Thursday, July 3, 2025

सोबत : कविता आणि काव्यकोडी

सोबत : कविता आणि काव्यकोडी
आमच्या घरात प्रत्येकाची
वेगवेगळी छत्री
प्रत्येकाच्या आवडीची ती
देतेच जणू खात्री

आमच्या आईची छत्री
रंगीत फुलाफुलांची
पाऊस झेलून फुलं जणू
आणखी फुलून यायची

बाबांची छत्री काळी
आहे भलीमोठ्ठी
छत्रीत दोघे आले तरी
होत नाही दाटी

आमच्या ताईच्या छत्रीला
रंगीबेरंगी झालर
जणू काही इंद्रधनुष्यच
उतरलंय छत्रीवर

आमच्या दादाची छत्री
ओळखायला सोपी
छत्रीवरील चांदण्या
खेळतात लपाछपी

आजोबांच्या छत्रीची तर
काय सांगू बात
पाऊस असो, नसो
दिसते त्यांच्या हातात

आमच्या आजीची छत्री
आहे मात्र जुनी
ऊन-पावसाच्या केवढ्यातरी
ती सांगते आठवणी

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) उत्तर प्रदेशातील हे एक
ऐतिहासिक शहर
जगप्रसिद्ध ताजमहल
येथेच आहे, तर

फत्तेपूर सिक्रीतील पाहावी
स्थापत्यकला येथे
स्वादिष्ट पेठा
खायला मिळतो कोठे?

२) ‘भारताचे स्कॉटलंड’ म्हणून
प्रसिद्ध असलेले
सतत धुक्यांचे पांघरूण
वेढून बसलेले

हिरव्यागार टेकड्या
सुगंधी कॉफीच्या बागा
कर्नाटकातील हे थंड ठिकाण
कोणते आहे सांगा?

३) पंजाब, हरियाणा राज्याची
ही संयुक्त राजधानी
केंद्रशासित प्रदेशातला हा
प्रदेश देखील गुणी

सुंदर शहर म्हणून
हा प्रदेश आहे मानाचा
‘चंडीचा किल्ला’ असा
अर्थ कोणत्या शहराचा?

उत्तर -


१) आग्रा
२) कूर्ग
३) चंदिगड
Comments
Add Comment