Wednesday, March 19, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखविकृती ठेचाच, पण सजगही व्हा

विकृती ठेचाच, पण सजगही व्हा

स्वाती पेशवे

पुण्यात स्वारगेटसारख्या गजबजलेल्या भागात, पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एसटीच्या आगारातील एका बंद बसमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रसंग महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नांकडे नव्याने रोख वळवणारा आहे. भल्या सकाळी घडलेल्या या घटनेमध्ये मुलीने अपरिचित व्यक्तीवर टाकलेला विश्वासही डोळेझाक करण्याजोगा नाही. म्हणजेच समाज आणि यंत्रणेबरोबरच महिलांनीही स्वत:ला संरक्षित ठेवायला हवे.

महिलांसंबंधी विनयभंग, अत्याचार, हिंसाचार वा बलात्कारासारख्या घटनांची वाढती वारंवारता बघता हे प्रकार कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व उपाययोजना फोल वा सपशेल अपयशी ठरत असल्याची भीती बळावल्याखेरीज राहत नाही. दिवसाच्या कोणत्याही प्रहरामध्ये, घरात अथवा घराबाहेर महिला असुरक्षित असल्याचे जळजळीत वास्तव अशा घटनांमधून पुढे होते. पुण्याच्या स्वारगेट आगारासारख्या गजबजलेल्या ठिकाणी पहाटेच्या वेळी तरुणीवर झालेल्या बलात्काराची घटना हाच प्रश्न अधोरेखित करते. स्वारगेट पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या स्थानकातील शिवशाही बसमध्ये नराधमाने केलेल्या अत्याचारामध्ये गावी निघालेल्या एका तरुणीने हा जीवघेणा प्रसंग अनुभवला आणि घटनेची तक्रार दाखल केल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले. मात्र फसवणुकीतून जाळ्यात अडकणाऱ्या, ‘ताई’अशा संबोधनामुळे अपरिचीताच्या मिठास बोलीला फसून त्याचे भक्ष्य ठरणाऱ्या अशा किती मुली असतील याचा थांग लागणे अशक्य आहे.

लवकरच या प्रकरणी अधिक माहिती समोर येईल. तसेच दोषीला पकडण्याची कारवाई पूर्ण होऊन योग्य ती शिक्षा ठोठावली जाईल. मात्र याने प्रश्न सुटणार नाही. कारण महिला परक्या व्यक्तीवर, त्याच्या मिठास वाणीवर किती भोळा विश्वास ठेवतात हे अशा घटना दाखवतातच, खेरीज आगारातील बंद गाड्यांमध्ये नेमके कोणकोणते गैरप्रकार चालतात, त्याला सुरक्षारक्षकांची मूक साथ कशी लाभते, लाखो रुपये खर्च करून बसवण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची स्थिती काय आहे, तरुणीने लगेचच मदत मागत आरडाओरडा केला असता, तर तिला साथ मिळाली असती का अशा एक ना अनेक प्रश्नांना ही घटना जन्म देते. संबंधित प्रकरणानंतर पीडित तरुणी दुसऱ्या एसटीने आपल्या गावी जाण्यास निघाली होती. मात्र वाटेमध्ये तिने हा सगळा प्रकार आपल्या मित्राला सांगितला आणि त्याच्या सल्ल्यानुसार उतरून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर तपासाची सूत्रे वेगाने हलली आणि सीसीटीव्ही फुटेजद्वारे मिळालेल्या माहितीवरून दत्तात्रय गाडे नामक सराईत गुन्हेगाराची ओळख पटवली आणि त्याला शोधण्यासाठी आठ पथके रवाना झाली. त्याच्यावर यापूर्वीही साखळीचोरी वा चोरीसारखे गुन्हे आहेत. शोधादरम्यान त्याच्या घरातून भावाला ताब्यात घेण्यात पोलिसांना यशही मिळाले. पुढचा घटनाक्रम समोर आहेच, मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर महिलांकडून वारंवार होणाऱ्या चुकांचा, दुसऱ्यावर अनाठायी विश्वास ठेवण्याच्या वृत्तीचाही विचार व्हायला हवा.

सदर घटनेमध्ये आरोपीने एकटीने प्रवास करणारी ही तरुणी हेरून ‘ताई’ अशी साद घातली आणि आपण या बसचे वाहक असल्याचे तसेच गेली १५ वर्षे हे काम करत असल्याचे सांगितले. त्यामुळेच बस नेहमीच्या फलाटावर लागलेली नसताना, त्यात कोणताही प्रवासी नसताना, बसमधील लाईट बंद असतानाही तरुणी आतमध्ये गेली. पाठोपाठ आरोपीही शिरला आणि दार लावून घेत, जीव घेण्याची धमकी देत हे पाशवी कृत्य केले. खरे तर हे स्थानक वर्दळीचे ठिकाण असून चोहीकडे सुरक्षा यंत्रणा आहे. सुरक्षारक्षकांची केबिनही आहेत. मात्र अशा ठिकाणी खातरजमा करून न घेता संबंधित तरुणीने अनोळखी व्यक्तीशी काही काळ संवाद साधला आणि बसमध्ये बसली. म्हणजेच इथे सुरक्षारक्षकांनी आपले काम चोख केले असते आणि संबंधित मुलीनेही अपरिचित व्यक्तीवर विश्वास न ठेवता संबंधित यंत्रणेकडे विचारपूस केली असती, तर कदाचित ती या दुर्घटनेतून वाचली असती असे म्हणावे लागेल. या निमित्ताने आगारात बंद पडलेल्या बसेसची तपासणी करता अनेक आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या. त्यात महिलांचे कपडे, दारुच्या बाटल्या, गुटख्याची पाकिटे, शर्ट, अंतर्वस्त्र आणि गर्भनिरोधके सापडल्यानंतर इथे रोज काय घडत असावे, हा प्रश्न समोर येतो. हे चित्र विदारक स्थिती समोर आणत असून त्यात एसटीचे कर्मचारीही सहभागी आहेत का, हा प्रश्न विचारला जात आहे. ही केवळ स्वारगेट बसस्थानकातील परिस्थिती नसून सार्वजनिक ठिकाणी जागोजागी बंद पडलेल्या बसेस वा अन्य वाहने बघायला मिळतात. गैरकृत्य करणारे त्यांचा अयोग्य कारणासाठी सर्रास वापर करताना दिसतात. मात्र यंत्रणा वा स्थानिक त्याकडे दुर्लक्ष करतात. स्वाभाविकच त्यांना रान मोकळे मिळते आणि अनेक दुर्दैवी जीव त्यात अडकतात. हे गांभीर्य आता तरी लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे जुन्या वाहनांची ताबडतोब विल्हेवाट लावण्याची गरजही समोर आली आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुरुषांची स्त्रीकडे बघण्याची मानसिकता बदलण्याची गरज तीव्रतेने जाणवतेच, खेरीज तरुणींनी अशा घटनांपासून वाचण्यासाठी काही काळजी घेणे गरजेचे वाटते. कारण अशा घटनांचा वाढता धसका वा भीतीतून होणारे मानसिक तसेच शारीरिक जखमांचे परिणामही खूप मोठे असतात. म्हणूनच मुलींनी आपल्या सुरक्षेच्या बाबतीत वेळीच जागरूक राहून काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जसे की, एकटीने बाहेर पडताना सार्वजनिक ठिकाणी नेहमी लोकांसोबत राहावे. बरोबर कोणी नसले तरी ते दर्शवून देऊ नये. परक्या माणसावर विश्वास ठेवणे, त्याला वैयक्तिक माहिती सांगणे, त्याच्याबरोबर मैत्रीपूर्ण वागणूक ठेवणे संकटाला आमंत्रण ठरू शकते. मुख्य म्हणजे प्रवेश करण्याआधी त्या ठिकाणाची सुरक्षा आणि सुरक्षेसाठीचे मापदंड तपासून पाहावेत. दुसरी बाब म्हणजे आपले रक्षण करण्यासाठी काही आत्मसुरक्षा तंत्र शिकणे महत्त्वाचे आहे. मार्शल आर्टस किंवा स्वयंविकसन अभ्यास ही सध्याच्या काळाची मुख्य गरज बनली आहे. यामुळे तुम्ही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देऊ शकता. पळून जाणे, मोठ्याने आवाज काढणे आणि आसपासच्या लोकांची मदत घेणे यातूनही तुम्ही स्वतःचे संरक्षण करू शकता. अशा घटना टाळण्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य ठरतो आहे. स्मार्टफोनमध्ये सुरक्षा वाढवण्यासाठी सध्या अनेक ॲप्स उपलब्ध आहेत. तेव्हा खात्रीशीर ॲप्स वापरून तपासणी करत राहणे आणि संकटाच्या वेळी संबंधित लोकांना त्वरित सूचित करणे हादेखील एक कामी येणारा उपाय आहे. यामध्ये लोकेशन इतर लोकांसोबत शेअर करणे किंवा एका क्लिकमध्ये मदतीसाठी कॉल करणे ही सुविधा असू शकते. प्रसंगावधान राखून, चातुर्याने त्याचा उपयोग करता येईल. आपल्यावर वाईट प्रसंगाला तोंड देण्याची वेळ येऊ शकते हे लक्षात घेत सुरक्षिततेसाठी शारीरिक आणि मानसिक तयारी महत्त्वाची आहे. तेव्हा आपले शरीर काय सांगते ते ऐकायला हवे. तुम्ही कुठेही असला तरी तिथली परिस्थिती, लोकांची मानसिकता आणि वातावरण कसे आहे यावर लक्ष ठेवणे आज अत्यावश्यक बनले आहे. कुठेही असुरक्षित वाटत असल्यास संबंधित ठिकाण त्वरित सोडून बाहेर पडणे योग्य ठरते. मुख्य म्हणजे कोणत्याही स्थितीमध्ये शंका किंवा भीती वाटत असल्यास त्वरित मदतीसाठी जोरात ओरडायची खबरदारी महिलांनी जरुर घ्यावी. एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत जायची वेळ आल्यास आणि त्याने चुकीचे वागणे सुरू केल्यास त्वरित विरोध करायला मुलींना शिकवायला हवे.

ताज्या दुर्घटनेमध्ये मुलीने घाबरून जात पुढचा प्रवास सुरू केला. मात्र अशा वेळी विश्वासातल्या मित्रांना किंवा कुटुंबातील सदस्यांना संपूर्ण घटनाक्रम तत्काळ सांगायला हवा. यामुळे मदत लवकर मिळते, खेरीज आरोपीला पकडण्यासाठी तत्काळ उपायोजना करता येतात. तेव्हा एकटे न राहता सुरक्षिततेसाठी कोणाची तरी सोबत घेणे आणि परिचितांना कळवणे गरजेचे ठरते. बलात्कार किंवा अत्याचाराच्या इतर घटनांमध्ये कायदेशीर अधिकारांची माहिती असणेही आवश्यक आहे. आपल्या हक्कांचा वापर कसा करावा, मदतीसाठी कसे आणि कोठे पोहोचावे आणि कायद्यानुसार त्याची प्रक्रिया काय आहे, याबद्दल प्रत्येक महिलेला माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला पोलिसांकडून, संस्थांकडून किंवा सामाजिक कार्यकर्त्यांकडून मार्गदर्शन मिळवता येईल. त्यासाठी आंतरराष्ट्रीय आणि देशी महिला सुरक्षा धोरणे, त्यातील कायदेशीर तरतुदी, संरक्षण कायदे आणि संरक्षणासाठी असणारे उपाय याबद्दल महिलांनी माहिती घेतली पाहिजे. महिलांच्या हक्कांची कायदेशीर संरचना सशक्त केल्यास अशी दुष्कृत्ये करणारे गुन्ह्याला धजावणार नाहीत. एकूणच मुलींनी आपल्या सुरक्षेसाठी सजग राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. खेरीज समाजातील सर्व घटकांनीही एकत्रितपणे महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणे आवश्यक आहे. हे साधले तर कदाचित या प्रश्नाची दाहकता कमी होऊ शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -