कथा – प्रा. देवबा पाटील
सेवानिवृत्त वैज्ञानिक आनंदराव व त्यांचा नातू स्वरूप हे दोघेही दररोज सकाळी नियमितपणे फिरायला जायचे. ‘‘तुला रंगीत धुराविषयी काही माहिती आहे क?’’ आजोबांनी विचारले.
‘‘नाही आजोबा. सांगा ना मला रंगीत धुराविषयी माहिती?’’
स्वरूप म्हणाला.
‘‘तुझी जिज्ञासा बघून मला खरोखरच आनंद होत आहे.’’ आजोबा म्हणाले, ‘‘धुरामध्ये कार्बनचे अनंत सूक्ष्म कण तरंगत असतात. या कार्बनच्या कणांवर जेव्हा सूर्यप्रकाश पडतो तेव्हा ते कण मागील बाजू सोडून इतर सर्व बाजूंनी प्रकाशमान होतात आणि त्यावर पडलेल्या प्रकाशाचे विकीरण होते. सूर्यप्रकाशातील सप्तरंगांमध्ये निळा रंग हा तांबड्या व पिवळ्या रंगापेक्षा सोळा पटींनी जास्त असतो. तसेच प्रकाशातील प्रत्येक रंगाची तरंग लांबी ही वेगवेगळी असते. धुरातील कणांचा आकार जर प्रकाशातील नील किरणांच्या तरंग लांबीपेक्षा लहान असेल तर आधीच जास्त प्रमाणात असलेल्या निळ्या रंगाचे विकिरण जास्त झाल्यामुळे धूर निळा दिसतो; परंतु धुरातील कणांचा आकार जर थोडा मोठा असेल प्रकाशातील इतर म्हणजे तांबड्या, पिवळ्या किरणांचेही विकीरण झाल्याने त्यांच्या मिश्रणाने धूर रंगीत, पांढरट वा भूरकट दिसतो.’’
‘‘तू आकाशात इंद्रधनुष्य बघितलेच असेल. ते कसे निघते हे तुला माहीत आहे का?’’ आनंदरावांनी विचारले.
‘‘ हो आजोबा.’’ स्वरूप म्हणाला, ‘‘प्रा. देवबा पाटील यांच्या पावसाची करामत या छानशा माहितीवर्धक पुस्तकात मी ती सगळी माहिती वाचली आहे.’’
‘‘त्याचप्रमाणे धुके असताना धुक्यात पांढरे इंद्रधनुष्य दिसते.’’ आनंदराव म्हणाले.
‘‘ पांढरे इंद्रधनुष्य? अन् तेही धुक्यात’’ स्वरूप आश्चर्याने म्हणाला, ‘‘ते कसे दिसते?’’ त्याने विचारले.
‘‘चल आता आपण घराकडे परत जाऊ या. परत जाता जाता तुला मी हे सगळे काही सविस्तर सांगतो.’’
आजोबा म्हणाले व ते मागे वळले. त्यांच्यासोबत स्वरूपही मागे फिरला. त्यांची आता परतीची वाटचाल सुरू झाली.
‘‘त्याचे असे आहे स्वरूप,’’ आनंदराव सांगू लागले,
‘‘हिवाळ्याच्या दिवसांत सकाळी वातावरणात धुके असताना सूर्य उगवताना सूर्याच्या विरुद्ध बाजूस बऱ्याचदा त्या धुक्यात एक घुमटाकार, कमानीसारखा पांढरा पट्टा दिसतो.
यालाच पांढरे इंद्रधनुष्य किंवा धुक्याचे धनुष्य म्हणतात. डोळे दिपवून टाकणारे तेजस्वी सूर्यकिरण जेव्हा धुक्याच्या पडद्याचा भेद करून आत शिरतात तेव्हा घनदाट धुक्यातील सूक्ष्म जलबिंदूंमधून सूर्यप्रकाशाचे विभाजन व परावर्तन झाल्यामुळे हे पांढरे इंद्रधनुष्य दिसते. डोंगरमाथ्यावरून ते जास्त स्पष्ट दिसते. ते नेहमीच्या इंद्रधनुष्यापेक्षा दुप्पट रुंद असते. त्याच्या दोन कडांवर दोन रंग असतात. बाहेरच्या बाजूस तांबूस नारिंगी तर आतील बाजूस निळसर रंग असतो.
‘‘बऱ्याचदा दोन दोन इंद्रधनुष्ये दिसतात. तसे हेही दोन दिसतांत का?’’ स्वरूपने विचारले.
‘‘हो’’ आजोबा म्हणाले, ‘‘कधीकधी अशी दोन सुद्धा धुक्याची धनुष्ये दिसतात. त्यातील बाहेरचे प्रमुख किंवा प्राथमिक पांढरे धनुष्य असते तर आतील उप किंवा द्वितीय धुकेधनुष्य असते. द्वितीय धनुष्य हे प्रमुख धनुष्यापेक्षा लहान असून त्यातील रंगांचा क्रम उलटा असतो.’’
‘‘तेही इंद्रधनुष्यासारखे अर्धगोलाकारच दिसते का आजोबा?’’ स्वरूप उत्सुकतेने म्हणाला.
‘‘ हो. ते अर्धगोलाकार व कधीकधी पूर्णगोलाकारही दिसते.’’ आनंदराव पुढे म्हणाले, ‘‘धुक्याची पार्श्वभूमी जर जास्त अंधारी किंवा अप्रकाशित असेल तर हे पांढरे इंद्रधनुष्य अर्धवर्तुळाकर दिसण्याऐवजी पूर्ण गोलाकर दिसते.
प्रकाशलहरींची तरंग लांबी व धुक्यातील जलबिंदूंचा व्यास हे जेव्हा जवळजवळ सारखे असतात तेव्हाच पांढरे इंद्रधनुष्य दिसते. रस्त्यावील विद्युत दिवे जर खूपच प्रखर प्रकाशाचे असले व त्या प्रकाशानेही जर धुक्याचा भेद केला, तर आकाशात सूर्य नसतानाही म्हणजे सूर्योदयापूर्वीसुद्धा पांढरे इंद्रधनुष्य दिसू शकते.’’
अशा रीतीने आज स्वरूप रंगीत धुरावर तरंगत, धुक्यातील इंद्रधनुष्यावर खेळत सकाळचा फिरून आजोबांसोबत घरी परत आला. घरी येताबरोबर तो आईला धुक्याच्या इंद्रधनुष्याची माहिती सांगण्यासाठी आधी तिच्याकडे स्वयंपाकघरात गेला.