झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा महत्वाचा निर्णय
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील (एसआरए – SRA scheme) घरावर यापुढे पति-पत्नी यांच्या संयुक्त नावाची नोंद होणार आहे. याबाबतचा निर्णय मुंबई महानगरप्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत घेण्यात आला आहे.
महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी त्यांना पतिच्या मालमत्तेमध्ये हक्क देणे ही मुलभूत गरज आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पति-पत्नी यांना एकरूप एक घटक मानला जातो व प्राप्त संपत्ती दोघांची असल्याचे मानले जाते. त्यामुळे स्त्रियांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी त्यांच्या राहत्या घराची नोंद पति-पत्नी दोघांच्या नावे असणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा पतिच्या निधनानंतर पतिच्या मालमत्तेमध्ये हक्क प्रस्थापित करताना महिलांना अनेक कायदेशिर अडचणींना सामोरे जावे लागते. जर आधीच पति-पत्नीचे हक्क झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या परिशिष्ट-।। मध्ये असेल तर अशा अडचणी येणार नाहीत. यासाठी सुरूवात म्हणून पुर्नविकासानंतर मिळणारे घर हे पति आणि पत्नीच्या संयुक्त नावे करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेत प्राधिकरणाने आता संयुक्त मालकीवर शिक्कामोर्तब केला आहे.
Dhananjay Munde : “धनंजय मुंडेंनी यापूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता”- पंकजा मुंडे
झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या महिलांच्या सबलीकरणासाठी मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने अतिशय महत्त्व पुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर निर्णयासंदर्भात परिपत्रक काढत प्राधिकरणाने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील झोपडपट्टीवासियांसाठी पुर्नविकासाअंतर्गत हा निर्णय लागू केला आहे.
प्राधिकरणाच्या या नव्या निर्देशानंतर सक्षम प्राधिकारी यांनी योजनेचे परिशिष्ट-2 निर्गमित करताना पति-पत्नी यांचे संयुक्त नावाने निर्गमित करावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. परिशिष्ट-2 प्रमाणे पुनर्वसन इमारतीमध्ये सदनिका वितरित करतेवेळी सदनिका वाटपपत्रावर पति-पत्नी दोघांचे नाव नोंद करून सदनिका वितरीत करण्यात यावी. याव्यतिरिक्त सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक यांनीही मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या पुनर्वसन योजनेतील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थेस सदनिकाधारकांना भाग दाखला तसेच सदस्यत्व देते वेळी पतिसह पत्नीच्या नावाची “संयुक्त सभासद” म्हणून नोंद घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.