सेवाव्रती : शिबानी जोशी
अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया येथे हजारो भारतीय तरुण नोकरीच्या, शिक्षणाच्या निमित्ताने गेले काही वर्षे जात आहेत. शिक्षण घेतल्यावर किंवा नोकरीत असताना ते तिथेच स्थायिक होतात; परंतु जपानमध्ये मात्र तुलनेने भारतीयांचे जाण्याचे प्रमाण कमी आहे. जपानी भाषा थोडेशी शिकायला कठीणही असते. जपान हा देश तसा तुलनेने छोटा आहे. त्याशिवाय तिथले लोक अत्यंत कष्टाळू मानले जातात; परंतु याच उगवत्या सूर्याचा देश असे म्हणत असलेल्या जपानमध्ये योगेंद्र पुराणिक आणि त्यांच्या मातोश्री यांनी स्वतःची दोन हॉटेल सुरू करून ते उद्योजक झाले आहेत हे ऐकून आपल्याला आश्चर्य मिश्रित आनंद होईल.
योगेंद्र पुराणिक यांचा जन्म अंबरनाथचा. तिथून शिक्षणासाठी पुण्याला गेले असताना ते जपानी भाषा शिकते होते, तेव्हा १९९६ साली आणि पुन्हा १९९९ साली त्यांना जपान सरकारची शिष्यवृत्ती मिळाली त्यामुळे जपानला जाण्याची त्यांना संधी मिळाली. त्यांना जपानमध्येच नोकरीची संधी मिळाली आणि सुरुवातीला आयटी कंपन्यानंतर बँक अशा त्यांनी नोकरी केल्या. तिथेच जाणवले की, भारतीयांना भारतीय खाणे पुरवण्याची गरज आहे; म्हणून त्यांनी सुरुवातीला एक घरगुती रेस्टॉरंट सुरू केले. त्यावेळी एक गोष्ट घडली. २०१२ साली त्यांची आई त्यांना भेटायला गेली त्यावेळी त्यांना व त्यांच्या मुलाला ताप आला आणि ते दोघे निजून होते. ते आपल्या मुलाला पैसे द्यायचे आणि बाहेरून काही तरी जेवण आण असे सांगायचे आणि तो नान आणि बटर चिकन घेऊन खायचा. त्यावेळी असे लक्षात आले की, अरे घरगुती जेवणाची काही सोय इथे होऊ शकत नाही का? त्यातूनच मग महाराष्ट्रीय घरगुती पदार्थ बनवण्याचं सुचले आणि लगेचच दोन महिन्यांत त्यांनी कंपनी सुरू केली. जपानी भाषा येत असल्यामुळे आयटीचा अनुभव असल्यामुळे सर्व परवानग्या त्यांनी ऑनलाइन मिळवल्या. तुम्हाला भाषा येत होती, पण एखाद्या भारतीयाला तिथे कंपनी स्थापन करायची असेल, तर काय त्रास होऊ शकतो? असे विचारले असता ते म्हणाले, इथे फसवा फसवी, वेळ काढूपणा अजिबात नसतो. एखाद्या छोट्याशा कंपनीला तुम्ही हे काम दिले तरी ते सांगितलेल्या पैशांमध्ये व्यवस्थित करून देतात.
नोकरी करत असतानाच त्यांना सुरुवातीपासूनच समाजकार्याची आवड असल्यामुळे सोशल वर्क सुरू केले होते. जपानमध्ये येणाऱ्या मराठी मुलांना सहकार्य करणे, तिथले नियम, इतर उपलब्धता यांची माहिती देणे असे कार्य ते करू लागले होते. सुरुवातीला आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर, त्यांनी बँकिंग क्षेत्रात प्रवेश केला. पुराणिक यांचा राजकीय प्रवास हळूहळू सक्रियपणे सुरू झाला, ते राहत असलेल्या निशिकासाईमधील भारतीय आणि जपानी रहिवाशांमधील समस्या सोडवल्या. २०११ मध्ये ग्रेट ईस्ट जपान भूकंपाच्या वेळी त्यांच्या प्रयत्नांमुळे समुदाय नेते म्हणून त्यांची प्रतिष्ठा आणखी मजबूत झाली. त्यानंतर त्यांनी जपानला आमदार पदाची निवडणूक लढली आणि ते जिंकलेही त्यानंतर जपान सरकारने त्यांच्यावर शिक्षण क्षेत्रातल्या जबाबदाऱ्या टाकल्या त्याही ते समर्थपणे पेलत आहेत. योगी यांच्या आई रेखा शरद पुराणिक या वयाच्या ५७व्या वर्षी मुलाकडे जपानला गेल्या. जपानी भाषा शिकल्या. आज त्या ६७ वर्षांच्या आहेत. ‘इंडियन होम फूड रेखा’ या नावाने आता त्यांची रेस्टॉरंट आहेत. त्यांच्या एका रेस्टॉरन्टमध्ये फक्त मराठी खाद्यपदार्थ मिळतात. दोन्ही रेस्टॉरंटना चांगला प्रतिसाद मिळतो असे योगेंद्र पुराणिक सांगतात.
पुराणिक हे जपानमध्ये स्थायिक असून ते टोकियो येथील येदोगावा या मतदारसंघातील आमदार (खुगिकाईगीइन) म्हणून २०१९ मध्ये निवडून आले आहेत. भारतीय वंशाचे ते एकमेव आमदार आहेत. आता ते जपानमधील शिक्षण विभागात पहिले-वहिले भारतीय मुळाचे सनदी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते जपानमधील एका सरकारी शाळेचे पहिले-वहिले परकीय मूळाचे प्राध्यापक ही ठरले आहेत. जपानमध्ये जाऊन उद्योग सुरू केलेल्या योगेंद्र पुराणिक यांच्याशी बोलत असल्यामुळे मी त्यांना जपानच्या एकूणच वातावरणाबद्दल विचारले. ते म्हणाले, फॉरेनला राहतो म्हणजे तो यशस्वी आणि पैसेवाला असणार असा सर्वांचा समज असतो, पण तसं नाही तिथेही खूप मेहनत घ्यावी लागते. त्यांनी राजकारणात जायचे ठरवल्यानंतर ते पहिल्याच खेपेत आमदार झाले. तिथले राजकारण कसे असते? असे विचारले असता ते म्हणाले की, मी थोडीफार मदत करतो पाहिल्यावर ते राहत होते त्या एरियामध्ये कमिटीत त्यांना घेतले गेले त्यामुळे त्या भागातले प्रश्न सोडवण्याची संधी त्यांना मिळाली. मग हळूहळू त्यांनी जपानी भाषेचे क्लास सुरू केले. इंडियन कल्चरल सेंटर स्थापन केले. त्या ठिकाणी योगा क्लास, हिंदी संस्कृतचे क्लास बाहेरून आलेल्या भारतीय कलाकारांचे कार्यक्रम ठरवणे असे काम सुरू केले त्यामुळे भारतीय लोकांमध्ये ते प्रसिद्ध झाले. आतापर्यंत त्यांनी १७० लाईव्ह शोज त्यांच्या सेंटरमध्ये आयोजित केले आहेत. जपानमधले राजकारण फेअर आणि ट्रान्सपरंट असते. तसेच त्यांचे नियम हे खूप काटेकोर असतात. म्हणजे किती वेळ प्रचार करायचा, कसा करायचा याची नियमावली असते आणि ती पाळली जाते. ते सर्व करून योगेंद्र पुराणिक हे तिथले आमदारही झाले. त्यांचा तो कार्यकाळ आता संपला आहे; परंतु राजकारण, समाजकारण, व्यवसाय हे सर्व जपानमध्ये त्यांनी केले. त्या सर्व ठिकाणी ते यशस्वी झाले. आता तर ते टोकियो शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारत आहेत.
त्यामुळेच भारतातल्या तरुणांना जपानमधल्या संधीबद्दल तुम्ही काय सांगाल असे विचारले असता ते म्हणाले की, जपानमध्ये अफाट संधी आहेत. एक तर त्यांची लोकसंख्या कमी होत चालली आहे. काम खूप आहे आणि जो प्रामाणिकपणे आणि मेहनती आहे त्याला जपान हे एक यशाचे द्वार आहे असे म्हणायला हरकत नाही. जपानमध्ये १०२ वर्षांचा वृद्ध मनुष्यही काम करतो त्यामुळे कष्टाळू, मेहनती, प्रामाणिक माणसांना तिथे स्थान आहे. नोकरी व्यवसाय तसेच उच्च शिक्षणाच्या संधी खूप आहेत. शिवाय जपानमधील स्टँडर्ड ऑफ लिविंग सुद्धा हाय आहे. भौतिक सुख समृद्धीत माणूस राहू शकतो. उद्योग सुरू करायचा असेल, तर सर्व परवानग्या मिळणे त्यामानाने सोपे आहे. त्यामुळे तरुणांनी जरूर जपान देशाचा विचार करावा.