हायकोर्टाच्या आदेशानंतर शहरातील १४१ हॉटेल पालिकेच्या रडारवर
मुंबई : संपूर्ण जगाला प्रदूषणाचा विळखा बसलेला आहे. प्रदूषणामुळे आरोग्याच्या तक्रारीदेखील वाढत चालल्या आहेत. मुंबईतही वायूप्रदुषणात वाढ झाली आहे. प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने तोडगा काढला आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात तंदूर भट्ट्या आहेत. या भट्ट्या प्रदूषणासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे तंदूर भट्ट्या बंद करण्याचे आदेश महानगर पालिकेने दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून हॉटेलच्या हद्दीत विविध तंदूर खाद्यपदार्थ करून प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या हॉटेल मालकांनाही नोटीस बजावली जात आहे. जानेवारी २०२५ पासून ते २७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ४१४ हॉटेलना नोटीस बजावली आहे.
लाकूड, कोळसा यांचा इंधन म्हणून उपयोग करणाऱ्या बेकरी, हॉटेल, उपाहारगृहे, उघड्यावर खाद्यपदार्थ विकणारे व्यावसायिक हेदेखील वायू प्रदूषणास कारणीभूत ठरतात. लाकूड, कोळसा किंवा मोडीत निघालेले फर्निचर यांचादेखील इंधन म्हणून उपयोग करतात. त्यातून घातक वायू बाहेर पडतात. ही बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने या प्रकारच्या प्रदूषणाची गांभीर्याने दखल घेतली आणि ९ जानेवारी रोजी आदेश देत ८ जुलैपर्यंत लाकूड व कोळसा आधारित सर्व हॉटेलना कायमस्वरूपी पर्यायी स्वच्छ इंधनाचा अवलंब करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने ४१४ हॉटेलना नोटीस बजावून पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक आणि पीएनजीवरील शेगड्या वापरण्यात याव्या, असे आदेश देण्यात आले आहेत.
लाकूड, कोळशाचा वापर करून पावासारख्या पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या बेकऱ्यांनाही नोटीस बजावली जात आहे. मुंबईतील २६९ बेकऱ्यांना याप्रकारे नोटीस बजावली आहे, न्यायालयाचे आदेश येण्यापूर्वीच मुंबईत मागील तीन महिन्यात सुमारे ३५० बेकऱ्यांपैकी २९ बेकऱ्यांनी स्वतःहून लाकूड, कोळसा यांचा वापर बंद करून हरित इंधन स्वीकारले आहे.
मुंबईत १६ हजारांपेक्षा अधिक लहानमोठे हॉटेल असून आतापर्यंत ४१४ हॉटेलना यासंदर्भात नोटिशी बजावल्या आहेत. यापैकी सर्वाधिक म्हणजे, ६१ नोटिशी ड महापालिकेच्या ई वॉर्डमधील भायखळ्यातील हॉटेलांसाठी बजावल्या आहेत. तर वरळी, प्रभादेवी, महालक्ष्मी, लोअर परळ या जी दक्षिण वॉर्डमध्ये १०७ हॉटेलांना नोटिशी बजावल्या आहेत. तर कुर्ला वॉर्डमध्ये ६३, परळ, लालबाग या एक दक्षिण वॉर्डमध्ये ४३ आणि सांताक्रूझ, खार, वांद्रे पूर्व या एच पूर्व वॉर्डमधील २६ हॉटलांना नोटीस देण्यात आली आहे.






