डॉ. साधना कुलकर्णी
मराठी संपूर्ण महाराष्ट्रात बोलली जात असली तरी प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, खेड्यात तिचे रूप, बाज आणि लय वेगवेगळी असते. मराठीचा लहेजा उमजून बोलणाऱ्याचा प्रदेश दोन वाक्यांमध्येच ओळखता येतो. असे वेगळेपण असले तरी लिहिताना प्रमाण मराठी भाषाच वापरली जाते. मात्र शुद्ध मराठी लिहिणे आणि बोलणे प्रामुख्याने कुठे आढळते?… यंदाचे दिल्लीत पार पडलेले अखिल भारतीय साहित्य संमेलन नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टींनी गाजले. यंदाही साहित्यबाह्य विषयांवरील चर्चा बरीच गाजली. मात्र तूर्तास त्याकडे दुर्लक्ष करून विचार करता यानिमित्ताने अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी माणसाने मराठीकडे कोणत्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे, यासंबंधीचा किमान एक विचार तरी मिळाला, असे आपण म्हणू शकतो. याचे कारण म्हणजे या व्यासपीठावरुन सन्माननीय अध्यक्षांनी मराठी कोणत्याही एका चौकटीत बसणारी नसून ती सर्व बोलींना सामावून घेणारी असल्याचे ठणकावून सांगितले. याचा पुनरुच्चार करण्याची गरज होती, कारण आजही एक वर्ग आपण बोलतो तीच बोली शुद्ध असल्याचे मानतो आणि त्या तागडीत इतरांची भाषा कमी-अधिक वजनात तोलण्याचा प्रयत्न करतो. केवळ आपली बोली प्रमाणित नसल्याच्या गंडापोटी अनेक गुणी चेहरे प्रकाशात येत नाहीत. क्षमता आणि दर्जा असूनही त्यांचे काम लोकांपुढे येण्यावाचून राहते. ही बाब सर्व क्षेत्रांमध्ये कमी-अधिक प्रमाणात जाणवते. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या बोलीचा अभिमान आणि स्वाभिमान बाळगणे गरजेचे वाटते.
आपली मराठी बोली संपूर्ण महाराष्ट्रात बोलली जात असली तरी प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, खेड्यात तिचे रूप, बाज आणि लय वेगवेगळे असते. दोन वाक्यांमध्येच मराठीचा लहेजा उमजून बोलणाऱ्याचा प्रदेश ओळखता येतो. असे वेगळेपण असले तरी लिहिताना ‘प्रमाण मराठी भाषाच वापरली जाते. मात्र शुद्ध मराठी लिहिणे आणि बोलणे प्रामुख्याने कुठे आढळते? उत्तर द्यायची गरज आहे? प्रमाण किंवा शुद्ध मराठी ही पुण्यातच बोलली जाते हे ब्रम्हवाक्य आहे, नाही का? यावर कुणाचे दुमत आहे का? पुण्यामधील जाहिरातींमध्ये किंवा ठळक पद्धतीने समोर येणाऱ्या काही वाक्यांमध्ये अलीकडे बऱ्याच त्रुटी पाहायला मिळाल्या. त्यानिमित्ताने शुद्ध मराठीचा विचारच करायचा नाही का, असा सवाल मनात उभा राहिला.
बरं. हल्ली तर शुद्ध मराठीचा आग्रह धरणाऱ्याची टिंगल केली जाते. ‘भावना पोहोचणे महत्त्वाचे, व्याकरण नाही’ ही आजची टॅगलाईन आहे. त्यामुळे अनेक धेडगुजरी शब्दांना समाज मान्यता मिळाली आहे. समोरचे दुकान पंक्चर दुरुस्तीचे आहे हे कुणालाही चटकन कळते. मग पाटी लावण्याचा उद्देश पूर्ण होत असेल तर शब्द चूक लिहिले तरी काय हरकत आहे, असा प्रतिवाद आजकाल केला जातो. पण याच पाटीवर अज्ञात लेखकाने ‘संपर्क’ हा शब्द मात्र अचूक लिहिला. त्याबद्दल त्याची पाठ थोपटली पाहिजे, कारण रफार या शत्रूने अनेकांचा फार्फार छळ केलाय. हर्षवर्धन, धैर्यवर्धन, सुदर्शन, अंतर्नाद, निसर्ग इ. रफार असणारी शब्दावली काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट हो.) टाकावी, अशी मागणी पीडितांनी केल्याचे मी ऐकले आहे. आता ‘आशीर्वाद’ हा शब्दच बघा ना. किती सकारात्मक, उत्साह वाढवणारा शब्द, पण तो बरेचदा ‘आर्शीवाद’ असा चुकीच्या पद्धतीने लिहिला जातो.
जे शापित आयुष्य ‘रफाराला’ लाभले, तसेच नशीब अनुस्वाराचेही आहे. एका ठिकाणी वाचायला मिळालेला ‘ज्वलनशील’ हा शब्द काहीजणांना कोड्यात पाडणारा आहे. अनेकजण नेमक्या कोणत्या अक्षरावर अनुस्वार द्यावा, या गोंधळात असतात. त्यात काही चतुर विद्वान दोन अक्षरांमध्ये त्याला बसवून वाचणाऱ्याच्या कोर्टात बॉल टाकतात. ‘अंतरंग, रंगपंचमी जंगल’ ही अशीच काही शापित मंडळी आहेत, जी आपल्यासमोर अंतरंग, रंगपचंमी, जगंल या स्वरूपात येतात… ‘जोडाक्षरे’ तर मराठी लिहिणाऱ्याच्या कुंडलीतील दुष्टग्रह, पापग्रह आहेत असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. आता एका प्रसिद्ध मंदिरातील पाटी आठवली. वास्तविक, मंदिरातील पुजारी मंडळींचे मराठीच नव्हे तर संस्कृतही अस्खलित असते, अचूक सुस्पष्ट असते; पण त्या शाश्वताला ‘श्वाश्वताची’ शिक्षा का दिली हे त्या मंदिरातील देवच जाणे. ‘सद्सदविवेक’, ‘दृष्टद्युम्न’, ‘तादात्म्य’, ‘पुनरुज्जीवन’ इत्यादी ‘शब्दोत्तम’ अचूक लिहिण्याची आणि वाचण्याची स्पर्धा ठेवल्यास भाग घेणाऱ्यांनाच बक्षीस द्यावे लागेल. (कारण कुणी भाग घेण्याची हिम्मतच करणार नाही.)
मराठी लिखाणाची अशी दाणादाण उडवणाऱ्या पाट्या बघताना मला जुन्या काळातल्या ‘अमृत’ मासिकातील ‘मुद्राराक्षसाचा विनोद’ आठवतो. कामाच्या दबावामुळे एका ‘दैनिकाची’ आत्महत्या! (सैनिकाची). ‘सर’ नाही त्याला डर कशाला? (कर). ‘चरावे’ परी कीर्तिरूपे उरावे (मरावे)… अशा गंमती पूर्वी मुद्रण (अर्थातच टायपिंग/ प्रिंटिंग) करताना होत असत. पूर्वी अगदी अपवादाने घडणारे मुद्राराक्षसाचे विनोद हल्ली सर्रास घडताना दिसतात. किंबहुना, मुद्राराक्षसांची संख्या आता वेगाने वाढू लागली आहे. इंग्रजी आद्याक्षरे वापरून मराठी लिहिणे ही सध्याची फॅशन असल्याने देवनागरी लिपी लिहिण्याची सवय आता मोडली आहे. भाषा ही बोलण्यापेक्षा लिहिताना कठीण असते. पण अशी परिस्थिती असतानाही मराठीला दोष दिला जातो.
मुद्राराक्षसांमुळे भाषेत विनोदनिर्मिती होते हे एका ठरावीक पातळीपर्यंत मान्य आहे. पण उपसंपादकांनी डुलकी घेणे मात्र अक्षम्य आहे. ‘प्रूफ रीडिंग’ म्हणजे प्रकाशित करण्याआधी तपासलेले लिखाण. मग ते पुस्तक असो वा चार शब्दांची पाटी, प्रूफ रीडिंग टाळले की चुकीची भाषा समोर येते. नुकताच मराठीत ‘सलाते सलानाते’ या नावाचा चित्रपट आला. चित्रपटाचा विषय नेमका काय आहे याची कल्पना नाही, पण नाव मात्र आगळेवेगळे आहे. त्या नावाने मला एकदम माझ्या शाळेत मराठीच्या व्याकरणाच्या वर्गात नेऊन बसवले. ‘सलाते सलानाते’ हे विभक्ती प्रत्यय असून द्वितीय विभक्तीचे एक व अनेक वचनाचे प्रत्यय आहेत. विभक्ती, समास, कर्तरी-कर्मणी प्रयोग, काळ, नाम हे व्याकरण शिकताना त्या वयात वैताग येत असे. पण आता लक्षात येते की, व्याकरण हे भाषेचे हार्डवेअर असते आणि ते जितके मजबूत, तितकी भाषा अचूक होते.
मराठी पाट्या आणि विनोद हा विषय हसण्यावारी नेण्यासारखा असला तरी भाषेचे हे विडंबन खेदकारक आहे. त्याहीपेक्षा सुधारणा न करता ते चालवून घेणे ही वृत्ती अधिक गंभीर आहे. वर्षानुवर्षे सार्वजनिक ठिकाणी चुकीच्या मराठी पाट्या असणे हे मराठी भाषेला गौणत्व दिल्यामुळे घडते. मायबोलीला मनात स्थान नसणे, मराठी म्हणजे ‘लो स्टँडर्ड’ असा गैरसमज बाळगणे या वृत्तीमुळे आपणच मराठीचा स्तर वाढू देत नाही. आता तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. आपण भाषाप्रेमींनी मराठीचे केवळ गोडवे गाण्यापेक्षा शक्य त्या ठिकाणी सुधारणा करणे आणि मराठीचा अभिमान बाळगणे अपेक्षित आहे.