श्रद्धा बेलसरे खारकर
स्त्यावरून जाताना सिग्नलला भीक मागणारी अनेक मुले आपल्याला दिसतात. शाळकरी वयातली ही मुले शाळेत न जाता दिवसभर उन्हातान्हांत गाड्यांच्या मागे धावत असतात, हे दृश्य आपण सर्वांनी पाहिलेले असते. बार्शी इथे राहणाऱ्या महेश निंबाळकरांना अशी मुले दिसली की, त्यांच्यासाठी काहीतरी करावे असे वाटायचे. त्यांच्या भागात ऊस तोडणी कामगारही भरपूर आहेत. हे कामगार ६/६ महिने घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आबाळ होते. महेश एका शाळेत शिक्षक होते. त्यांना एकदा २५/३० मुलांचा घोळका शाळेबाहेर फिरताना आढळला. त्या मुलांना शाळेत प्रवेश मिळत नव्हता. कारण ती मुले वर्षातून ६ महिने वडिलांबरोबर ऊसतोडणीच्या पालावर राहत असत.
संवेदनशील मनाच्या निंबाळकरांनी २००७ मध्ये अजित फाऊंडेशन स्नेहग्राम प्रकल्प सुरू केला. त्यासाठी त्यांनी त्यांची सरकारी नोकरी सोडली. इतकेच नाही तर त्यांच्या पत्नीने विनयाने सुद्धा सरकारी कायम नोकरीचा त्याग केला. यामध्ये शिकलगार, पारधी, पाथरवट, डवरी, गोसावी या समाजातील मुले होती. भटक्या जमातीतील ही मुले कधी भीक मागत, काचकचरा गोळा करायची, प्रसंगी भुरट्या चोऱ्याही करायची. अनेकदा त्यांना लैंगिक शोषणाचे शिकारही व्हावे लागे. अनेक मुलांवर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत. दररोजच्या जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या लोकांकडे फक्त शिक्षणाचाच अभाव नव्हता, तर १८ विश्वे दारिद्र्य, कुपोषण, व्यसन, अंधश्रद्धा असे अनेक प्रश्न होते. शिवाय कुटुंबाना या मुलाकडून भीक मागून उत्पन्न मिळत असे. त्यामुळे ते मुले शाळेत पाठवायला तयार नसत. त्यांची मनधरणी करावी लागे. निंबाळकरांनी कोरफळ येथे एक छोटी जागा विकत घेतली आणि तिथे निवासी शाळा सुरू केली. त्यांच्या साथीला त्यांच्या पत्नी विनयाही बरोबर होती. ती जमीन माळरानावरची होती. आसपास ५ किलोमीटरच्या परिसरात वीजही नव्हती आणि पाणीही नव्हते. आधी त्यांनी पत्र्याच्या खोल्या बांधल्या. दररोज दूरवरून ४० घागरी पाणी आणावे लागे. असे करत करत अनेक संकटांना सामना देत हळूहळू शाळा सुरू झाली. पावसाळ्यात झाडे लावली. पण पुढे ती झाडे जगवायची कशी हा प्रश्न उभा राहिला. तेव्हा त्यांनी एक कल्पक उपाय केला. प्रत्येक मुलाला झाडे वाटून दिली. ती मुले सकाळी आपल्या झाडाजवळ अांघोळ करू लागली. अशा पद्धतीने झाडे जगली. कधीकाळी उघडाबोडका असलेला हा माळ हिरवागार झाला आहे. टीमवर्क ही संकल्पना विनयाताईंनी अमलात आणली. अडीच एकर जमीन स्वच्छ करण्यासाठी त्यांना तीन-चार तास लागत असत. मग त्यांनी ५ मुलांचा एक असे गट तयार केले.
एक मॉनीटर आणि त्याचे ४ सहकारी असे संघ तयार झाले. प्रत्येक गटाला स्वच्छतेचे काम दिले. दररोज अर्ध्या तासात साफसफाई पूर्ण होऊ लागली. शालेय अभ्यासक्रमातील पारंपरिक शिक्षण, तर दिलेच जाते शिवाय नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र याचे धडेही गिरवले जातात. नगराध्यक्ष, आमदार, सरपंच अशा विविध पदांवर काय काम केले जाते, त्याची माहिती मुलांना त्या त्या संस्थेची भेट घडवून आणून दिली जाते. या छोट्याशा शाळेत दरवर्षी विविध पदांसाठी निवडणुका घेण्यात येतात. त्यासाठी मुले उमेदवारी देतात, प्रचार करतात, मतदान करतात आणि मग निवडून आल्यावर नेमून दिलेली कामे पार पाडतात. या शाळेत ५ ते १४ वयोगटातली मुले आहेत. त्यांना संस्थेचा महिन्याचा खर्च दाखवला जातो. त्यावर चर्चा होते. त्यामुळे मुलांना पहिल्यापासून बचतीची सवय लागते. मुलांसाठी शाळेतच एक बँकही काढण्यात आली आहे. मला सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे इथे अभिरूप न्यायालय चालते. मुलांत भांडणे होतात, कुरबुरी होतात. असे काही घडले की, वादी आणि प्रतिवादी न्यायाधीशांसमोर उभे राहतात. त्यांची सुनावणी होते आणि न्यायाधीश दोषीला शिक्षाही सुनावतो. न्यायाधीश निकालपत्र सुवाच्य अक्षरात लेखी देतात. ही शाळा निवासी असल्यामुळे इथले जेवण सर्वांना आवडेल असे नसते. दररोजच्या दररोज जेवणासाठी मार्क दिले जातात. महिन्याच्या शेवटी मुले आपली इच्छा सांगतात. जसे की या महिन्यात आम्हाला आईस्क्रीम देण्यात यावे. काही मुलांच्या चपला फाटल्या आहेत त्यांना त्या नवीन आणून द्याव्यात. स्नेहग्रामचे एक छोटे स्टोअर रूम आहे. आलेल्या प्रत्येक वस्तूची नोंद इथे संगणकात होते. खर्चाची नोंद होते. ही सर्व कामे मुलेच करतात.
मुलांना विविध ठिकाणी भेटी द्यायला नेले जाते. त्याना खरेदी करण्यासाठी दुकानात नेले जाते. मुलांना खरेदी करण्याची घासाघीस करण्याची सवय लागते. एकदा एका मुलाने एक चाॅकलेट खरेदी केले आणि तिथेच खायला लागला. त्यावेळी तो त्याची पिशवी तिथेच विसरला. विनयाताईंनी ते बघीतले. त्यांनी दुकानदाराला सांगितले. उद्या सर येतील त्यावेळी पिशवी परत करा. घरी आल्यावर पिशवी हरवल्यामुळे तो मुलगा खूप रडला. पण त्या प्रसंगातून त्याला आणि सर्वांना आपले सामान आपण कसे जपायचे याचा धडा मिळाला. अशाप्रकारे मुलांना न रागावता शिस्त लावली जाते.
विनया आणि महेश हे दाम्पत्य या ४०/५० मुलांचे आई-वडीलच झाले आहेत. त्यांची स्वत:ची दोन मुलेसुद्धा या मुलांबरोबरच शिकतात. रस्त्यावर भिक मागणारे, छोट्या-मोठ्या चोऱ्या करणारे आणि अंधश्रद्धेचे हे उद्याचे भारतीय नागरिक घडवण्याचे काम फार आगळ्या-वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. २००७ साली बार्शी इथे सुरू झालेल्या अजित फाऊंडेशन‘स्नेहग्राम’ची शाखा आता तळेगाव-दाभाडे इथेही आहे. फार आगळे-वेगळे आणि मोलाचे काम निंबाळकर दाम्पत्य करत आहेत. त्यांना अजून कुठलीही सरकारी मदत मिळत नाही. लोकांच्या आधारावरच ही संस्था टिकून आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करून ही संस्था टिकवली आहे. कुणाला मदत करायची असल्यास खालील वेबसाईटवर संपर्क साधता येईल.
www.theajitfoundation.org