मुंबई : विशेष लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबईतील न्यायालयाने शेअर बाजारातील फसवणूक आणि नियामक उल्लंघनाच्या आरोपाखाली सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि इतर पाच अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले. नियामक त्रुटी आणि संगनमताचे प्रथमदर्शनी पुरावे आढळले आहेत. या प्रकरणी निःपक्षपाती चौकशी व्हावी यासाठी एफआयआर नोंदवण्याचे निर्देश विशेष न्यायाधीश शशिकांत एकनाथराव बांगर यांनी दिले. न्यायालयाने तपासावर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि ३० दिवसांच्या आत अहवाल मागवला आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार, महिला सुरक्षेचा मुद्दा गाजणार
शेअर बाजारातील व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखली जाईल आणि नियमांचे पालन केले जाईल याची खबरदारी घेण्याची जबाबदारी सेबीची आहे. पण सेबीच्या अधिकाऱ्यांनी संगनमत केले. त्यांनी बाजारातील फेरफारला चालना दिली आणि निर्धारित निकषांची पूर्तता न करणाऱ्या कंपनीची लिस्टिंग करण्यास परवानगी देऊन कॉर्पोरेट फसवणुकीला चालना दिली. यामुळे आर्थिक फसवणूक, नियामक नियमांचे उल्लंघन आणि भ्रष्टाचार झाला; अशी तक्रार प्रसारमाध्यमातील एका प्रतिनिधीने केली. या तक्रारीआधारे केलेल्या प्राथमिक सुनावणीअंती विशेष न्यायाधीश शशिकांत एकनाथराव बांगर यांनी चौकशीसाठी एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले.