मनोज कुमार शर्मा यांची कायदा – सुव्यवस्था विभागाच्या विशेष महानिरीक्षकपदी नियुक्ती
मुंबई : राज्य सरकारने शुक्रवारी पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, सात आयपीएस अधिकाऱ्यांना प्रमोशन देण्यात आले आहे. यात तीन आयपीएस अधिकाऱ्यांना पोलीस महानिरीक्षक पदावरून अप्पर पोलीस महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. पोलीस उप महानिरीक्षक पदावर असलेल्या दोन अधिकाऱ्यांना पोलीस महानिरीक्षकपदी सरकारने पदोन्नती दिली आहे.
बारावी फेल या चित्रपटामुळे चर्चेत आलेले आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांनाही पदोन्नती देण्यात आली असून, त्यांची नियुक्ती कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या विशेष महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा यांची केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांचा प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपला आहे. या बदल्यांच्या यादीत आयपीएस अधिकारी निखिल गुप्ता आणि आयपीएस अधिकारी सुरेश मेखला यांचीही नावे आहेत. गृह विभागाच्या आदेशानुसार, निखिल गुप्ता सध्या अप्पर पोलीस महासंचालक प्रशासन या विभागात कार्यरत आहेत.