मुंबई : इंग्रजी व हिंदी चित्रपटांनी नेहमी गजबजून जाणारे व सुमारे १०५ वर्षाचा इतिहास असलेले काळबादेवी येथील ब्रिटिशकालीन एडवर्ड थिएटर (Edward Theatre) अखेर बंद झाले.
तब्बल १०० वर्षापेक्षा जास्त काळ तग धरून राहिलेल्या या थिएटरमध्ये (Edward Theatre) कोरोना महामारीनंतर प्रेक्षकांच्या शिट्या कधी ऐकू आल्याच नाहीत. मुंबई शहर व उपनगरात सिंगल स्क्रीनची काही चित्रपटगृहे उरली आहेत. यात ब्रिटिशकालीन एडवर्ड थिएटरचा समावेश आहे.
डबल बाल्कनी असलेल्या (Edward Theatre) या चित्रपटगृहाला प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून घेतले होते. गिरगाव, चिरा बाजार, चंदनवाडी, काठचादेवी या मराठी लोकवस्तीमध्ये असलेल्या या चित्रपटगृहाचा प्रवास थक करणाराच आहे. साधारणतः १९२० मध्ये हे चित्रपटगृह प्रेक्षकांच्या सेवेत दाखल झाले. २०२२ पर्यंत म्हणजेच कोरोना महामारीपर्यंत मा चित्रपटगृहामध्ये हिंदी, इंग्रजी चित्रपट झळकत होते. विशेष म्हणजे पूर्वी इतकी गर्दी राहिली नसली तरी प्रेक्षक आवर्जून या चित्रपटगृहातील बाल्कनीमधून चित्रपट पाहण्यासाठी आवर्जून येत होते. पण प्रेक्षक नसल्यामुळे बाल्कनीही बंद झाल्या.
हे चित्रपटगृह (Edward Theatre) फक्त स्टॉलपुरते मर्यादित राहिले, कालांतराने प्रेक्षकांपेक्षा रिकामी खुर्च्याच चित्रपट बघू लागल्या.कोरोना महामारीनंतर एडवर्ड थिएटर पुन्हा नव्या दमाने प्रेक्षकांच्या सेवेत उतरेल असे वाटत होते. पण या चित्रपटगृहांमध्ये चित्रपट झळकलाच नाही. आता या चित्रपटगृहाला उतरती कळा लागली असून हे चित्रपटगृह येणाऱ्या काळात इतिहासजमा होण्यास वेळ लागणार नाही. मुळात मल्टिप्लेक्स सिनेमागृहांमुळे सिंगल स्क्रीनचे चित्रपटगृह टप्प्याटप्प्याने बंद होत गेले. याला एडवर्डही अपवाद नाही.