लता गुठे
आज २१ व्या शतकात आपण वावरत आहोत. बदलत्या काळाबरोबर विज्ञानाच्या प्रवाहात क्षणाक्षणाला समाजातील प्रत्येक घटकांमध्ये बदल होत आहेत. या बदलांबरोबर आपल्या संस्कृतीमध्येही अामूलाग्र बदल होत आहेत; परंतु आदिवासी भागांमध्ये राहणाऱ्या जमाती आहेत त्यांनी त्यांच्या लोककला, नृत्यकला, गायन, लोककथा या आणखीही जतन केल्या आहेत. सण उत्सवाच्या प्रसंगी त्यांचे पारंपरिक पोशाख घालून ते अजूनही तसेच नृत्य सादर करतात. त्यावेळी विशिष्ट आवाजात लोकगीतांच्या चालीवर गाणी म्हणतात, यामध्ये फारसा फरक झालेला नाही. आदिवासी संस्कृती ही भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या आदिवासी समाजांमध्ये विविध सांस्कृतिक, भाषिक आणि सामाजिक परंपरा आहेत. आदिवासी समुदाय आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. अजूनही अठरा विश्व दारिद्र्यात ते राहतात; परंतु त्यांची नाळ निसर्गाशी जोडली गेली असल्यामुळे अनेक निसर्ग घटक त्यांच्या संस्कृतीचा भाग झालेले दिसतात.
आदिवासी जमातीचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे, सिंधू संस्कृती, इंडो-आर्यन, ऑस्ट्रोएशियाटिक आणि तिबेटी यांच्या विविध अंशांचे ते वंशज आहेत. तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारत येथे आदिवासी जमातीचे वास्तव्य पाहायला मिळते.
महाराष्ट्राच्या पूर्वेकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये अतिशय दुर्गम भागात राहणारी ‘झाडिया’ ही जमात आहे. या जमातीमध्ये धार्मिकता व संस्कृतिक घटकांना महत्त्वाचे स्थान आहे. सण, उत्सव, पूजाअर्चा याचे महत्त्व आहे. कला, लोकगीते यांच्या सांस्कृतिक वारसाशी आणि पर्यावरणाशी खोलवर गुंतलेल्या माणसांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. साध्या साध्या गोष्टींमधून त्यांची संस्कृती निदर्शनास येते. त्या गोष्टी म्हणजे त्यांचा साजशृंगार, अंगावर गोंदलेले गोंदण, लोकनृत्य, लोकनाट्य, जादूटोणा, शिकार मासेमारी, शेतीपद्धती, लग्नपद्धती, कुटुंबपद्धती, जन्म-मृत्यू संस्कार या सर्व गोष्टी आदिवासी समाजातील विविध जमातीमध्ये थोड्याफार फरकाने आढळतात. शहरी वातावरणाशी जास्त परिचित नसल्यामुळे आदिवासी समाजात फारशी गुंतागुंत आढळत नाही. अगदी सोपी, साधी त्यांची जीवन जगण्याची पद्धत असते. त्यांच्या आहार संस्कृतीचा विचार केला तर…
शिकार करून आणलेल्या प्राणीपक्ष्यांचे मांस व मासेमारी आणि जंगलात मिळणारे मुळे, फळे, मध आणि वन उत्पादने गोळा करणे हे त्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. कोणत्याही कलेचं मूळ हे भाषा असते. त्यामध्ये वेगवेगळ्या लिपी असतात. त्या लिपींमधून ती भाषा व्यक्त होते. जशी मराठी भाषा बारा कोसाला बदलेली दिसते. तशा वेगवेगळ्या भागातील आदिवासी जमाती वेगवेगळी भाषा बोलतात. भारतात आर्यपूर्व काळात अस्तित्वात असलेल्या अनेक मूळ आणि प्राचीनतम बोलीभाषा आढळतात. त्या बोलीभाषा म्हणजे ढोरी (टोकरे कोळी), कोरकू, कोलामी, खारिया, गोंडी, गोरमाटी, ठाकरी, वाघरी, वाघरामी, पारधी, देहवाली, दो, परधानी, पावरी, भिलोरी, भूमिज, माडिया, मुंडारी, संथाली, सावरा, हलबी,मावळी वगैरे. भाषा आढळतात; परंतु अनेक भाषा फक्त बोलल्या जातात; परंतु त्यांच्या लिपी अस्तित्वात नसल्यामुळे त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मातृभाषेच्या रूपात टिकून आहेत; परंतु काही आदिवासी भाषांना लिपी आहे. उदा. संथाली. गोंडी ही द्रविडी भाषा कुटुंबातील प्रमुख आणि समृद्ध बोलीभाषा आहे.
सर्वच आदिवासी संस्कृतीचा एक भाग म्हणजे आदिवासी लोकगीते, लोकनृत्य यातून त्यांचा आनंद व्यक्त होतो. त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. आदिवासी जमातीचा अभ्यास करणाऱ्या किंवा त्या समाजातील शिकलेल्या लोकांनी ती लोकगीते लिहून ठेवली आहेत. त्यामुळे अभ्यासकांना ती उपयोगी येत आहेत. उदा. कातकरी गीत-
मुरमीचा गण जल्म झाला पातालात |
ते गण गेला कोणाच्या वंश्याला |
वंश्याला जर गेला नसता
पूंजला मिलला असता |
पन आता कार न्हाई मिळत पूजाला ||
येथून गण झाला पुरा,
म्हाईत असलं तर सांग रं सभेला ||
असे सवाल जवाब त्यांच्या लोकगीतांमधून आढळतात. पुढे ही परंपरा संतांच्या कूट भारुडांपासून लावणीच्या फडापर्यंत पोहोचलेली पाहायला मिळते.
तसेच आदिवासी समाजामध्ये देवदेवतांनाही महत्त्वाचे स्थान असते. मातृदेवतेला म्हणजे देवी मातेला ते जास्त मानतात. तिच्यावर जास्त श्रद्धा असल्यामुळे देवीच्या पूजेचे, नैवेद्याचे विशेष महत्त्व आहे. आदिवासी समाज जंगल, दऱ्याखोऱ्यात राहतो. त्यामुळे निसर्गाचे अनेक चमत्कार तसेच जंगली प्राणी साप, विंचू यापासून रक्षण होण्यासाठी ते जंगलातील देवी-देवतांना साकडं घालतात. देवतांची स्तुती त्यांच्या भजनांमधून ऐकायला मिळते. आदिवासींमध्ये आणखी एक गोष्ट आढळते ती म्हणजे समूहाला ते एक कुटुंब म्हणतात. त्यामुळे सण, उत्सवामध्ये ते सर्व एकत्र येऊन नृत्य करतात. त्यामध्ये हातात हात गुंफून किंवा एकमेकांच्या दंडाला धरून नृत्य सादर करतात. गळ्यात पाना-फुलांचे हार घालून कमरेभोवती जुनी वस्त्र गुंडाळून किंवा पुरुष कमरेभोवती झाडांची पाने बांधून व स्त्रिया पाना-फुलांनी आपले शरीर सजवतात आणि मनसोक्त नाचतात. लग्न समारंभ त्या संस्कृतीचा एक भाग असतो. त्यामुळे लग्नामध्ये विशेष विधी, नृत्य जेवण, दारू याचाही त्यांच्या प्रथेप्रमाणे समावेश असतो. आदिवासी लोक विविध सण साजरे करतात. आपल्यासारखी दिवाळी त्यांच्या घरांमध्ये साजरी होत नाही. काही जमाती सोडल्या तर आजही त्यांच्या घरामध्ये रात्री दिवा लावायला तेल नसते, तर दिवाळी कुठून साजरी करणार? परंतु होळी मात्र धुमधडाक्यात दारू पिऊन नृत्य करून, पळसाच्या फुलांचा किंवा पानांचा नैसर्गिक रंग तयार करून तो रंग एकमेकांना रंग लावून होळी साजरी करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख अंगावर टाकून होळीभोवती नृत्य करतात, गाणी गातात.
झाडीया जमातीत दसरा सण विशेषप्रकारे साजरा केला जातो, तो असा… माती आणि शेणापासून देवतांच्या पाच मूर्ती तयार करतात. त्याला ‘पोहोटे’ असे म्हणतात. या पोहट्यांच्या भोवती तांदळाच्या पिठाने रांगोळी घालतात. आदिवासी समाजामध्ये पूर्वीपासून रांगोळीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे छोट्या समारंभातही रांगोळी घालतात. भिंतीवर चित्रे रेखाटतात. यातूनच वारली पेंटिंग जन्माला आली आहे. याचबरोबर आदिवासी समाजामध्ये लोकनाट्यांना पण विशेष महत्त्व आहे. त्यांच्या पाड्यातील चौकामध्ये किंवा झाडाच्या पारावर लोकनाट्य सादर केली जातात. यामध्ये रामायण, महाभारतातील प्रसंग उभे करतात. तसेच आदिवासींमध्ये ‘विधीनाट्य’ विशेष सादर करतात. यामध्ये त्यांच्या दैवत कथांविषयी माहिती मिळते. उदा. इंद्रकथा – यामध्ये इंद्राच्या सभेतील वर्णन ऐकायला मिळते. उत्पत्ती कथाही रचलेल्या आहेत. यामध्ये चंद्र तारे यांच्या उत्पत्ती, प्रलयाच्या कथा अशा प्रकारे अनेक कथांचा समावेश असतो. तसेच नक्षत्रकथा – यामध्ये चंद्र, सूर्य, नक्षत्रे यांच्याही अनेक रचलेल्या कथा विशेष आहेत. निसर्गातील नित्य बदलणाऱ्या घटना, चमत्कार ऋतूत होणारे बदल. यातून निर्माण झालेली त्यांची जीवनशैली आणि संस्कृती जपणारी माणसे आजही आदिवासींमध्ये आहेत. त्यांना जगाच्या समृद्धीविषयी किंवा ऐश आराम याविषयी काहीही देणे-घेणे नाही. त्यांनी डोंगरदऱ्या, जंगले अशा निसर्ग रम्य वातावरणाला आपल्या स्वच्छंद जीवनाचा भाग बनवले आणि कळत-नकळत त्यांच्या संस्कृतीशी त्याची नाळ जोडून त्याचे जीवापाड पालन केले. निसर्गातील प्रत्येक घटकाला, तत्त्वाला देव मानून त्याची उपासना करण्याची मानसिकता त्यांच्या लोकसाहित्यातून व विधी प्रकारांमधून दिसून येते. म्हणूनच आदिवासीच्या जीवनात नृत्याला जे स्थान आहे ते इतर कोणत्याही समाजामध्ये पाहायला मिळत नाही. मनोरंजन आणि अध्यात्म या दोन प्रमुख प्रेरणा त्यांच्या लोकसाहित्याच्या कला निर्मितीच्या मागे दिसून येतात.