मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) प्रवाशांच्या सोयीसाठी मल्टी-लेव्हल कार पार्किंग (एमएलसीपी) मध्ये ऑटोमेटेड डिजिटल पेमेंट प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमुळे पार्किंगसाठी पेमेंट प्रक्रिया वेगवान, कॅशलेस आणि अधिक सोपी होणार आहे.
या उपक्रमामुळे भारत सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेला चालना मिळणार असून, एमएलसीपी वापरकर्ते मोबाइल वॉलेट्स, डेबिट/क्रेडिट कार्ड्स, यूपीआय आणि इतर डिजिटल पर्यायांचा वापर करून सहजपणे पेमेंट करू शकतात. पार्किंगमध्ये वेगवान प्रवेश आणि निर्गमन सुनिश्चित करण्यासाठी फास्टॅग काउंटर्स देखील उपलब्ध आहेत.
‘देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दिशेने वाढवण बंदर एक महत्त्वाचे पाऊल’
सध्या एमएलसीपीमध्ये ६६% वापरकर्ते फास्टॅगद्वारे पेमेंट करतात, तर १०-१५% वापरकर्ते यूपीआय किंवा कार्ड पेमेंटचा वापर करतात. याशिवाय, ५% वापरकर्ते पार्किंग स्लॉट प्री-बुक करतात. एकूणच, ८५% प्रवासी कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य देत असल्याने सीएसएमआयए रोख व्यवहार आणखी कमी करण्यासाठी भागधारकांसोबत काम करत आहे.
सीएसएमआयएच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, “मुंबई एअरपोर्ट स्मार्ट सोल्युशन्सच्या दिशेने पुढे जात असून, डिजिटल नाविन्यतेच्या माध्यमातून कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढवत आहे. एमएलसीपीमधील ऑटोमेटेड डिजिटल पेमेंट प्रणाली आधुनिक आणि सुविधाजनक पार्किंग अनुभव प्रदान करण्याच्या आमच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे.”