लातूर : लातूरमधून एक भयानक अपघाताची घटना समोर आली आहे. लातूर-चाकूर मार्गावरील नांदगावपाटीजवळ सोमवारी (दि. ३) दुपारी १.४० च्या सुमारास एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील ३६ प्रवासी जबर जखमी झाले असून ४ ते ५ प्रवासी अंत्यवस्थ झाले आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही अपघातग्रस्त बस अहमदपूरवरून लातूरच्या दिशेने येत होती. नांदगावपाटीजवळ अचानक बाईक बससमोर आली. बाईक चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे एसटीवरील नियंत्रण सुटले आणि बस अनियंत्रित झाली. मुख्य रस्त्यावरून टर्न घेताना हा अपघात झाला. या अपघातात बसमधील ४८ प्रवाशांपैकी ३६ प्रवासी जखमी झाले असून,त्यापैकी, ५ जणांची प्रकृती अंत्यवस्थ आहे. जखमींना तातडीने लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू असून याची माहिती नातेवाईक व कुटुंबीयांना देण्यात आली आहे. या अपघातात दोन प्रवाशांचे हात कोपऱ्यापासून तुटल्याचे देखील समोर आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही.
One Pune Metro Card : ‘वन पुणे मेट्रो कार्ड’ महिलांना फक्त २० रुपयांत!
या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत वाहतूक सुरळीत केली. पोलिस व जिल्हा प्रशासनाने अपघाताची दखल घेत मदत व बचावकार्य सुरू केले. अपघात जेव्हा झाला तेव्हा येथील स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली व जखमींना बसमधून बाहेर काढण्यास मोठी मदत केली आहे. तसेच रुग्णवाहिका व पोलिस प्रशासनाला या घटनेची माहिती देण्यासही स्थानिकांनी मदत केली. त्यामुळे तातडीने बचावकार्य सुरू होण्यास मोठी मदत झाली आहे.