दुबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवत भारताने फायनलमध्ये शानदार प्रवेश केला आहे. सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला ४ विकेट राखत हरवले. या विजयासोबतच भारताने २०२३मधील पराभवाचा बदला घेतला. अहमदाबादच्या स्टेडियमवर २०२३मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवत भारतीय चाहत्यांची मने दुखावली होती. हा बदला भारताने घेतला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २६४ धावा केल्या होत्या. भारतासमोर विजयासाठी २६५ धावांचे आव्हान होते. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ठेवलेले २६५ धावांचे आव्हान ४ विकेट राखत पूर्ण केले. हार्दिक पांड्यानेही शेवटी दमदार खेळ करताना भारतासाठी विजयश्री खेचून आणली. त्याआधी विराट कोहलीने विजयाचा पाया रचला होता. यासोबतच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचणारा भारतीय पहिला संघ ठरला आहे.
पाकिस्तानविरुद्ध दमदार खेळी करणाऱ्या विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धही संयमी खेळी केली. विराट कोहलीने ९८ बॉलमध्ये ८४ धावा ठोकल्या. तर श्रेयस अय्यरचे अर्धशतक पाच धावांनी हुकले. त्याने ६२ बॉलमध्ये ४५ धावा केल्या. अय्यर बाद झाल्यानंतर अक्षऱ पटेलने पटापट २७ धावा करत धावसंख्या वाढवली मात्र त्याला अधिक धावा करता आल्या नाहीत. हार्दिक पांड्यानेही आल्यानंतर दमदार खेळीला सुरूवात केली. त्याच्या जबरदस्त खेळीमुळे भारताचा विजय पक्का झाला. त्याने २४ बॉलमध्ये २८ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाचे २६५ धावांचे आव्हान
तत्पूर्वी, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २६४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्हन स्मिथने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. तर अॅलेक्स कॅरेने ६१ धावा ठोकल्या. भारताकडून या सामन्यात मोहम्मद शमीने ३ विकेट घेतल्या. तर वरूण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
पराभवाचा बदला घेतला
१९ नोव्हेंबर २०२३मध्ये भारतीय चाहत्यांच्या डोळ्यात दुखा:चे अश्रू होते. मात्र आता हे आनंदाश्रूमध्ये परतले आहेत. २०२३च्या वर्ल्डकपमध्ये भारताला मिळालेल्या पराभवाचा बदला टीम इंडियाने अखेर घेतला. फायनलच्या त्या जखमेवर आजच्या विजयाने मलम लावले आहे.