धोकादायक झाडे तुटून पडण्याची शक्यता
मुंबई (प्रतिनिधी): सध्या उष्णतेची लहर वाढल्याने मुंबईतील अनेक झाडांची मुळे सुकली जावून ती तुटली जात आहेत आणि ही झाडे उन्मळून किंवा त्यांच्या फांद्या तुटून पडत असल्याने महापालिकेच्यावतीने आता रस्त्यालगतच्या सर्व झाडांचा सर्वे करण्यात येणार आहे. त्यामुळे या झाडांचा सर्वे करून मुंबईतील धोकादायक झाडे आणि झाडांच्या धोकादायक फांद्या कापण्यासाठी आता प्राधान्यक्रम देण्यात येत आहे.
मुंबईत सध्या २९ लाख ७५ हजार २८३ झाडे असून त्यातील रस्त्याच्याकडेला १ लाख ८५ हजार ३३३ झाडे आहेत. परंतु मागील काही दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे भविष्यात रस्त्यालगतची झाडांची पडझड होण्याची भीती वर्तवली जात असून या सर्व पार्श्वभूमीवर आता महापालिकेच्या सर्व विभागांतील झाडांची पाहणी करून झाडांचे मूळ आणि कूळ शोधून ती झाडे पडून होणारी संभाव्य दुघर्टना टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच दृष्टीकोनातून मुंबईतील झाडांचा सर्वे करण्याचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आले आहे.
महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्या अचानकपणे उन्हाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे आणि याचा परिणामी झाडांच्या मुळांवर होत आहे. उष्णतेची लहर वाढल्याने जमिनीखालील पाण्याचे प्रमाण कमी होवून झाडांची मुळे सुकली जातात आणि हीच मुळे सुकल्याने ती तुटली जावून झाडे कोलमडून पडतात किंवा फांद्या तुटून पडण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे मुंबईतील २४ विभागांमधील प्रत्येक झाड वाचण्याच्या दृष्टीकोनातून सर्वे हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार धोकादायक झाड असेल त्याचे खोडापर्यंत कापणी केली जाणार आहे किंवा एका बाजूला झाडांच्या फांद्या कलंडलेल्या असल्यास त्या फांद्याची छाटणी केली जाईल, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिक्षक जितेंद्र परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला असून उष्णतेची लहर वाढल्याने याचा परिणाम झाडांवर होण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीकोनातून सर्वे करण्याचे निर्देश दिलेले आहे. त्यानुसार या सर्वेमध्ये एखादे झाड धोकादायक किंवा त्यांच्या फांद्या धोकादायक असल्याचे आढळून आल्यास त्या फांद्याची छाटणी तातडीने हाती घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.