अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष ओलोदीमीर झेलेन्सकी यांच्यातील व्हाईट हाऊसमधील खडाजंगीने जग अवाक झाले. या दोघा जागतिक नेत्यांमधील खडाजंगीने अमेरिका आणि युक्रेन यांच्यातील व्यापक असलेली रूंदी अधिकच रूंद झाली. त्याचबरोबर अमेरिका आणि युक्रेन यांच्यातील स्फोटक खडाजंगीने युक्रेनला अधिकच नाजूक क्षणी आणून ठेवले आहे. जी दोन्ही राष्ट्रांना राजनैतिक संधी होती ती आता सार्वजनिक कोसळण्यात रूपांतरित झाली आहे. याचा असा संदेश जगभरात गेला आहे की अमेरिकेचा निःसंदिग्ध पाठिंबा युक्रेनला होता आणि त्यावर अवलंबून राहत युक्रेनची रशियाशी युद्ध करण्यापर्यंत हिंमत वाढली होती तिला आता फटका बसला आहे. त्यामुळे जगाचे नुकसान, तर झालेच आहे पण खास करून युक्रेनचे न भुतो न भविष्यती असे नुकसान झाले आहे. युक्रेनसाठी हे अत्यंत घातक असे वळण आहे आणि युक्रेनला आता अमेरिकेचा पाठिंबा नसल्याने त्याचे हाल कुत्राही खाणार नाही अशी स्थिती आहे. युक्रेनने रशियाच्या आक्रमणाला तीन वर्षे झुंज दिली आहे आणि आता तो एकटा पडला आहे अशी स्थिती तर दिसते. युक्रेनला पाश्चात्य राष्ट्रांनी रशियाविरोधात लाखो डॉलर्सची मदत केली आहे आणि ती कुणीही नाकारत नाही. पण अमेरिकेच्या म्हणजे ट्रम्प यांच्या हट्टग्रहामुळे युक्रेनचे सारे भविष्य संकटात पडले आहे. माजी अमेरिकन अध्यक्ष ज्यो बिडेन हे युक्रेनचे खंबीर पाठीराखे राहिले आहेत. अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रांची आणि गुप्तचर माहितीची मदत केली आहे आणि अजूनही करत आहे. पण ट्रम्प यांनी अत्यंत वेगळा असा पवित्रा घेतला आहे आणि त्यामुळे युक्रेनचे भवितव्य धोक्यात आले आहे.
ट्रम्प यांनी रशियाशी संघर्षाच्या ऐवजी तुष्टीकरणाचे धोरण स्वीकारले आहे आणि ही बाब युक्रेनसाठी धक्कादायक आहे तशीच ती जगासाठीही धक्कादायक आहे. ट्रम्प यांची झेलेन्स्की यांच्याप्रती असलेला पवित्रा म्हणजे अविश्वासाचा आहे आणि अमेरिकेने उलट्या बोंबा मारत आहे की, युक्रेनचे अध्यक्ष चुकीची भूमिका घेत आहेत. त्यांचा अमेरिकेप्रती अनादर आहे आणि त्यामुळे त्यांना शांतता नको आहे, ही युक्रेनची भूमिका नाही. पण अमेरिकेने जगाला असे भासवले आहे की तीच युक्रेनची भूमिका आहे. याचा फटका जगाला बसणार आहे. युरोप युक्रेनच्या संरक्षणासाठी वचनबद्ध आहे हे जागतिक युरोपीय नेत्यांनी दाखवून दिले आहे. फ्रेंच अध्यक्ष आणि इतर अनेक युरोपीय नेत्यांनी अमेरिकेच्या विरोधात युक्रेनला पाठिंबा दिला आहे. पण रशियाच्या आक्रमणाविरोधात युक्रेनला एकात्मिक लढा द्यायचा असेल, तर त्यात अमेरिकन सहभाग हवा आहे. अमेरिकन सहभागाशिवाय हा लढा यशस्वी होऊ शकत नाही हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे अमेरिकेचा सहभाग हवा असेल, तर युक्रेनने थोडी माघार घ्यायला हवी. ट्रम्प यांनी युक्रेनला असलेला पाठिंबा काढून घेतला, तर युक्रेन त्याच्या पेक्षा कितीतरी मोठा असलेला रशियासारख्या बलाढ्य शत्रूशी एकट्याने लढा देण्यास बाध्य होईल आणि त्याचा फटका सर्व जगाला बसेल असे हे त्रांगडे आहे.
ट्रम्प यांचा आग्रह हा आहे की, झेलेन्स्की यांनी रशियन अध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चा करावी. पण त्यामुळे जुन्या इतिहासाकडे दुर्लक्ष केल्यासारखे होईल, कारण रशियाने यापूर्वी युक्रेनकडे सातत्याने दुर्लक्ष आणि युक्रेनची दडपशाहीने दाबादाबी केली आहे त्यामुळे ट्रम्प यांची भूमिका चुकीची आहे आणि ती अमेरिकेच्या हिताचीही नाही. कारण त्यामुळे अमेरिकाच संकटात सापडेल. या युद्धात रशियाचा जय झाला, तर रशियासारख्या एकाधिकारशाही राष्ट्रांचे बळ प्रचंड वाढेल आणि त्याचा फटका बसेल. भारत हा रशियाचा मित्र देश आहे आणि त्यामुळे भारत या युद्धात तटस्ध आहे. भारताने बांगलादेश युद्धात रशियाने भारताची जी मदत केली ती भारत विसरेलेला नाही. त्यामुळे भारताने आतापर्यंत या युद्धात तरी तटस्थ भूमिका घेतली आहे आणि पंतप्रधान मोदी आणि अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांच्यातील सौहार्द्राची भूमिका भारतासाठी अत्यंत मदतीची ठरली आहे. पण अमेरिकेने जगाला विनाशापासून वाचवावे आणि युक्रेनेसारख्या राष्ट्राचा बळी देऊन आपले स्वार्थ पाहू नये असा विचार भारताने केला आहे आणि त्यात काही वावगे नाही. हा केवळ एका भूखंडापुरता प्रश्न नाही, तर जागतिक परिप्रेक्ष्यात लोकशाही जगाची विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. जेव्हा एखादे राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करते तेव्हा त्या राष्ट्राच्या समर्थनार्थ इतरांनी उभे राहायला हवे. हा धडा आतापर्यंत तीन महायुद्धांनी दिला आहे आणि तो रशिया युक्रेन या युद्धातही दिला आहे.
भारत त्यापासून अलिप्त असला तरी भारताला या युद्धाचे फटके बसलेच आहेत. त्यामुळे जगापासून कोणताही देश आज अलिप्त नाही. याचे प्रत्यंतर रशिया युक्रेन युद्धाने आणून दिले आहे. अमेरिकेने आपला पाठिंबा काढून घेतला, तर युक्रेनसारख्या चिमुकल्या राष्ट्राला आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या दुर्बल करेल. त्यामुळे भारतासह सर्व जगाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. कारण एखादे राष्ट्र स्वतः दुर्बल असले की स्वतःच्या शेजाऱ्यांनाही अस्वस्थ करते हे पाकिस्तानने दाखवून दिले आहे. त्याची पुनरावृत्ती होणे जगासाठी दुसरी डोकेदुखी ठरेल. युक्रेन शांत राष्ट्र राहावे आणि रशियाला शहाणपण यावे हीच सदिच्छा आपण करू शकतो. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी वादावादीनंतर झेलेन्स्की यांच्या पदरी निराशा आली असली तरी त्यांनी आशा सोडू नये. कारण उद्याच्या गर्भात पहाटेचा प्रकाश असतो. अमेरिकेने युक्रेनला मदत केली नसती, तर हे युद्ध कधीच संपले नसते असे ट्रम्प यांचे उद्गार झेलेन्स्की यांच्यासाठी अपमानास्पद आहेत आणि त्याचा पुरेपूर मोबदला ट्रम्प यांच्या पदरात टाकला. पण त्यांच्या उद्गारांकडे जागतिक शांततेच्या महान उद्दिष्टांकडे लक्ष ठेवून सर्वांनीच दुर्लक्ष केले पाहिजे.