पल्लवी अष्टेकर
नुकतीच एक बातमी वाचनात आली. एका कुटुंबाने त्यांची १३ वर्षे वयाची मुलगी देणगी म्हणून ‘जुना आखाड्याकडे’ सुपूर्द केली. महंत कौशल गिरी यांनी ही देणगी स्वीकारली व मुलीला दीक्षा दिली, म्हणून आखाड्याने त्यांना निलंबित केले. यापुढे मुलीचे वय किमान २२ वर्षे असल्याशिवाय आखाड्यात साध्वी म्हणून भरती न करण्याचा नियम केला आहे. असे काळानुसार सामाजिक बदल करणे खूप गरजेचे आहे. असे बदल स्वीकारले जातात हा धर्माचा मोठेपणा आहे. असे अनेक बदल आपल्या समाजसुधारकांनी केले. आपला समाज एका विशिष्ट परिघात फिरत असतो. यात समाजात नको असलेल्या प्रथा मोडून टाकणे व समाजाला परिवर्तनीय अवस्थेत घेऊन जाण्याचे कौशल्य समाजसुधारकांचे आहे. सामाजिक परिवर्तनात आघाडीवर असलेले व सामाजिक सुधारणेत अग्रेसर राजा राममोहन रॉय यांचे काम निश्चितच उल्लेखनीय आहे. इ. स. १६०० मध्ये इंग्रज भारतात व्यापारी बनून आले. व्यापारी वखार सुरत येथे होती. पण कंपनीचे मुख्य केंद्र कोलकाता-बंगाल येथे होते. इंग्रजी शिक्षणाची सुरुवात बंगालमध्ये झाली. बंगाल येथे समाज-प्रबोधनाची सुरुवात झाली. त्याचे आद्य प्रवर्तक होते-राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय यांचा जन्म २२ मे १७७२ मध्ये राधानगर, बंगाल येथे झाला. बालपणापासून त्यांचे शिक्षण घरी व गावच्या शाळेत झाले. लहानपणापासून ते स्वतंत्र वृत्तीचे होते. तत्कालीन रीतीला अनुसरून त्यांच्या पालकांनी त्यांचे लग्न बालपणीच लावून दिले. राजा राममोहन यांचे आपल्या सनातनी विचारांच्या वडिलांशी पटले नाही म्हणून वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी घर सोडले व स्वत:च्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. पाटणा (बिहार) येथे त्यांनी फार्सी व अरबी, संस्कृत भाषांचा अभ्यास केला. कुराणाचे व अभिजात फार्शी कवितांचे त्यांनी बंगाली भाषेत अनुवादही केले. श्रृतिस्मृती पुराणांचा अभ्यास केला. तसेच त्यांनी अरब शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ यांच्या ग्रंथांचे अध्ययन करून अरिस्टॉटल, प्लोटिनस, प्लेटो यांच्या विचारांचा अरबी भाषेतील ग्रंथाच्या सहाय्याने अध्ययन करून व नंतर मूळ ग्रंथातून अभ्यास केला.
सत्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी उत्तर भारतात व हिमालयात दूरवर प्रवास केला. ते तिबेटमध्येही गेले. तेथे त्यांनी लामाच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध धर्माचे अध्ययन केले. राधानगर येथे त्यांना आपल्या गुरूकडून ज्ञान मिळाले होते. त्यामुळे हिंदू, मुसलमान व बौद्ध धर्माचे त्यांना तौलनिक ज्ञान मिळाले. तिबेटमध्ये त्यांना प्रतिमापूजन, धर्मगुरू पूजन, मंत्रतंत्र व कर्मकांड या बाह्यांगांचा पसारा दिसला. बौध धर्मातही मूर्ती पूजेचा शिरकाव झाल्याचे पाहून त्यांनी त्याचा स्पष्ट शब्दांत विरोध केला. तेव्हा लामांच्या क्रोधापासून जीव वाचविण्यासाठी त्यांनी तिबेटमधून पळ काढला. ते घरी परत आल्यानंतर भोवतालचा समाज रूढीप्रिय व सनातनी असल्याने त्यांचा द्वेष करू लागला. त्यांच्या विचारांशी त्यांचे आई-वडील सहमत नव्हते, त्यामुळे वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले. इ. स. १८०३ मध्ये त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी पत्करली व आपल्या कर्तृत्वाने ते दोन वर्षांतच जॉन दिग्बीचे दिवाण झाले. दिग्बीकडे ते इ. स. १८१४ पर्यंत राहिले. मधल्या काळात त्यांनी इंग्रजी लेखनाची स्वत:ची शैली निर्माण केली. १८१४ नंतर ते कोलकत्ता येथे राहण्यास गेले. तिथे त्यांनी उदारमतवादी व व्यापकदृष्टीच्या मित्रमंडळाची स्थापना केली. ख्रिश्चन ग्रंथ मुळात वाचता यावेत म्हणून त्यांनी ग्रीक, लॅटिन, हिब्रू भाषांचाही अभ्यास केला.
एका प्रसंगाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. इ. स. १८११ साली सती जाणाऱ्या आपल्या भावजयीचे आक्रंदन आणि जीव वाचविण्याची तिची धडपड व परंपरावादी लोकांनी तिचा घेतलेला बळी हे दारुण दृश्य पाहणारा तिचा दीर-राजा राममोहन रॉय यांनी ही अमानवी रूढी कायद्याने थांबवून घेण्याचा विडा उचलला. सामाजिक सुधारणेचा तो एक महत्त्वाचा टप्पा ठरला.
जिथे-जिथे एखादी स्त्री सती जात असे, तेथे आपल्या सहकाऱ्यांसोबत जाऊन तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत असत. त्यामुळे तत्कालीन समाजाचा रोष त्यांना पत्करावा लागला. सती प्रथा बंद व्हावी म्हणून अर्ज त्यांनी सरकारकडे पाठविला. त्यात म्हटले आहे की, “या अमानुष चालीवर बंदी घालून सरकारने कायदा करावा व समाज-आप्तेष्टांकडून होणारे स्त्रियांचे खून बंद करावेत.” त्यावेळचे गव्हर्नर जर्नल लॉर्ड विल्यम बॅटिक यांनी राममोहनांशी प्रदीर्घ चर्चा करून सतीबंदीच्या कायद्याची निश्चिती केली. ४ डिसेंबर १८२९ रोजी सतीबंदीचा कायदा जाहीर केला. राजा राममोहन रॉय यांना हिंदूंमधील अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा नष्ट करताना सनातनी लोकांना तोंड द्यावे लागले. बालविवाह थांबविणे, स्त्रियांना शिक्षण देणे, विधवा विवाहास प्रोत्साहन देणे, स्त्रियांचा छळ थांबविणे, अस्पृश्यता नष्टं करणे, समाजातील अज्ञान, दारिद्र्य व शोषण नष्टं करणे, व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणे, प्रतिष्ठेचे रक्षण करणे, विचार व मुद्रण स्वातंत्र्य असणे, चारित्र्य शुद्ध ठेवणे या सद्-प्रवृत्तींना प्रोत्साहन देण्याचे काम राजा राममोहन रॉय यांनी केले.
भारतीय जीवनाच्या सर्व क्षेत्रांत त्यांना शुद्धीकरण हवे होते. केवळ धर्म सुधारणेच्या कार्यावर ते थांबले नाहीत, तर इंग्रजांपासून धडे घेऊन सामाजिक, राजकीय व न्यायविषयक, मुद्रण विषयक इ. सर्वच बाबतीत स्वातंत्र्याचा पुरस्कार करून परंपरागत अनेक दुष्टं रूढी व विघातक प्रथांच्या विरोधी आघाडी उघडून इंग्रजांकडे पुरोगामी स्वरूपाचे नियम व कायदे करण्याची मागणी केली. त्यांनी ब्राम्हो समाजाचा पाया घातला. विविध धर्मांमध्ये सामंजस्य व समन्वय घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले. १८२३ मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मुद्रण स्वातंत्र्यासाठी अर्ज पाठविला. वृत्तपत्रांद्वारे लोकांना आपली गाऱ्हाणी, मागण्या व मते वेळोवेळी जाहीररीत्या प्रसिद्ध झाल्यास, ती गाऱ्हाणी राजकर्त्यांच्या कानी जातात. अशा हेतूने मुद्रण स्वातंत्र्यासाठी त्यांनी अर्ज पाठविला. राजकीय बाबतीत ते उदारमतवादी व लोकशाहीवादी होते. वरवरचा दिखाऊपणा, बेगडी, अंधश्रद्धा यांचा धर्म त्यांना नको होता.
राजा राममोहन रॉय यांच्या मते, “सृष्टीकर्ता व पालनकर्ता एक निराकार परमेश्वर आहे. हा सिद्धांत सर्व धर्मांचा पाया आहे.” त्यांच्या मते, “धर्माचे खरे स्वरूप, मूलभूत तत्त्व ठरविण्याकरिता खऱ्या-खोट्याचा ऊहापोह केला पाहिजे.” दिल्लीचा बादशहा दुसरा अकबर याच्या काही राजकीय तक्रारी ब्रिटिश सरकारपुढे दाखल करण्याकरिता, त्याचप्रमाणे सतीबंदीच्या कायद्याविरोधी ब्रिटिश सरकारच्या दरबारी अर्ज-विनंत्या येत असल्याने सरकारने संतीबंदीचे धोरण कायम ठेवावे म्हणून १९ नोव्हेंबर १८३० रोजी राममोहन इंग्लंडला रवाना झाले. त्यावेळी दिल्लीच्या बादशहाने खूश होऊन त्यांना ‘राजा’ हा किताब दिला. परदेशात त्यांचा अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आला. तिथल्या प्रतिष्ठित लोकांचा त्यांच्याविषयी आदर वाढला. आपल्या सभा-समारंभातील बातम्यांनी व चर्चा-सवांदांनी त्यांची भारताची प्रतिमा उजळून टाकली. याचवेळी ते अकस्मात आजारी पडले. ब्रिस्टल येथे त्यांचे निधन झाले. त्या काळच्या समाजाचा रोष पत्करून त्यांनी समाज-सुधारणेचा वसा घेतला व आपल्या कार्याने ते अजरामर झाले.