मुंबई: आगामी ५ वर्षांमध्ये प्रदूषणविरहित स्मशानभूमी करण्याची योजना मुंबई महापालिकेने आखली आहे. ही माहिती बृहन्मुंबई महापालिकेचे पर्यावरण विभागाचे उपायुक्त राजेश ताम्हाणे यांनी दिली. मुंबईतील प्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेचे कान टोचले होते. त्यानंतर पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
संपूर्ण मुंबईमध्ये एकूण २६३ स्मशानभूमी आहेत. यातील २२५ स्मशानभूमीमध्ये पारंपारिक लाकडांचा वापर केला जाते. १० स्मशानभूमी विद्युत दाहिन्या आहेत. तर १८ स्मशानभूमींमध्ये गॅसदाहिनी आहेत. सोबतच २२५ लाकडी स्मशानांपैकी १४ स्मशानांमध्ये ब्रिकेट्स बायोमासचा इंद म्हणून वापर करण्याचा विचार मुंबई महापालिका कत आहे. यामुळे प्रदूषणात घट होऊ शकते असा दावा पालिकेने केला आहे. तसेच यामुळे लाकडांचीही बचत होऊ शकते.
स्मशानभूमीमध्ये जेव्हा एका मृतदेहाला अग्नी दिला जातो त्यावेळेस साडेतीनशे ते चारशे किलो लाकडे जाळावी लागतात. दरम्यान, बायोमासच्या वापरामुळे केवळ शंभर ते दीडशे किलो लाकूड वापरला जाईल. यामुळे २०० ते ३०० किलो लाकडाची बचत होईल.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाब्यांना आता तंदूर रोटी बनवण्यासाठी तंदूर कोळसा भट्टीचा वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने कोळसा भट्टी आणि लाकडी ओव्हनद्वारे स्वयंपाक करण्यास बंदी घातली आहे.