मुंबई : आगामी २३ मार्चपासून आयपीएलच्या नव्या हंगामाला सुरुवात होणार आहे.याआधीच सर्व संघांनी आपल्या संघाचे कर्णधार जाहीर केले आहे. आता कोलकाता संघाने आपला कर्णधार जाहीर केला आहे. मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे याच्याकडे कोलकाता संघाने कर्णधारपद देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यंदाच्या हंगामात अजिंक्य रहाणे कोलकाता संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल.
गत हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता संघाने विजेतेपद मिळवले होते. परंतु यंदाच्या साली झालेल्या लिलावात कोलकात्याने श्रेयस अय्यरला संघातून मुक्त केले. त्याच्याजागी कोलकाता संघाने रहाणेला मूळ किंमतीवर खरेदी करून त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत अजिंक्य रहाणे राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. मागील हंगामात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाकडून तो खेळत होता. यावेळी चेन्नईने त्याला संघात कायम ठेवले नव्हते. अशावेळी आयपीएल २०२५ च्या लिलावात, कोलकाता संघाने रहाणेला केवळ मूळ किंमतीवर (बेस प्राईज) खरेदी केले. त्याची मूळ किंमत १.५० कोटी रुपये होती.
३६ वर्षीय अजिंक्य रहाणेने आतापर्यंत आयपीएलमध्ये १८५ सामने खेळले आहेत. त्याने ३०.१४ च्या सरासरीने ४६४२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १२३.४२ होता. आयपीएलमध्ये त्याने २ शतके आणि ३० अर्धशतके केली आहेत.आता अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली कोलकाता संघ कशा प्रकारे आपली कामगिरी करतो हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे.