भालचंद्र ठोंबरे
ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांपैकी एक असलेल्या दक्ष प्रजापतीचा जन्म ब्रह्मदेवाच्या दक्षिण अंगठ्यापासून झाल्याचा पुराणात उल्लेख आहे. दक्षाचा पहिला विवाह स्वायंभुव मनुची तिसरी कन्या प्रसूती सोबत झाला. कल्पांतरानंतर दक्षाने महादेवाची अवज्ञा केल्यामुळे आपल्या पहिल्या शरीराचा त्याग करून पृथू वंशात प्रचेताचे पुत्र म्हणून जन्म घेतला असा उल्लेख ही श्रीमद्भागवत पुराणात आहे. पृथूच्या वंशात बर्हिषद नावाचा राजा होऊन गेला. हा यज्ञाधिक कर्मकांडात व योगाभ्यासात प्रवीण होता. पुढे हाच प्राचीनबर्ही नावाने प्रसिद्ध झाला. त्याने समुद्रकन्या शतद्रूतीशी विवाह केला. शतद्रूतीपासून प्राचीनबर्हिला प्रचेत नावाचे १० पुत्र झाले ते सर्वजण धर्मज्ञ आणि एक सारखेच नाव आणि आचरण असणारे होते. ब्रह्मदेवाने सृष्टीच्या निर्मितीचे काम प्राचीनबर्हिला सोपविले होते. प्राचीनबर्हिने तेच काम प्रचेतास सांगितले. परंतु प्रचेतांना याचे काहीही ज्ञान नव्हते. त्यामुळे प्राचीनबर्हिने त्यांना विष्णूची आराधना करण्याच्या सल्ला दिला. त्याप्रमाणे त्यांनी दहा हजार वर्षे तप केले. अखेर श्रीहरी त्यांना प्रसन्न झाले व तुम्ही मोठ्या प्रसन्नतेने आपल्या पित्याची आज्ञा शिरोधार्य मानलीत. त्यामुळे तुमची श्रेष्ठ कीर्ती सर्व लोकात पसरेल असे सांगून त्यांना एक पराक्रमी पुत्र होईल असा आशीर्वाद दिला.
प्रचेत्याने समुद्राच्या बाहेर येऊन पाहिले असता पृथ्वी उंचच उंच वृक्षाने पूर्णपणे वेढलेली दिसली. हे पाहून प्रचेत्याला क्रोध आला. त्यांने आपल्या मुखाद्वारे प्रचंड वायू व अग्नी सोडला. त्यामुळे वृक्ष उन्मळून पडले व जळू लागले. हे पाहून ब्रह्मदेवांनी येऊन त्यांना शांत केले. माझा भक्त असलेल्या तुमच्या पित्याने तुम्हाला संतान उत्पन्न करण्याची आज्ञा केली असल्याने तुम्ही प्रम्लोचा अप्सरेला कंडू ऋषीपासून झालेल्या व त्या अप्सरेने टाकून दिलेल्या आणि वृक्षांनी पालन केलेल्या मारिषी या वृक्षकन्येशी विवाह करावा असा सल्ला दिला. त्याप्रमाणे प्रचेत्याने मारीषीसोबत विवाह केला. तिच्यापासून त्यांना एक तेजस्वी पुत्र झाला. ब्रह्मदेवानेच त्याला प्रजापतीचा नायक घोषित केले. तो कर्म करण्यास अत्यंत दक्ष होता म्हणून त्याचे नाव दक्ष प्रजापती पडले. दक्षाने प्रथम संकल्पाने पाणी, जमीन, असुर, आदी प्रजा निर्माण केली. मात्र पुढे सृष्टीची वाढ होत नसल्याचे पाहून तो विंध्यचलाच्या टेकडीवरील अघमर्षण तीर्थस्नानी तपश्चर्या करू लागला. त्याने भगवंताला प्रसन्न केले. भगवंताने त्याला नऊ प्रजापतींपैकी पंचजन या प्रजापतीची कन्या असिक्नीशी विवाह करून प्रजोत्पादन करण्याचा सल्ला दिला. तसेच यापूर्वी मन, इच्छा व स्पर्शाच्या साह्याने प्रजोत्पादन होत असे मात्र यापुढे स्त्री व पुरुष संयोगाने प्रजोत्पादन होईल असा सल्ला व आशीर्वाद दिला. आसिक्नीपासून दक्षाला दहा हजार पुत्र झाले. त्यांना हर्यश्व असे म्हणतात. हे सर्व पुत्र एकाच आचरणाचे व एकाच स्वभावाचे होते. त्यांना प्रजापतीने सृष्टी निर्माण करण्यास सांगितले. ते पश्चिमेकडील सिंधू नदी व समुद्राच्या संगमावर नारायण सरोवर नावाचे तीर्थ होते तेथे तपश्चर्येसाठी जात असताना त्यांना वाटेत नारदमुनी भेटले. त्यांनी हर्यश्ववांना “नित्य मुक्त परमात्म्याला पाहिल्याशिवाय आणि त्याला शरण गेल्याशिवाय केल्या जाणाऱ्या कर्मापासून जीवाला काय लाभ होणार?’’ असा प्रश्न केला व मोक्षप्राप्तीसाठी प्रवृत्त केले.
हर्यश्व बुद्धिमान होते. त्यांनी नारदांच्या म्हणण्यातील गूढार्थ ओळखला. हर्यश्वांना त्यांचे म्हणणे पटले व ते मोक्ष प्राप्तीसाठी निघून गेले. हे ऐकून दक्षाला अत्यंत वाईट वाटले. शोकाकुल दक्षाला ब्रम्हदेवाने समजावले. तेव्हा दक्षाने असिक्नीपासून पुन्हा शबलाश्व नामक १००० पुत्र उत्पन्न केले. ते सुद्धा पित्याच्या ईच्छेने प्रजा निर्मितीसाठी आवश्यक त्या तपाचरणासाठी त्याच नारायण सरोवरापाशी गेले मात्र ते तयारीत असतानाच नारद पुन्हा आले आणि त्यांना सुद्धा मोठ्या भावांचे अनुकरण करण्याचा सल्ला दिला. जो धर्म जाणणारा भाऊ आपल्या मोठ्या भावाच्या श्रेष्ठ आचरणाचे अनुकरण करतो तो परलोकात मरूद्गणा सोबत आनंद उपभोगतो असे सांगितले. त्यामुळे शबलाश्वही विरक्त होऊन मोक्ष प्राप्तीसाठी निघून गेले.
यावेळीही नारदाने आपल्या मुलांना प्रजोत्पादनाच्या मार्गापासून विरक्त केल्याचे पाहून दक्षाला क्रोध आला. त्यामुळे दक्षाने नारदाला कोठेही एका जागी स्थिर न होण्याचा तसेच विविध लोकांत भटकत राहण्याचा श्राप दिला. त्यामुळेच नारद त्रिलोकात सतत भ्रमण करीत असतात.