Monday, March 24, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलहे काय चाललंय...?

हे काय चाललंय…?

प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ

सहज फेसबुकवर स्क्रोल करत होते आणि एक फोटो समोर आला ज्याच्यात अमिताभ बच्चन आणि रेखा हे दोघेही कुंभमेळ्यामध्ये पाण्यात उतरून अंघोळ करताना दाखवले होते. ही गोष्ट मनाला खटकली. त्यानंतर दोन दिवसांनंतर ‘मोनालिसा’ ही माळा विकणारी कुंभमेळ्यातील मुलगी जिकडे-तिकडे फेसबुकवर दिसू लागली. एका रात्रीत ती व्हायरल झालेली होती. तिथपर्यंत ठीक होते पण त्यानंतर काही दिवसांत तिच्या अशा तऱ्हेने प्रसिद्ध होण्यामुळे कुंभमेळ्यात श्रद्धेने आणि भक्तीभावाने, पवित्र तीर्थस्थानासाठी आलेले हजारो लोक तिला शोधत फिरू लागले आणि ती दिसली की, तिच्याबरोबर फोटो काढू लागले. व्हीडिओ काढू लागले. हेही एक वेळ आपण समजू शकतो; परंतु त्यापलीकडे जाऊन तिला आणि तिच्या परिवाराला माळा विकण्याचे काम करणे अशक्य होऊ लागले आणि तिला कुंभमेळा सोडून परतावे लागले, ही गोष्ट मात्र मनाला खटकणारी आहे. ती कुंभमेळा सोडून गेल्यावर फेसबुकवर तिचे असे काही फोटो व्हायरल होऊ लागले की, विचारता सोय नाही म्हणजे कधी ती सलमान खानबरोबर लग्नाच्या रिसेप्शनला उभी आहे, तर कधी ती सलमान खानबरोबर हनिमूनला गेली आहे जिथे स्विमिंग पूलमध्ये त्याच्या मिठीत आहे असे फोटो व्हायरल होऊ लागले. हे काय चाललंय…?

फिल्मस्टार असल्यामुळे त्यांच्या फोटो किंवा व्हीडिओकडे लोकांचे जास्त लक्ष जाते. त्याचे लाईक्स आणि कमेंट्स वाढले की, त्या व्हीडिओमधून काही लोकांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते. या बाबतीत काही नियम नसावेत, असे वाटते. अचानक एका ॲपची जाहिरात पाहायला मिळाली ज्या जाहिरातीमध्ये ‘He is my crush’ म्हणणारी मुलगी दाखवलेली होती जी आपल्या आवडलेल्या मुलाचा फोटो बाण दाखवून अधोरेखित करत होती. साहजिकच हा कोणता ॲप आहे ते पाहत मी त्याविषयीची अधिकची माहिती वाचत राहिले, तर एका मुलीचा आणि मुलाचा फोटो बाजूबाजूला होता. पण त्या ॲपद्वारे ते दोन्ही चेहरे एकमेकांकडे पाहत आहेत असा व्हीडिओ तयार झालेला दाखवला आणि त्या व्हीडिओमध्ये ते दोघे एकमेकांना घट्ट मिठी मारून एकमेकांना किस करताना दाखवले होते. जाहिरात अशी होती की, हा अॅप वापरून आपण कोणत्याही दोघांच्या साध्या फोटोंना घेऊन त्या दोघांना किस करताना दाखवू शकतो. किती भयानक. सर्वसामान्य माणसे आपले कितीतरी फोटो सोशल मीडियावर टाकत असतात. त्या फोटोंचा असा वापर झाला, तर सर्वसामान्य माणसांचे जगणेच कठीण होऊन जाईल, असा विचार मनात आला. हे काय चाललंय…?

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर माधुरी दीक्षितचा साडी नेसलेला सुंदर फोटो होता आणि त्याच्या बाजूला तोच फोटो ज्याच्यात तिच्या अंगावर पदर नव्हता. सेक्सी फोटो. कोणाचेही लक्ष आकर्षित करत होता. म्हणजे कोणाच्याही अंगावरचा पदर काढून टाकून…
बाप रे!
हे काय चाललंय…?
याला शेवट नाहीच, पण तरीही आणखी एका व्हीडिओविषयी सांगितल्याशिवाय राहवत नाही. निवडणुकीच्या वेळेस देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या अंगावर वेगवेगळी विचित्र वेशभूषा दाखवून आणि त्यांना घाणेरड्या गाण्यावर नाचताना दाखवले.
हे काय चाललंय…?

एकदा कारमधून प्रवास करताना पावसाळ्याच्या दिवसांत मी डोंगरावरील झाडे आणि त्यामधून वाहणाऱ्या धबधब्यांचा व्हीडिओ केला. तो युट्युबवर अपलोड केला. ताबडतोब मला कॉपीराईटचा ईमेल आला. कारण पाहिले तर कळले की, एक गाणे मी माझ्या व्हीडिओसाठी वापरले आहे. म्हणजे मी कारमधून जेव्हा बाहेरच्या दृश्याचे चित्रीकरण करत होते. तेव्हा त्या कारमध्ये कोणतेतरी गाणे वाजत होते. आपण प्रवास करताना गाणी ऐकत जातो ना… ते गाणे या व्हीडिओमध्ये आपोआपच रेकॉर्ड झाले. नजरचुकीने व्हीडिओत गेलेल्या त्या गाण्यामुळे म्हणजे त्या कॉपीराईटमुळे मला तो व्हीडिओ काढून टाकावा लागला. जर मीडियातील लहानसहान गोष्टी इतक्या बारकाईने क्षणात तपासल्या जातात, तर मग असले घाणेरडे किंवा अश्लील फोटो/ व्हीडिओ याविषयीची नोंद ताबडतोब का घेतली जात नाही?

ही कोणती टेक्नॉलॉजी? नैतिकता नावाची गोष्ट आहे की नाही? अशा फोटो/ व्हीडिओ ॲप्सना कशा तऱ्हेने नियंत्रित करायचे? हे काय चाललंय…?

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -