अल्पेश म्हात्रे
असं म्हणतात की, एखादी गोष्ट घडण्यासाठी काहीतरी निमित्त लागते. तसेच सध्या काहीतरी घडत आहे. गेल्या आठवड्यात सर्वाधिक चर्चेत राहिलेली गोष्ट म्हणजे आणि पुण्यातील बलात्काराची घटना. या घटनेने सध्या पुणेच हादरलेले नसून, तर देशच हादरलेला आहे. बलात्कार म्हटले, तर ही काही नवीन गोष्ट नाही रोज वर्तमानपत्रात कानाकोपरा नजर टाकली तरी त्यात असंख्य बलात्काराच्या घटना दिसतील. मात्र त्यातल्या काही घटना चर्चेला येतात. स्वारगेटमधील बलात्कार हासुद्धा हा याच चर्चेतील वर्गातला. भर गर्दीत, वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या व एका कोपऱ्यात एकांतात झालेला हा बलात्कार. या बद्दल सर्वांच्याच मनात चीड उत्पन्न झाली नसती तर नवल. त्यामुळे पुण्याचाच नव्हे तर महाराष्ट्राच्याच प्रतिमेला एक डाग निर्माण झाला मात्र वर म्हंटल्याप्रमाणे कोणती घटना घडण्यासाठी कोणते तरी निमित्त लागते. बलात्कार झाला ही दुर्दैवाची गोष्ट आहेच; परंतु त्यानिमित्ताने आपल्या समाज मनाची एसटी प्रशासनाची पोलिसांची सर्वांची झाडाझडती घेण्याची वेळ आली हे नसे का थोडके, त्यामुळे या बलात्कार प्रकरणाचा निकाल लागेल तो लागेलच मात्र त्यानिमित्ताने एसटी प्रशासन पोलीस सर्वांनाच आत्मपरीक्षण करावे लागेल हे नक्की.
स्वारगेट येथील बस स्थानक येथे पहाटेच्या सुमारास फलटणकडे जाणाऱ्या मुलीवर बस स्थानक परिसरात उभ्या असणाऱ्या जुन्या शिवशाही बसमध्ये एकाने बलात्कार केला ही गोष्ट ज्या वेळेस उजेडात आली तेव्हा साधारण आठ वाजले होते. स्वारगेटसारखे वर्दळीचे बस स्थानक महाराष्ट्रात दुसरे कोणते नसेल. पुण्यातील स्वारगेट येथूनच सातारा, कोल्हापूर, कोकण, मुंबई, सोलापूर, मराठवाडा, तसेच फलटण, पंढरपूर सारख्या ठिकाणांसाठी व तिथून येणाऱ्या जाणाऱ्या बस गाड्या अक्षरशः २४ तास सुटत असतात अशात अशा वेळेस बलात्कार घटना होणे म्हणजे अशक्यच अशी गोष्ट होती असा तर्क लावला गेला. मात्र यात स्वारगेट परिसरात बस स्थानकात एका कोपऱ्यात झालेला जुन्या बसचा भंगार खाना तसेच सुरक्षिततेत चाललेली हयगय पाहता एसटी महामंडळाच्या कामांची झाडा -झडती घेणे क्रमप्राप्त झाले. ही घटना घडली तेव्हा कशी घडली तसेच हा स्वखुशीचा मामला होता की, केलेली जोर जबरदस्ती होती याचा कायद्यानुसार निकाल लागेलच मात्र त्या अानुषंगाने एसटी महामंडळाच्या दुर्लक्षित केलेल्या कामांचे धांधोळा ही आवश्यक ठरतो.
मुंबई पुरता विचार केला तर मुंबई शहरासाठी एसटीचे तीन मोठे बस आगार आहेत. मुंबई सेंट्रल आगार. परळ आगार व कुर्ला नेहरू नगर आगार, तर दादर पुलाखाली एक छोटी जागा बस सुटण्यासाठी दिलेली आहे. पश्चिम उपनगरात बोरिवली येथे एसटीचे मोठे बस स्थानक आहे मात्र त्याला आगाराचा दर्जा नाही. त्यामुळे बोरिवली नॅन्सी वसाहत येथील बस स्थानक व स्टेशनजवळील सुकुरवाडी बस स्थानक हीच काय ती एसटीचे स्थानके मात्र यांची तरी काय अवस्था आहे? वास्तविक पाहता एसटीची बस स्थानके ही वेगळा संशोधनाचा व अभ्यासाचा विषय आहेत, मात्र आता स्वारगेट घटनेमधून यावर सर्वत्र जोरदार चर्चा होईल थोडे दिवस त्याचे पालन केले जाईल मात्र नंतर पूर्वीसारखीच अवस्था होईल. मुंबई सेंट्रल येथील बसस्थानकाची तीच अवस्था त्यात असंख्य जाणारे मार्ग. त्यात चोर वाटा फार, कोण कोणता अगंतुक येतो याचा कोणालाही पत्ता नाही. पूर्वी मुंबई सेंट्रल बस स्थानकात बाहेरील कोणत्याही प्रवेश करणाऱ्या व्यक्तीस एक रुपया दर आकारला जात असे मात्र कालांतराने तोही बंद करण्यात आला. परळची अवस्था ही तीच तर कुर्ला नेहरूनगर बस स्थानकाचे, तर विचारायलाच नको कुर्ला नेहरूनगर बस आगार आहे की, आरटीओचा जुन्या व पकडून आणलेल्या गाड्या एकीकडचा भंगार गोळा करून त्याचे डोंगरच्या डोंगर थर तेथील आगारात तयार केले गेले आहेत त्यात असंख्य बेकायदेशीर कृत्य करण्याचे कुर्ला तर आत्ताच जणू बनलेला आहे. मध्यंतरी तेथे आरटीओचे केंद्र तयार होणार होते मात्र तेही रेंगाळले त्यामुळे पुन्हा ही जागा ओसाड बनू लागली असून आजूबाजूच्या झोपडपट्ट्यातील वाईट प्रवृत्ती आगाराच्या भिंत तोडून बोगदे तयार करतात आणि नवनव्या वाटा निर्माण केल्या जातात. येथील सुरक्षारक्षकांकडे त्यांना पळवले जाते मात्र त्याच्यावरही काही मर्यादा पडतात.
काही समाजसेवी संस्था तसेच एसटी प्रेमी संस्था एसटी लवर्स ग्रुप असे महाराष्ट्रातील काही मंडळी वारंवार एसटीकडे सुरक्षेबाबत तक्रार करीत असतात त्यात मुंबईतील तसेच राज्य राज्यातील बस स्थानकांवर तेथील त्रुटी निदर्शनास आणून देत असतात स्वारगेट बस स्थानकातील बंद पडलेल्या बसेस गैरप्रवृत्तींचा अड्डा बनत चाललेल्या आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले होते मात्र नेहमीप्रमाणे एसटी महामंडळ आणि संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्याचीच परिणीती म्हणून त्या दिवशीची ही घटना समोर आली आणि नाव मात्र एसटी महामंडळाचे जनमानसात डागाळले. मुळात बस स्थानक हे बस स्थानकच असले पाहिजे त्यात स्क्रॅप व वस्तीच्या व इतर ठिकाणांवरून येणाऱ्या गाड्या नको तसेच एसटी बस स्थानकातील बस गाड्यांचे पार्किंग नको याकडे असंख्य वेळा लक्ष वेधण्यात आले होते. बस गाड्या ह्या आगारातच उभ्या केल्या पाहिजेत बस स्थानकात नको मात्र आज इतर ठिकाणावरून आलेल्या बस गाड्या या सर्व बस स्थानकात उभ्या केल्या जातात. तसेच या बस गाड्यांना कोणतीही लॉक सिस्टीम नसल्याने यामध्ये गैरप्रकार चालतात. तसेच प्रत्येक बस स्थानकात बाजारात चांगल्या प्रतीचे उच्च क्षमतेची दिवे लावावे ज्यामुळे संपूर्ण ठिकाणी सूर्यप्रकाश चांगला पडून गैरकृत्य होणार नाही याकडेही लक्ष वेधण्यात आले होते, मात्र त्याकडे महामंडळाने दुर्लक्ष केले. अंधारातच असे गैर प्रकार घडत असतात त्यात पोलिसांची गाडी आली का थातूरमातूर कारवाई होते मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. त्यामुळे महिलांना या अंधारामुळे असंख्य प्रकारचा त्रास सहन करावा लागतो व असुरक्षितता निर्माण होते.
एसटी बस स्थानकात फिरणारे गर्दुल्ले भिकारी तृतीयपंथीयांचा मोठा संशोधनाचा विषय आहे काही गर्दुल्ले भिकाऱ्यांचा वावर हा बस स्थानकात कायमचा असतो त्यात ठाणे खोपट ठाणे सीबीएस तर ठाणे रेल्वे स्थानकातील स्थानक तर परिसरात विचारायलाच नको अशी परिस्थिती आहे. वास्तविक पाहता बस स्थानकात व परिसरात फक्त बस गाड्यांना एन्ट्री असते मात्र सर्रास बस स्थानकातच रिक्षा व इतर खासगी गाड्या पार केलेल्या सर्वत्र आढळून येतात. बस स्थानकातील मुताऱ्यांची तर विचारता सोय नाही आधीच अस्वच्छ असलेल्या या मुताऱ्यात चांगल्या सुसंस्कृत माणसाला त्या ठिकाणी जाणे हे अवघडल्यासारखे वाटू शकते कारण तिथे असलेले समलैंगिक, विकृत प्रकारच्या व्यक्ती त्यांच्या नजरा नको आणणारा हा अनुभव असतो. या एसटी बस स्थानकत परिसरात सर्वांचा संचार असल्याने पाकीटमारी बस प्रवाशांचे सामान्यांच्या चोऱ्या या तर नित्य नियमितपणे सुरू असतात. कल्याण बस स्थानक हे त्याचे चांगले उदाहरण ठरते. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक बस तालुक्यात खासगी एजंटचा सुळसुळाट पाहायला मिळतो अक्षरशः एजंट प्रवाशांना पकडून पकडून घेऊन जीप, रिक्षा, टॅक्सी, लक्झरी यात बसवत असतात हे कोणाच्या आर्थिक देवाण-घेवाणतून घडत असते याचाही सर्व निकाल लागण्याची आज गरज आहे स्वारगेट येथील ती महिला बस स्थानकात बसली असताना आपण बस वाहक असल्याचे सांगत त्या महिलेला त्या बसमध्ये जबरदस्तीने देण्यात आले आज या दलालांवर नियंत्रण आणणार कोण. बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे हे सुद्धा सर्वत्र असले तरी बंद पडलेले असतात. तिथे घटना जेव्हा घडते तेव्हा काहीच हाती लागत नाही आणि आता तर म्हणे प्रत्येक नवीन प्रत्येक बस गाडीत सीसीटीव्ही लावण्यात येत आहे जिथे बस गाडीचा हॉर्न व हेड लाईट लावण्यासाठी महामंडळ दुर्लक्ष करत असते ती सीसीटीव्ही कॅमेऱ्याची निगराणी काय ठेवणार. आपल्या बसमधील हरकतींचे पुरावे नको म्हणून बसचालक वाहकच बसमधील सीसीटीव्ही कॅमेरे काढून टाकल्याची उदाहरणे यापूर्वी घडलेली आहेत याचा अर्थ जखम एकीकडे आणि मलमपट्टी दुसरीकडे असाच सर्रास प्रकार असल्याचे दिसत आहे सध्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे चांगले कार्यक्षम दिसत आहे मात्र त्यांनी सुद्धा सध्या फक्त मोक्याच्या भूखंडांकडे जागांकडे लक्ष न देता इतर एसटीतील सर्व पर्यायाचा अभ्यास करून या सुरक्षिततेकडे लक्ष दिले पाहिजे!