राहुरी : अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये सध्या अतिक्रमण काढण्यासाठी चालू केलेल्या मोहिमेत पोलीस प्रशासन रात्रंदिवस मेहनत करताना दिसत आहे. मात्र या मोहिमेंतर्गत काही पोलीस कर्मचारी वैयक्तिक स्वार्थ व वर्दीच्या गैरवापर करतानाही दिसत आहेत.
रविवारी २ मार्च २०२५ रोजी सकाळी साडेदहा ते पावणे अकराच्या सुमारास राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्यावर असणाऱ्या जिजाऊ चौकात घडलेली घटना पाहून त्या परिसरात असणाऱ्या सर्व नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.झाले असे की राहुरी पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेचे काही पोलीस कर्मचारी या चौकात कर्तव्य बजावत असताना या ताफ्यातील काही कर्मचारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करताना दिसले.या परिसरात कर्तव्यावर असणारे वाहतूक शाखेचे कर्मचारी जालिंदर धायगुडे, फुलमाळी, ठोंबरे व इतर पोलीस कर्मचारी हे कर्तव्य बजावत असताना अक्षरशः सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्या धरून त्यांना हाणामारी करताना नागरिकांनी पाहिले.
सर्वसामान्य नागरिकांची गचंडी धरताना आढळले गचंडी धरून त्यांच्याच गाडीवर बसून त्यांना पोलीस स्टेशन किंवा इतरत्र घेऊन जात असताना सर्वसामान्य नागरिकांनी पाहिले.हा सर्व प्रकार एका चौकात घडल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमली. बऱ्याच नागरिकांनी हा प्रकार आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेतला थोडक्यात राहुरी तालुक्यात होत असणारी पोलिसांची दादागिरी याला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आवर घालून दोषी कर्मचाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करणार की या पोलीस कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणार ? अशी चर्चा त्या परिसरात उपस्थित असणाऱ्या नागरिकांमध्ये सुरू होती. यात वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष गणेश पवार यांनी आपल्या भावना आमच्या प्रतिनिधीकडे व्यक्त केल्या.
त्यांनी म्हटले आहे की राहुरी शहरामधून मोठया प्रमाणात अवैध वाहतूक होते. यामध्ये राहुरी -मांजरी, राहुरी -वांबोरी, राहुरी -श्रीरामपूर, राहुरी-शिर्डी,राहुरी-अहिल्यानगर,राहुरी -ताहाराबाद अशी मोठया प्रमाणात राजरोसपणे अवैध वाहतूक चालते या अवैध वाहतूक करणाऱ्या लोकांकडून हे पोलीस कर्मचारी मोठया प्रमाणात माया जमा करत असल्याचा आरोप केला.अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून या हप्तेखोर व सर्वसामांन्याला त्रास देणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.