दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात वरुण चक्रवर्तीनं जोरदार कामगिरी केली. २५० धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धात ५ विकेट्स घेत वरुणने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पदार्पणाच्या खास विक्रमाला गवसणी घातली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात वरूण चक्रवर्ती हा पाच विकेट्स घेणारा भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. दुबईच्या मैदानात रंगलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात वरुण चक्रवर्तीनं १० षटकात ४२ धावा खर्च करताना पाच फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. यात सलमावीर विल यंग त्याची पहिली शिकार ठरला. त्याच्याशिवाय ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर आणि मॅट हेन्री यांची त्याने शिकार केल्याचे पाहायला मिळाले.
A Five Star Performance 🖐️ Varun Chakaravarthy with five wickets for the night 🥳 Updates ▶️ https://t.co/Ba4AY30p5i#TeamIndia | #NZvIND | #ChampionsTrophy | @chakaravarthy29 pic.twitter.com/CqIuZNNlQt
— BCCI (@BCCI) March 2, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या एका सामन्यात पाच विकेट्स घेत वरुण चक्रवर्तीने भारताचा तिसरा गोलंदाज होण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. याआधी रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी या दोघांनी अशी कामगिरी करून दाखवली होती. यंदाच्या हंगामात मोहम्मद शमी पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळत आहे. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात शमीनं १० षटकांच्या कोट्यात ५३ धावा खर्च करत ५ विकेट्स घेतल्या होत्या. रवींद्र जडेजा हा भारताकडून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाच विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज आहे. त्याने २०१३ च्या हंगामात वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात 'पंजा' मारला होता. या सामन्यात जड्डूनं १० षटकांच्या कोट्यात फक्त ३६ धावा खर्च करताना अर्धा कॅरेबियन संघ तंबूत धाडला होता.






