पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेशासाठी निवड झालेल्यांपैकी आतापर्यंत केवळ ४६.५७ टक्के बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. या जागांवर बालकांच्या प्रवेशासाठी आणखी संधी मिळावी, म्हणून प्राथमिक शिक्षण विभागाने निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी आता मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पालकांना निवड यादीतील बालकांचे प्रवेश १० मार्चपर्यंत निश्चित करता येणार आहेत.
https://prahaar.in/2025/02/28/whatsapp-governance-now-in-maharashtra/
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९’ नुसार (आरटीई) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील आठ हजार ८६३ शाळांमधील एकूण एक लाख नऊ हजार ८७ रिक्त जागांसाठी तीन लाख पाच हजार १५२ अर्ज आले होते. त्यातील एक लाख एक हजार ९६७ बालकांची निवड यादी शिक्षण विभागाने जाहीर केली. आतापर्यंत निवड यादीतील केवळ ४७ हजार ४९२ बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने ही मुदतवाढ दिली असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले.