अबू आझमींच्या वक्तव्यावर संतापलेल्या नवनीत राणा यांची मागणी
अमरावती : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी औरंगजेब क्रूर प्रशासक नव्हता, असे विधान केल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया देत एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये नवनीत राणा यांनी अबू आझमींना छावा चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला आहे. त्या म्हणाल्या की, इतिहास आणि चित्रपटातून स्पष्ट होते की, औरंगजेब हा क्रूर शासक होता. छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार करणारा आणि त्यांच्या डोळ्यांत सळई टाकणारा तो औरंगजेबच होता. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने औरंगजेबचे समर्थन करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नवनीत राणा यांनी औरंगजेबाच्या कबरीबाबतही तीव्र भूमिका घेत, ती खुलताबादमधून उखडून फेकावी, अशी विनंती सरकारला केली आहे. हिंदू हिताचे समर्थन न करणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही, असे मत व्यक्त करत, महायुतीचे सरकार औरंगजेबाची कबर उखडून फेकणार तर आहेच, पण ज्यांना औरंगजेबावर प्रेम आहे, त्यांनी आपल्या घरी ती कबर न्यावी, अशा शब्दात नवनीत राणा यांनी संताप व्यक्त केला आहे. महायुती सरकार याबाबत लवकरच कठोर निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.