नवी मुंबई: नवी मुंबई हे दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे शहर असून नवी मुंबईतील अनेक क्षेत्रे वर्दळीची आहेत. या रस्त्यांची नियमित स्वच्छता करण्याप्रमाणेच विशेषत्वाने महामार्ग व दुर्लक्षित ठिकाणे यांची सखोल स्वच्छता करण्याकडे महापालिका आयुक्त . कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष देण्यात येत आहे.
स्वच्छ सर्वेक्षणाच्या सुपर स्वच्छ लीग या विशेष कॅटेगरीत देशातील तीन शहरांमध्ये समाविष्ट असलेल्या नवी मुंबईचा स्वच्छ शहर हा नावलौकिक कायम रहावा यादृष्टीने महानगरपालिका नेहमीच सतर्कतेने कार्यरत असते. याकामी नागरिकांचाही विविध उपक्रमांमध्ये विशेष सहभाग असतो. याच अनुषंगाने डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ निरूपणकार डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या 103 व्या जयंती दिनानिमित्त नवी मुंबई परिसरामध्ये ‘महा स्वच्छता’ अभियानाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार स्वच्छता मोहीमेत व्यापक प्रमाणात लोकसहभाग लाभेल या भूमिकेतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठही विभागांत रस्त्यांच्या दुतर्फा स्वच्छता मोहीमेचे नियोजन करण्यात आले.
स्वच्छताविषयक उपक्रमांनी प्रेरित झालेल्या 3050 हून अधिक श्रीसदस्य नागरिकांनी नवी मुंबईतील अंतर्गत रस्त्यांची साफसफाई करुन यशस्वीरित्या मोहीम राबवली. या महा स्वच्छता मोहीमेचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले होते. वाशी, नेरूळ, बेलापूर, कोपरखैरणे, ऐरोली, या विभाग कार्यालयांच्या हद्दीत येणा-या सर्व अंतर्गत रस्त्यांच्या स्वच्छता मोहीमेत डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य यांना अंतर्गत रस्त्यावरील क्षेत्र वाटप करून देण्यात आले होते. या मोहिमेत बेलापूर विभाग अंतर्गत सहा ठिकाणी 14 कि.मी क्षेत्रफळात 193 श्रीसदस्यांनी 644 किलो कचरा एकत्रित केला. नेरूळ विभाग अंतर्गत तेरा ठिकाणी 16.10 कि.मी क्षेत्रफळात 801 श्रीसदस्यांनी 3119 किलो कचरा एकत्रित केला. वाशी व तुर्भे विभाग अंतर्गत अठरा ठिकाणी 25.60 कि.मी क्षेत्रफळात 605 श्रीसदस्यांनी 2629 किलो कचरा एकत्रित केला. कोपरखैरणे विभाग अंतर्गत 12 ठिकाणी 18.20 कि.मी क्षेत्रफळात 697 श्रीसदस्यांनी 1653 किलो कचरा एकत्रित केला. घणसोली ते दिघा विभाग अंतर्गत 23 ठिकाणी 46.15 कि.मी क्षेत्रफळात 753 श्रीसदस्यांनी 2947.50 किलो कचरा संकलित केला. अशाप्रकारे एकूण 3049 श्रीसदस्यांनी 10992.30 किलो कचरा एकत्रित करण्यात आला.