्थायिक झालेत. त्यांनी विदेशात अब्जोवधी रुपयांचा उद्योग उभारला. परदेशात यशस्वी झालेल्या उद्योजकांमध्ये गुजरातमधील उद्योजकांची संख्या जास्त आहे. त्यामागे कारण देखील तसेच आहे. परदेशात उद्योग करत असताना कशाचीही भीती नाही. शासनाकडून परवानग्या लवकर मिळतात. उद्योग उभारायचा असेल तर कोणालाही टेबलाखालून ‘अतिरिक्त’ द्यायची गरज नाही. याशिवाय कुठल्याही प्रकारची भीती नसल्याने करोडो रुपयांचा व्यवहार खुलेआम होतो. तशीच पद्धत महाराष्ट्रात सुरू झाली, तर उद्योग टिकतील व ते वाढतील देखील. असो. नांदेड, बीड, परभणी, लातूर व हिंगोली या भागांत मोठे उद्योग उभारणे गरजेचे आहे. या भागांतील नेत्यांनी उद्योग वाढीसाठी लक्ष द्यावे. सध्या मराठवाड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून रोजगार मेळावे भरविले जात आहेत. त्यामधून तरुण-तरुणींना नोकरी देण्याचे आमिष दाखविले जात आहे. वर्षानुवर्षे राजकारण करणाऱ्या नेत्यांनी कारखाने उभारणीसाठी प्रयत्न केले नाहीत. आता रोजगार मेळावे भरवून केवळ दुधाची भूक ताकावर भागविण्याचा प्रयत्न
चालविला आहे.
केवळ जमिनी लाटणाऱ्यांची शिफारस या नेत्यांनी करू नये. ज्यांना खरोखर उद्योग उभारायचा आहे, त्यांना खरी मदत मिळणे आवश्यक आहे. किमान अशा कामांत तरी राजकारण शिरता कामा नये. मराठवाड्यात एकूण आठ जिल्हे आहेत. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर वगळता अन्य सात जिल्ह्यात कुठलाही मोठा उद्योग नसल्याने मराठवाड्यात बेरोजगारांचा प्रश्न उभा राहिला आहे. तो प्रश्न रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून नव्हे तर उद्योग उभारून तसेच मराठवाड्यातील तरुण वर्गाला हाताला काम देऊन सोडविता येऊ शकतो, याकडे मराठवाड्यातील नेत्यांनी लक्ष देणे अत्यंत
गरजेचे आहे.