मेघना साने
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ‘सरहद, पुणे – दिल्ली’ आयोजित ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२, २३ फेब्रुवारी, २०२५ रोजी संपन्न झाले. या संमेलनाला महाराष्ट्र, गोवा, गुजरात अशा अनेक प्रांतांतून मराठी साहित्य संस्थांची मंडळी आणि कवी मंडळी यांनी हजेरी लावली होती. महाराष्ट्रातील मोठ्या लेखकांची उपस्थिती फारशी जाणवत नव्हती. साहित्यावर कार्यक्रम विरळाच होते. मराठी भाषा, महाराष्ट्र धर्म, कृत्रिम बुद्धिमत्ता व सर्जनशीलता अशा विषयांवर परिसंवाद होते. त्यामुळे प्रतिनिधी शुल्क भरलेली बरीचशी मंडळी कवी संमेलन झाल्यावर दिल्ली दर्शन करावयास गेली होती. २१ तारखेला सकाळी १० वाजता तालकटोरा स्टेडियममध्ये जेव्हा दिंडी येणार होती, त्यावेळी प्रांगणात जमलेल्या सर्व कवी, लेखक मंडळींची एकच विचारणा चालू होती की, पंतप्रधान मोदी यांचे उद्घाटनपर भाषण विज्ञान भवनात होणार आहे. त्या कार्यक्रमाचा पास मिळाला आहे का? अर्थात पास नक्की कोणाला दिले जाणार आहेत याचे नियम असे काही लक्षात येत नव्हते. मात्र आमचे भाग्य असे की, आम्हाला पास न मिळूनसुद्धा तालकटोरा स्टेडियमच्या छोट्या मंडपात बसून आम्हाला पंतप्रधान मोदी यांचे भाषण प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेसह पाहायला मिळाले. कारण विज्ञान भवनातील कार्यक्रम तिथे स्क्रीनवरून प्रक्षेपित होत होता. संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी छोटंसं भाषण केलं. त्यावेळी त्या म्हणाल्या, “महाराष्ट्रात मराठी भाषेच्या निरनिराळ्या बोली आहेत. सगळ्या बोलीचं संमेलन म्हणजे अखिल भारतीय मराठी संमेलन होय. मराठी भाषा ही आपल्या संतांनी टिकवली. अभंग, ओव्यांच्या माध्यमातून, मौखिक परंपरेने ती पुढे नेली. पंतप्रधानांना आम्ही विठ्ठलाची मूर्ती भेट दिली आहे. कारण या विठ्ठलाच्या पायाशी सर्व जातीपातींचे भक्तगण एकत्र येतात. तिथे लहान मोठा कुणीच राहात नाही.” डॉ. तारा भवाळकरांच्या भाषणाला वाक्यावाक्याला टाळ्या पडत होत्या. तो सारा माहोल पाहून व्यासपीठावर बसलेल्या महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. उषाताई तांबे आणि डॉ. उज्ज्वला मेहेंदळे या हरखून गेल्या होत्या. त्यानंतर मोदींचे भाषण सुरू झाले. “भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती संस्कृतीची वाहक असते. भाषा समाजात जन्म घेते पण समाजालाच घडवत असते.” अशा सुंदर विचारांनी सुरू झालेले ते भाषण म्हणजे आमच्यासाठी कौतुकाचा आणि अभिमानाचा कुतुब मिनारच होता. मराठी भाषेबद्दल ते बोलू लागले.
“मराठी में शूरता भी है, वीरता भी है
मराठी में सौंदर्य भी है,
संवेदना भी है
मराठी में समानता है,
समरसता भी है
और अध्यात्म के स्वर भी है”
त्यांच्या ओघवत्या वाणीने सभा मंत्रमुग्ध झाली होती. विज्ञान भवनातील उपस्थित मराठी साहित्यिकांना, कार्यकर्त्यांना त्यांनी ‘विद्वतजनहो’ म्हणून संबोधिले होते. ‘भाषा एकमेकींना शब्दांचे आदानप्रदान करतात, विचारांचे आदानप्रदान करतात आणि समृद्ध करतात. त्यांच्यात वैरभाव नसतोच. तसेच आपणही विविध भाषांना आपलेसे करून घेतले पाहिजे.’ अशा विचाराने मोदीजी भाषणाच्या शेवटाकडे आले. मराठीतील अनेक साहित्यिकांची नावे घेऊन मराठी भाषेच्या प्रगतीचा एक आलेखच त्यांनी सर्वांसमोर ठेवला.
मोदीजींचे भाषण ऐकून आम्ही समृद्ध झालो. तालकटोरा या भव्य स्टेडियममध्ये उद्घाटन सत्राचा दुसरा भाग सुरू झाला. संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांचे भाषण ऐकायला खूप गर्दी झाली होती. स्त्रियांच्या ओव्यांमधून निर्माण झालेले लोकसाहित्य, आजच्या काळात त्याचे महत्त्व, स्त्रीमुक्तीचा विचार, लोक आणि अभिजात यातील फरक आणि साम्य, कृत्रिम बुद्धिमत्ता, अर्थोत्पादनातील स्त्रियांचा सहभाग अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर विवेचन केले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. त्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “हा दर्जा मिळाल्यामुळे जे काही कोटी रुपये मिळणार असतील त्यातून निरनिराळ्या बोलींचा अभ्यास करणारी एक संस्था निर्माण व्हायला पाहिजे.” त्यांचे भाषण ऐकताना सगळ्यांचाच वेळ कारणी लागत होता. उशिरा सुरू झालेला हा कार्यक्रम लांबणार असे आधीच माहीत असल्याने निमंत्रितांचे कविसंमेलन दुसऱ्या दिवशी होईल असे जाहीर करण्यात आले. दुसऱ्या दिवशी याच स्टेडियमच्या मोठ्या सभागृहात निमंत्रितांचे कविसंमेलन ऐकायला आम्ही उत्सुकतेने येऊन बसलो. पण कवींच्या कवितांमधून या युगासाठी खास असे काही मिळाले नाही. बाहेर एका छोट्या मंडपात कवी राजन लाखे हे दरवर्षीप्रमाणे कविकट्ट्याचा कार्यक्रम सांभाळीत होते. १३४६ कवितांमधून निवडलेले १६० कवी कवितेची बाजी लढवीत होते. मधेच केव्हा तरी खासदार सुप्रिया सुळे कविकट्ट्यावर हळूच येऊन बसल्या. त्यांनी काही कविता ऐकल्या. मग अर्थातच आयोजक राजन लाखे यांनी त्यांना व्यासपीठावर बोलावून काही कवींचा प्रातिनिधिक सत्कार त्यांच्या हस्ते केला. एक आनंदाची लहर सभागृहात पसरली. तिकडे मोठ्या सभागृहात बहुभाषिक कविसंमेलन सुरू झाले. संकल्पना चांगली होती. पण जेवणाची वेळ होत आल्याने इथली गर्दी कमी होऊ लागली. मराठीत अनुवाद केलेल्या अनेक भाषांतील कविता ऐकायला मिळाल्या. बहुतेक कविता या स्व. कवी निरंजन उजगरे यांच्या अनुवादित कवितांच्या पुस्तकातील होत्या.
‘मराठी पाऊल पडते पुढे’ यामध्ये विविध क्षेत्रांतील उद्योजक आणि सेवा तज्ज्ञ सहभागी होते. मराठी माणसांसाठी जगामध्ये नोकरीच्या, व्यवसायाच्या अनेक संधी आहेत. संधी असते तसेच धोकेही असतात. करिअरच्या वाटा जपून चालाव्या लागतात. जागतिक बदलांचे संकेत लक्षात घ्यावे लागतात. अशा विविध मुद्द्यांवर मान्यवर चर्चा करीत होते. मीडिया प्रतिनिधी प्रसन्न जोशी यांनी सहभागी मान्यवरांना वेगवेगळे प्रश्न विचारून बोलते केले. २२ फेब्रुवारीला एका छोट्या मंडपात ‘आनंदी गोपाळ’ या विषयावर परिचर्चा चाललेली आढळली. खरं तर काळ इतका बदलला आहे की, प्रत्येक मध्यम आणि उच्चवर्गीय कुटुंबातील एखादी नातलग मुलगी किंवा मुलगा परदेशी शिक्षण घेत आहे. डॉ. आनंदी यांची भारतातील पहिली डॉक्टर म्हणून आठवण जरूर ठेवायला हवी. पण त्यावर परिसंवाद का ठेवावा हा प्रश्न मला पडला.
‘मनमोकळा संवाद : मराठीचा अमराठीचा संसार’ हा कार्यक्रम ऐकायला लोकांनी तोबा गर्दी केली होती आणि तो रंगलाही खूप. तसेच २२ तारखेस रात्री मधुरा वेलणकर यांचा मराठी कवितेचा प्रवास दाखवणारा ‘मधुरव’ या सुंदर कार्यक्रमाचा रसिकांनी आस्वाद घेतला. उशीर झाला होता आणि दिल्लीतील थंडी ‘मी’ म्हणत होती तरीही प्रेक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तालकटोरा येथील प्रांगणात सुरेख ग्रंथदालन उभारले होते. ते सर्वांच्या भेटाभेटीचे ठिकाण ठरत होते. सकाळ, दुपार, संध्याकाळ आम्ही तेथे फेरी मारत होतो. तेथील शेवटच्या स्टॉलवर चहा होता हेही एक कारण होते. अनेक प्रांतातील अनेक संस्थांचे लोक तेथे भेटत होते. कार्यक्रमांवर प्रतिक्रिया देत होते. मराठी साहित्याच्या दिंडीत आपण सहभागी आहोत याचे त्यांना समाधान वाटत होते.
२३ तारखेला समारोपाच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती लाभली होती. उपस्थितांना उद्देशून अजितदादा म्हणाले की, ‘सूर सच्चा असला पाहिजे. मग भाषेची अडचण येत नाही. आपल्या भाषेचा अर्थ दुसऱ्याच्या हृदयापर्यंत पोहोचतो.’ सीमा प्रश्नावर बोलताना डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, “सीमाभागात द्विभाषिक शाळा काढल्या पाहिजेत.’ समारोप समारंभात महामंडळाच्या कार्यकर्त्यांचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाषामंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.