मुंबई : सर्व नातेवाईक आपल्या बहिणीचेच लाड करतात. याचा राग डोक्यात घालून एका अल्पवयीन मुलाने स्वतःच्या ५ वर्षीय बहिणीचा गळा दाबून डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केली. नालासोपाऱ्यात घडलेला हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ या ओळीला भाऊ बहिणीचं नातं छान शोभतं. भावंडांच्या नात्यात कितीही भांडण झाली तरी पुन्हा काही वेळाने गट्टी जमतेच. मात्र नालासोपाऱ्यात एका अल्पवयीन मुलाने आपल्या बहिणीचा जीव घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री राम नगर परिसरात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलाने सर्व नातेवाईक आपल्या बहिणीचेच लाड करतात हा राग डोक्यात घालून स्वतःच्या ५ वर्षीय बहिणीला डोंगरावर नेले तिथेच त्याने बहिणीचा गळा दाबून डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. मृत मुलगी खूप वेळ घरात दिसत नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. मात्र मुलगी न सापडल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तपास केला असता मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना डोंगरावर मुलीचा मृतदेह आढळला. मात्र या चिमुकलीची कोणी आणि कशासाठी हत्या केली असेल याबद्दलचा काहीच पुरावा सापडत नव्हता.
अखेर ही चिमुकली शेवटची आरोपीसोबत दिसून आल्याने पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची कसून चौकशी केली. पोलिसांनी दिलेला दम, सतत विचारण्यात आलेल्या प्रश्नांसमोर या मुलाचा संयम सुटला आणि त्याने स्वतःच तिची हत्या केल्याची कबुली दिली. दरम्यान पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.