Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलकावळ्याची भूक

कावळ्याची भूक

कथा – रमेश तांबे

एकदा एक कावळा आकाशात उडत उडत चालला होता. खरे तर त्याला खूप भूक लागली होती. पण सकाळपासून त्याला काहीच खायला मिळाले नव्हते. आज काही तरी चांगलं, चमचमीत खायला मिळेल म्हणून तो कितीतरी वेळ उडत होता. इकडे-तिकडे बघत होता. थोड्या वेळातच त्याला दिसला एक पोपट. लाल लाल चोचीचा, हिरव्यागार केसांचा. पोपट झाडाच्या फांदीवर बसून लाल मिरचीवर ताव मारीत होता. कावळ्याला वाटले चला काहीतरी खायला मिळेल म्हणून त्यांनी झपझप पंख हलवले. एका झटक्यात पोपटाच्या चोचीतली लाल मिरची पळवली आणि घातली तोंडात! पण ती मिरची इतकी तिखट होती की, त्याने कावळ्याचे तोंडच भाजले. कावळ्याने लगेच ती फेकून दिली. तलावात जाऊन गटागटा पाणी प्यायला अन् विचार करू लागला, “अरे बापरे हा पोपट एवढं तिखट कसे काय खातो बरे!”

आता कावळा पुन्हा उडाला. उडता उडता त्याला दिसली कोंबडी. कोंबडी जमिनीवर विंचवाला चोच मारीत होती. कावळ्याला वाटले कोंबडीचे खाणे चांगले असेल म्हणून त्याने झपझप पंख हलवले. कोंबडीचे खाणे अलगद पळवले. पण हाय रे दैवा! विंचवाने कावळ्याला असा काही डंख मारला की बस! कावळ्याच्या चोचीतूून विंचू खाली पडला. कावळ्याने आपले तोंड जमिनीला घासून वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला अन् विचार करू लागला, “अरे बापरे ही कोंबडी कशी काय खाते या डंख मारणाऱ्या प्राण्याला कोणास ठाऊक!”

कावळ्याने पुन्हा एकदा भरारी घेतली. हळुवारपणे पंख हलवत तो पुढे पुढे जात होता. इकडे-तिकडे बघत होता. इतक्यात त्याला दिसला बगळा. बगळ्याच्या चोचीत होता मासा! कावळ्याने थोडाही विचार न करता बगळ्यावर झडप घातली आणि त्याच्या जवळचा मासा पळवला. त्याने तो पटकन गिळला. पण तो कावळ्याला काही गिळता येईना. मासा अडकून बसला घशात! आता मात्र कावळ्याचा श्वास कोंडला. खोकून खोकून कसाबसा त्याने तो मासा घशातून बाहेर काढला आणि गेला उडून! “कावळ्याला कळेना कसे काय खातात हे बगळे असे मोठमोठे असे मासे!”

पुढच्या प्रवासात कावळ्याला अनेक पक्षी भेटले. त्यांचे खाणे त्याने पळवले. पण कावळ्याला काहीच खाता आले नाही. शेवटी कावळा गेला दमून. प्रचंड भूक लागली होती. आता काय खायचं याचा विचार करत असतानाच त्याला एक छोटी झोपडी दिसली. झोपडी बाहेरच्या झाडावर बसून तो कावकाव करू लागला. कावळ्याचा आवाज ऐकून थोड्याच वेळात झोपडीतून एक म्हातारी बाई बाहेर आली. तिच्या हातात जेवणाचं ताट होतं. तिचं जेवण झालेलं होतं आणि उरलेलं, उष्टं, खरकटं तिने त्या ताटात भरून ओसरीवर ठेवलं आणि ती घरात गेली. तसा कावळा उडाला आणि ताटावर जाऊन बसला. आता तो ते उष्टे, खरकटे खाणे आवडीने खाऊ लागला. त्याने पोटभर खाल्ले आणि जवळच्याच झाडावर बसून दिवसभर आराम केला. तेव्हापासून कावळा कष्ट न करता उष्टे, खरकटे खाऊ लागला आणि अल्पावधितच तो अस्वच्छ पक्षी म्हणून सर्वत्र ओळखला जाऊ लागला!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -