मनस्विनी – पूर्णिमा शिंदे
शाळा शाळांमधून आणि महाविद्यालयांमधून दरवर्षी स्नेहसंमेलनही आयोजित केली जातात. यामध्ये शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक कल आणि सुप्त कलागुणांना विकास केला जावा ही धारणा असते. व्यासपीठ मिळवून देणे हा मुख्य हेतू. गप्पा, मैत्री, नाच, गाणी, मस्ती हे होतेच. पण जसे अभ्यास, गृहपाठ, परिपाठ, कसरत, व्यायाम स्पर्धा असतेच! कधीकधी मनाला तजेला देणारा उपक्रम. शालेय स्नेहसंमेलन म्हणजे गॅदरिंग. विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासाठी सुद्धा ही मेजवानीच असते. मन ताजेतवाने ठेवण्याचा एक महत्त्वाचा उपक्रम. एकमेकांना जोडण्याचा सेतू. नाती संबंध दृढ करण्याचा आनंदी राहण्याचा आणि समजून घेण्याचा हा उपक्रम. बऱ्याचदा अशा ठिकाणी आपण प्रमुख पाहुणे असलो की, समोर येतात ते भूतकाळातील क्षण. त्या बाललीला पाहतानाच आपल्याला आठवते शालेय जीवन. शालेय जीवनात केलेले उपक्रम, सामाजिक प्रबोधनासाठी लिहिलेली नाट्य, साकारलेल्या कला, इत्यादींची जाणीव होऊन जाते. साधारणता वार्षिक परीक्षेच्या पूर्वी तो काळ असतो. दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारीमध्ये ही स्नेहसंमेलने साकार केली जातात. त्यामध्ये विविध उपक्रम असतात. विविध स्पर्धा, बक्षीस समारंभ, गुणगौरव समारंभ याचा समावेश असतो. वातावरण अगदी खेळीमेळीच, आनंदाचं असतं, सोहळाच असतो तो. तल्लीन होण्यासारखा नवोपक्रम असतो. दरवर्षी नव्याने काहीतरी साकारण्याचा.
कोण कसं दिसतं? कसं नाचतं? कसं बोलतं? नाट्यकृती, कलाकृती वगैरे पाहण्याचा. आजकाल तर खूप जमाना बदलला आहे. पूर्वीची परिस्थिती राहिली नाही. हल्ली खास मोठमोठ्या डिझायनरकडून ड्रेस बनवून घेतले जातात. पूर्वी रंगभूषा, केशभूषा, वेशभूषा घरच्या घरी किंवा शाळेमध्ये सुद्धा साकार होत होत्या. सुप्त कलागुणांना वाव तर मिळतोच. प्रत्येकाला काम मिळतं. कौशल्य, कला सादरीकरण, आनंद जोपासता येतो. वृद्धिंगत होतो. व्यासपीठ मिळाल्याचा मोठा आनंद! पुढे हेच विद्यार्थी नावाजले जातात. लोकप्रिय होतात नावारूपाला येतात आणि मग सांगतात कधी काळी मी राम, कृष्ण, रावण, अर्जुन, सीता, राधा, अहिल्या, झाशीची राणी हा रोल साकारला होता. आनंदाने आवर्जून सांगतात ते. व्यासपीठ पहिले होते ते कलेचे दालन खुले करणारी ती शाळा म्हणजे विद्येचे माहेर. विद्यादेवीच्या संकुलात उमलत्या वयात अविस्मरणीय असे क्षण हृदयावर कोरले जातात. मनावर उमटले जातात. त्या सुगंधी अत्तराच्या कुपीमध्ये सुखावणारे क्षण असतात. स्नेहसंमेलनातून सामाजिक प्रबोधन घडते. उद्बोधन घडते.
कधीकाळी कीर्तनकार सांगून जातो. कीर्तनातून जीवनाचा आलेख. कधी कलेतून जीवन जगण्याची आसक्ती, तर कधी नल दमयतीचं नाटक तर कधी महात्मा फुले सावित्रीबाई फुले सारख्या महात्म्यांचा जाज्वल्य इतिहास. आपल्याला उमेद देणारा. आपली जीवनमूल्य ठरविणारा अशी माहिती संपन्न सादरीकरण केवळ कला साकारणे नव्हे, तर कलेतून नैतिकता, समता, एकता, भाषिक संस्कृती सामाजिक कला, संस्कृतीचे सादरीकरण हे मूल्याधिष्ठित ठरते. साहित्य सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, वैज्ञानिक या सर्व अंगांना स्पर्श करून जाते. एकूणच संस्कृती विषयीची उदात्तता तर कधी सामाजिक प्रश्नांवर समस्येवर केलेला भडीमार. एखादी नाट्यकृती दर्शवते लिंगभेद, हुंडाबंदी, अत्याचार, राजकीय प्रलोभने, भ्रष्टाचार, महागाई, गुन्हेगारी, शिक्षण, बेरोजगारी व्यसन अशा विविध अंगांना स्पर्श केला जातो. विविध विषयावरती कस लावून सादरीकरण केले जाते. कधी कधी फिल्मी गीतांवर नृत्य केले जाते. त्यामधून देखील नृत्याची कला सुप्त असली तरी विद्यार्थ्यांना तिथे सादर करता येते. या सगळ्या आयुष्यातून स्नेहसंमेलनामध्ये आवर्जून पाहावे असे असते ते निवेदन. निवेदनातून अनेक विध विषयांचा वेध घेतला जातो. विविध प्रकारचे सादरीकरणाचे किस्से असतात. विनोद, सुवचने, सुभाषिते, अभंग, ओव्या काव्यपंक्ती यातून गुंफल्या जातात. कार्यक्रम उंचीवर नेण्यासाठी सूत्रसंचालन अतिशय महत्त्वाचे असते. एखादा कार्यक्रम सुंदर देखणा होण्यासाठी. आकर्षक असते ते निवेदन. प्रमुख पाहुण्यांना भारावून टाकणारे, शालेय जीवनावर भाष्य करणारे.
विद्यार्थी शिक्षक यांच्यासह सर्व शालेय व्यवस्थापन समिती विश्वस्त यांना विश्वासात घेऊन अतिशय सहज सोपे आकर्षक असे सूत्रसंचालन असावे. स्नेहसंमेलनामध्ये बक्षीस समारंभ पारितोषिक वितरण समारंभ यावेळी शाळेतील शिस्त, आदर्श, नैतिकता अत्यंत मोलाची असते. शालेय स्नेहसंमेलनामध्ये पाहुण्यांचा स्वागत, सत्कार समारंभ आणि परिचय याही तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी असतात. वर्षभर अभ्यास करत असतो पण अभ्यासाशिवाय सुद्धा शाळा महाविद्यालयातून खूप काही शिकता येते आणि हे आयुष्यभरासाठी जन्माची शिदोरी असते. प्रत्येक गोष्ट शाळा घडवते, शिकवते. सुप्त कलागुणांना वाव देते. म्हणून शालेय स्नेहसंमेलने जरूर भरावीत. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या जडणघडण, संस्कृती ओळख आणि कला कौशल्य सादरीकरणास त्यातून वाव मिळतो. भविष्यात शाळेतील विद्यार्थ्यांमुळे ज्या शाळेने हा विद्यार्थी घडविला त्याचे नाव नावलौकिक प्रसिद्ध होतेच, पण शाळेचेही नाव रोशन होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहसंमेलनाला जाण्याचा योग आला, तर निश्चितच हा आनंद लुटा आणि पुन्हा एकदा लहान होऊन शालेय स्नेहसंमेलनाची मजा लुटा.