रवींद्र तांबे
महाराष्ट्र राज्यातील भीमशाहीर प्रभाकर भागाजी पोखरीकर, २४ फेब्रुवारी, २०२५ रोजी पहाटे ५च्या सुमारास दीर्घ आजाराने ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला, तर संध्याकाळी मुंबईतील दादर चौपाटीवरील स्मशानभूमीत (आताची चैत्यभूमी) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या अगोदर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी दुपारी घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगर येथे ठेवण्यात आले होते. अनेक ठिकाणी त्यांची गाणी गाऊन त्यांना आदरांजली वाहण्यात येत होती.
भीमशाहीर प्रभाकर पोखरीकर यांनी आपल्या जीवनात एक सुप्रसिद्ध गायक, संगीतकार, गीतकार, प्रबोधनकार अशी ओळख निर्माण केली. त्यासाठी त्यांनी शासकीय नोकरीवर लाथ मारली. त्यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील एक सशक्त आवाज कायमचा शांत झाला आहे. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनमोल संदेश आपल्या गीतांच्या माध्यमातून राज्यातील घराघरांत पोहोचवून आंबेडकरी चळवळ बुलंद व गतिमान करण्याचा भीमशाहीर प्रभाकर पोखरीकर यांनी केला. तसेच त्यांनी आपल्या मधुर आणि पहाडी आवाजातून सामाजिक परिवर्तनाचा आवाज उठवला. भीमशाहीर प्रभाकर पोखरीकर यांनी आपल्या विविध गीतांच्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन केले, त्याचबरोबर लोकांमध्ये जनजागृती व प्रबोधनाचे एक महत्त्वाचे कार्य केले आहे.
भीमशाहीर प्रभाकर पोखरीकर शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाण्याऱ्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील पोखरी गावी त्यांचा जन्म झाला. वडील घरी शिवणकाम करायचे. तरीपण त्यांनी अकरावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यांचे वडील कथा व ग्रंथांचे वाचन करायचेच, भजन गायचे त्यामुळे त्यांना वाचण्याची आणि गायनाची आवड लहानपणापासून निर्माण झाली. अत्यंत गरीब कुटुंब आणि दुष्काळी परिस्थितीमुळे वडिलांना गाव सोडावे लागले. आपल्या गावाहून ते प्रथम मुंबईतील भायखळा येथील साखळी ईस्टटमधील तिसरी गल्ली येथे राहायला आले. या ठिकाणी कवी लक्ष्मण राजगुरू राहत असल्यामुळे त्यांच्याजवळ राज्यातील नामवंत गायक येत असत. तसेच त्या ठिकाणी गायन पार्टीचा सराव चालत असे. त्यामुळे त्यांना अधिकच गाण्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर वडिलांनी कामाटीपुरा येथील ढोर चाळीतील पहिल्या गल्लीतील राहणारी मावशी पप्पाबाई थोरात यांच्या दारात टेलर मशीनवर शिवणकाम करू लागले. त्यावेळी मुंबईमध्ये कव्वालीचे कार्यक्रम रात्रभर व्हायचे. ते ऐकायला जात असत. त्यानंतर त्यांनी रेस्कोस समोर एक घर विकत घेतले. तेथे कवी रमेश खेडकर यांचा सहवास लाभला. त्यांनी भीमछाया गायन पार्टी स्थापन केली आणि त्यांचा गायनाचा प्रवास सुरू झाला. याकाळात वामनदादा कर्डक, श्रावण यशवंते, गोविंद म्हशीलकर, अप्पा कांबळे, हरेंद्र जाधव, नवनीत खरे, राजेश जाधव अशा अनेक महाकवी व गायकांचा सहवास त्यांना लाभला.
वडिलांचे टेलरिंगचे दुकान असून सुद्धा त्यावर अवलंबून न राहता त्यांनी एमटीएनएलमध्ये टेलिफोन ऑपरेटर म्हणून कामाला लागले. नंतर बीएमसीमध्ये नोकरीला लागले. मुळात गाण्यांची आवड असल्यामुळे सरकारी नोकरीपायी गाण्यांच्या कार्यक्रमांना जायला येत नव्हते. त्यामुळे बऱ्याचवेळा ते कामावर जायचे नाही. तसेच कधी कामाच्या वेळेच्या अगोदर यायचे किंवा उशिराने कामावर जायचे त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांचे व साहेबांचे बोलणे खायला लागायचे. इतके वेड गाण्यांचे त्यांना लागले होते. एमटीएनएलमधील त्यांचे साहेब एक दिवस त्यांना म्हणाले की, ‘गानाही गाओ, नोकरी क्यों करते हो, हमे आपका इंतजार करना पडता है, असे खडेबोल सुनावले. त्यांनी केलेला अपमान त्यांच्या जिव्हारी लागला. त्यांनी आपल्या साहेबांचे बोलणे संपल्यावर उत्तर दिले. ‘कल से आपको मेरा इंतजार नहीं करना पडेगा, असे बोलून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
जीवाला जीवाचं दान दिलं भीमाने, माणसाला माणूसपण दिलं प्रेमाने…, हे पाणी आणिले मी माठ भरूनी हे घोटभर जाहो पिऊनी…, वाट किती मी पाहू…, तुझ्या विना रमा…, भिमाई याद तुझी…, मातीचे सोने झाले भीमा तुझ्यामुळे…, यांसारख्या एकापेक्षा एक दर्जेदार गाण्यांमधून त्यांनी आंबेडकरी चळवळीला ऊर्जा दिली. तसेच त्यांनी लाखो आंबेडकरी तरुणांना प्रेरित केले आहे. त्यांनी आपल्या आजारपणाची तमा न बाळगता आयुष्यभर अविवाहित राहून आंबेडकरी चळवळीच्या प्रचारासाठी वाहून घेतले. स्वतःच्या सुखाकडे न बघता समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी आंबेडकरी चळवळीला आपले आयुष्य समर्पित केले होते. त्यांच्या लोकप्रिय गीतांनी महाराष्ट्राला वेड लावले आहे. प्रभाकर पोखरीकर हे भीमशाहीर होते. तसेच ते सामाजिक कार्यकर्ता सुद्धा होते. राज्यात दलित पँथरने सुरू केलेल्या चळवळींमध्ये त्यांनी भाग घेऊन लोकांना मदत केली. भीमशाहीर प्रभाकर पोखरीकर यांनी अनेक नव्या गायकांना आपली गाणी गाण्यांची संधी दिली. त्यापैकी एक म्हणजे सोनू निगम होय. त्यांना पण त्यांनी मराठी गाणी गाण्याची पहिली संधी दिली होती. आज देशात नव्हे तर जगभरात आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा गायक म्हणजे सोनू निगम होय. गायक सोनू निगम यांनी त्यांच्या ‘जीवाला जीवाचं दान’ या म्युझिक अल्बममधील गाणी गाऊन त्यांनी आपले करिअर सुरू केले आहे. या अल्बममधील दहा गाणी स्वत: भीमशाहीर प्रभाकर पोखरीकर यांनी लिहिली होती. त्यातील नऊ गाणी गायक सोनू निगम यांनी गायली आहेत. भीमशाहीर प्रभाकर पोखरीकर यांनी जे आंबेडकरी चळवळीला फार मोठे योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार त्यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आज जरी भीमशाहीर आपल्यात नसले तरी त्यांची अजरामर गीते तसेच त्यांचे विचार त्यांच्याच आवाजातून कायम जिवंत राहतील.
आज त्यांच्या निधनामुळे संपूर्ण आंबेडकरी समाजावर शोककळा पसरली आहे. या देशाला अखंड ठेवायचे असेल ते संविधानानेच ठेवता येईल. भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे. तथागतांचा धम्म व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हेच आपणांस तारू शकेल. त्यासाठी भीमनिष्ठा अंगीकारून बुद्ध विचारांचे अनुसरून करावे. देशालाच नाही तर जगाला बुद्धांच्या मानवतावादी व विज्ञानवादी धम्माची गरज आहे असा संदेश आंबेडकरी समाजाला देणारे आंबेडकरी चळवळीतील भीमशाहीर प्रभाकर पोखरीकर यांना निळा सलाम.