कोकणी बाणा – सतीश पाटणकर
श्री देवी चामुंडेश्वरी मंदिर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले या गावात आहे. हे मंदिर हिंदू धर्म मानणाऱ्या सर्व नागरिकांसाठी खुले आहे. आंदुर्लेस्थित श्री देवी चामुंडेश्वरी मंदिर हे मूलतः पाट व सभोवतालच्या गावांत राहणाऱ्या पाटील पाटकर कुटुंबीयांनी साधारणपणे सहाशे वर्षांपूर्वी बांधले असे सांगितले जाते. पाटील कुटुंबीय हे पाट गावाचे ग्रामाधिपती होते. साधारण १९२५ सालापर्यंत मंदिर जीर्णत्वामुळे भग्न होऊन मूर्तीला बारीक तडे गेले होते. इ.स. १९२७ ला जेव्हा कै. श्री. कृष्णाजी शिवाजी पाटकर व कै. श्री. रामचंद्र कृष्णाजी पाटकर यांनी मंदिराला भेट दिली तेव्हा त्यांना मंदिराची व मूर्तीची चिंताजनक परिस्थिती नजरेस आली. मंदिराजवळील अग्रशाळाही भग्नावस्थेत होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून या द्वयीने नवीन मूर्ती स्थापण्याचा व मंदिराची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पाटील पाटकर कुटुंबे व आंदुर्ले गावातील सर्व जाती व जमातीतील प्रतिष्ठित नागरिकांना एकत्र करून मंदिराची दुरुस्ती व घुमटाची बांधणी करण्याचे काम सुरू केले.
मंदिरातील मूर्ती करण्याचे काम मूर्तिकार कै. बाळा बाबू कुणकावळेकर (मिस्त्री) यांजवर तर घुमट बांधणीचे काम कै. नारायण विठू कासकर (गवंडी व विटकाम करणारे) यांना देण्यात आले. मंदिराची एकूण बांधणी करण्याचे कार्य कै. श्री. तुकाराम धुरी पिंगुळकर यांनी तर सुतार काम व लाकडी कामावरील नक्षीकाम कै. सोनू सुतार आंदुर्लेकर यांनी केले. सर्व बांधकामाची पूर्तता वर्ष १९२९ च्या सुरुवातीला होऊन फेब्रुवारी १९२९ मध्ये ब्राह्मणांच्या मंत्र घोषात मंगलाष्टकांसह श्री देवीची प्रतिष्ठापना देवीची मूर्ती गर्भगृहात विराजमान करून पार पडली. दिनांक १५ फेब्रुवारी १९२९ शुक्रवार रोजी ब्राह्मणांनी मंत्राजागरात श्री देवीची प्रतिष्ठापना केली. या समारंभाचे यजमानपद कृष्णाजी शिवाजी पाटकर व त्यांच्या पत्नी सौभाग्यवती भागीरथीबाई यांजकडे होते. पौरोहित्याचा मान आंदुर्लेवासी वेद विद्या पारंगत श्री बाबुकाका आरावकर व सावंतवाडी येथील आळवणीबुआ यांजकडे होता. हा सोहळा बुधवार दि. १३ फेब्रुवारी १९२९ रोजी सुरू झाला. प्रथम अनंत बच्चाजी पाटील देसाई गावकर यांनी पाट व सभोवतालच्या गावातील १८ देवतांना श्रीफळ व फुले समर्पित करून गाऱ्हाणे घातले. श्री देवीच्या जुन्या मूर्तीचे त्याच दिवशी विसर्जन करण्यात आले. रात्री भूतनाथ, माऊली, रवळनाथ व इतर निमंत्रित केलेल्या देवतांच्या पालख्या व तरंग आंदुर्ले गावात पोहोचले. गुरुवार दिनांक १४ फेब्रुवारी १९२९ रोजी श्री देवीची नूतन मूर्ती गर्भगृहात सिंहासनावर विराजमान करण्यात आली. दिनांक १५ फेब्रुवारी १९२९ शुक्रवार रोजी ब्राह्मणांनी मंत्राजागरात श्री देवीची प्राणप्रतिष्ठा केली व यथासांग महापूजा केली.
या मंगल प्रसंगी सावंतवाडी संस्थानाचे तत्कालीन राजे श्रीमंत राजेबहादूर बापूसाहेब हे आपल्या सर्व उच्च अधिकाऱ्यांसहित उपस्थित होते. आंदुर्ले पाट व इतर गावातील नागरिक या सोहळ्यात सहभागी झाले. या निमित्ताने मंदिरात केलेल्या महाप्रसादाचा भक्तांनी लाभ घेतला. या दिवशी दाणोली (सावंतवाडी) गावातील प्रसिद्ध सत्पुरुष कै. साटम महाराज यांचेही आंदुर्ल्यात आगमन होऊन त्यांनी देवीदर्शन घेतले. संध्याकाळी ५.३० वाजता दाभोली येथील कै. पांडुरंग जगन्नाथ शास्त्री रामदासी यांचे कीर्तन झाले. त्यानंतर कै. आत्माराम बुआ झारापकर व माधवराव वालावलकर यांनी सुस्वर भजने म्हटली. त्यानंतर देवीसमोर गोंधळाचा कार्यक्रम झाला. रात्री नाट्यप्रयोग सुरू होऊन तो दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चालला. भक्तनिवास (अग्रशाळा) निर्मितीमागे मूळ उद्देश देवी दर्शनाला येणाऱ्या भक्तांना राहण्याची व देवीसाठी नैवेद्य / प्रसाद बनविण्याची सोय व्हावी हा आहे. दूर अंतरावरून मंदिरात येणाऱ्या भक्तांना स्वत:चे वास्तव्यस्थान जवळ नसल्यास पूजा विधी करण्यास व अन्नपाणी मिळण्यास अडचणी येत होत्या. समितीच्या सदस्यांच्या या गोष्टी निदर्शनास आल्या.
तद्नंतर समितीने अग्रशाळेच्या (भक्तनिवास) बांधकामास प्राधान्य देऊन भक्तांची सोय केलीच, पण वेळोवेळी भक्तनिवासाचा विस्तार करून त्यात आधुनिक सोयी पुरविल्या. भक्तनिवास मंदिराच्या मागील बाजूस स्थित असून त्यांत राहण्याबरोबर चहा व जेवणाचीही सोय केली जाते. भक्त निवासात राहावयाच्या शर्ती व नियम आहेत. या मंदिरात भूतनाथ, माऊली, रवळनाथ व इतर निमंत्रित केलेल्या देवतांच्या पालख्या व तरंग येतात. १४ फेब्रुवारी १९२९ रोजी श्री देवीची नूतन मूर्ती गर्भगृहात सिंहासनावर विराजमान करण्यात आली होती. १५ फेब्रुवारी १९२९ रोजी ब्राह्मणांनी मंत्राजागरात श्री देवीची प्राणप्रतिष्ठा केली होती.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)