स्नेहधारा – पूनम राणे
माणसाला जगण्याचं बळ विज्ञान देते. पण जगण्याला अर्थ देण्याचे काम धर्म करतो. ‘‘आपल्या समृद्ध जीवनाला आत्मज्ञानाचा स्पर्श होऊन विश्व कल्याणाचे पसायदान गावे”. असा विचार करणाऱ्या बालकाची आजची ही कथा.
“बाळा, तुला मोठेपणी कोण व्हावेसे वाटते?”
इतक्यात, त्याच्या समोरून एक रथ निघून गेला. मुलाने रथाकडे बोट दाखवत चटकन उत्तर दिले. मला रथातील सारथ्यासारखं, सारथी व्हावसं वाटतं.” घरी आल्यावर, भिंतीवरील कृष्ण अर्जून रथात बसल्याचे चित्र दाखवत, आई म्हणाली,” “बाळा, तुला सारथी व्हावसं वाटतंय!” जरूर हो!” मात्र कृष्णासारखा!” जो जगाचा रथ हाकतो आहे, आणि अर्जुनाला मार्गदर्शन करतो आहे.”
हे बालक म्हणजे, दिव्य वाणीचा साक्षात्कार झालेला विश्वात वंदनीय असणारे, असामान्य प्रतिभा लाभलेले, आपल्या ओजस्वी वाणीने शिकागोची परिषद गाजवणारे कर्मयोगी स्वामी विवेकानंद.
लहानपणी ते अत्यंत दयाळू होते. प्राणीमात्रांवर विलक्षण प्रेम होते. डबक्यात पडलेल्या छोट्या कुत्र्याच्या पिल्लाला त्यांनी जीवदान दिले होते.
आई त्यांना रोज रामायण महाभारताच्या कथा सांगत असे. त्यांना कीर्तन, भजन आवडत असे. कीर्तन ऐकणं हा त्यांचा छंद होता. एकदा ते कीर्तन ऐकण्यास गेले असता, कीर्तनकार बुवांनी मारुतीरायांची श्रीरामांवर भक्ती कशी होती, हा प्रसंग छान उलगडून दाखवला. मारुतीराया केळीच्या वनात राहतो, त्यांना केळी आवडत असे. असे कीर्तनकाराने सांगितले. कीर्तन संपताच स्वामी केळीच्या वनात गेले. रात्र होत आली होती. मात्र तिथे मारुतीराया न आल्याने ते निराश होऊन घरी परतले. आईला झालेला वृत्तांत कथन केला. आई म्हणाली, ‘‘बाळा, केळी आवडतात म्हणून मारुतीराया थोडाच केळीच्या बागेत बसून राहणार!” अरे रामरायाने त्याला दुसरं काम सांगितलं असेल!” त्यामुळे ते तिथे आले नाहीत. आईच्या सकारात्मक विचार शैलीचा परिणाम स्वामींवर बालपणापासून होत होता. कॉलेजमध्ये ते एक हुशार तल्लख बुद्धीचे विद्यार्थी म्हणून गणले जात होते. प्रा. हेस्टी यांच्या मुखातून निरव शांतता, म्हणजे समाधी, या शब्दाचा अर्थ उलगडताना, रामकृष्ण परमहंस, नावाची ओळख झाली आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात गुरुरूपी पौर्णिमेच्या चांदण्यांची बरसात रामकृष्णांच्या रूपात झाली.
शास्त्र, गुरू आणि मातृभूमी ही त्यांच्या जीवनातील प्रेरणास्थानं होती. शिक्षण म्हणजे, मानवाच्या अंगी जे सुप्त पूर्णत्व आहे, त्याचे प्रकटीकरण आहे. युवकांना जीवनविषयक बोध देताना ते म्हणत, जीवन ही चैनीची वस्तू नाही, तर कर्तव्याची भूमी आहे. नियमितपणा, निश्चय आणि आत्मबळ ही यशाची जननी आहे. स्वतःचा विकास करा. कारण गती आणि वाढ जीवंतपणाचे लक्षण आहे. श्रीमंती वाऱ्यावर उडून जाते. मात्र चारित्र्य कायम टिकते. बुद्धीवादाचा ध्वज तरुणांनी अवश्य हाती घ्यावा. मात्र त्याच्या निशाणाची काठी त्याग असावा आणि हे जग सोडून जाण्यापूर्वी आपल्या स्वतःच्या ओळखीची खूण मागे ठेवून जा.
साधेपणाने जगणाऱ्या, विनयाने वागणाऱ्या, विवेकानंदांची आजच्या आधुनिक युगात गरज आहे. त्यांचे व्यक्तित्व हे एका लेखात सामावणारे नाही. तो एक अथांग सागर आहे. या सागराच्या जीवनचरित्राचा अभ्यास आजच्या युवकांनी केला तर निश्चितच राष्ट्र घडणीत हातभार लागेल.