प्रसूतीवेळी जोखमीच्या सिझरिंगनंतर आई सुखरूप
ठाणे : बाळंतपणासाठी खासगी प्रसूतिगृहात खर्च झाला तरी चालेल; परंतु सरकारी रुग्णालयातील प्रसूतिगृहात बाळंतपण नको ही भूमिका अनेकांची असते… मात्र याला सिव्हिल रुग्णालय अपवाद ठरत आहे.
रुग्णालयातील अद्ययावत प्रसूतिगृहात अत्यंत जोखमीच्या प्रसूती पार पडत असून, नुकतेच एका महिलेने तीन बाळांना जन्म दिला आहे. आई आणि तिन्ही बाळ सुखरूप असून मंगळवारी त्यांना घरी पाठवण्यात आले.
ठाणे जिल्ह्यात बाळंतपणासाठी सिव्हील रुग्णालयातील प्रसुतिगृह आई आणि बाळासाठी वरदान ठरत आहे. रुग्णालयातील प्रसूतिगृह अद्ययावत असून, प्रसूतिसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला उपचारासाठी येत आहेत. प्रसूतिगृहात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसुतिगृहात एका महिलेने तीन बाळांना जन्म दिला असल्याची माहिती बालरोगतज्ज्ञ डॉ. सुरेश वानखेडे यांनी दिली.
मुंब्र्यात रहाणाऱ्या एका २० वर्षीय महिलेला १८ फेब्रुवारी रोजी प्रसूतिगृहात सिझरींगनंतर तीन बाळांना जन्म दिला आहे. यामध्ये दोन मुल एक मुलगी आहे. बाळांची प्रकृती उत्तम असून वजन अनुक्रमे पहिले एक किलो ६०० ग्रॅम, दुसरे एक किलो ८०० तर एक किलो ५०० ग्रॅम आहे. त्यांच्या आईची प्रकृती ठणठणीत आहे. रुग्णालयात केलेल्या योग्य उपचारानंतर आई आणि बाळांना मंगळवारी घरी पाठवण्यात आले.
प्रसूतिच्या वेळी बालरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश वानखेडे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्रेया शेळके, भुलतज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे, डॉ.रूपाली यादव, डॉ. प्रकाश बोरुळकर, डॉ. शैलेश गोपनपल्लीकर, डॉ. राहुल गुरव, डॉ. सिद्धार्थ शहा, एसएनसीयू परिचारिका सारिका शेणेकर, शीतल जठार आदी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.
सोनोग्राफी रिपोर्टनुसार समजले की, या महिलेच्या पोटात तीन बाळ आहेत. हे समजताच खूप आनंद झाला होता. यानंतर महिलेने दिलेल्या सर्व सूचना व पथ्य पाळून वेळोवेळी तपासणी केली. तीन बाळ एकत्रित सांभाळताना मोठी जबाबदारी आमच्यावर असते. मात्र अस असले तरी, एसएनसीयूमधील आमचे बालरोग तज्ज्ञ, वैद्यकिय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफ आई आणि बाळाची आपुलकीने काळजी घेत असतात. – डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे,)