मेघना साने
डॉ. प्रकाश खांडगे यांच्या ‘लोकरंगनायिका’ या पुस्तकाचे प्रकाशन दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत नामदेव सभागृहात पद्मश्री मंजम्मा यांच्या उपस्थितीत होणार अशी बातमी दैनिक प्रहारमध्ये वाचली. माननीय डॉ. अरुणा ढेरे, कालनिर्णयचे जयराज साळगावकर, निवृत्त न्यायाधीश ह.भ.प. मदनमहाराज गोसावी, ह.भ.प. बाळासाहेब काशीद, विद्यापीठाचे ललित विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे अशा मान्यवरांची भाषणे ऐकायला मिळतील हे कळल्यावर आम्ही ड्राइव्ह करत पुण्याला पोहोचलो. बरोबर पाच वाजता सभागृहात पोहोचलो तेव्हा एकतारी, संबळ आणि दिमडी यांच्या गजरात पद्मश्री मंजम्मा यांचे स्वागत होत होते. स्वागतासाठी काढलेली भव्य रांगोळी पाहत अनेक पाहुणे उभे होते. मंजम्मा यांचे धिप्पाड व्यक्तिमत्त्व आणि चेहऱ्यावरील मार्दव व आत्मविश्वास पाहून त्यांनी किती काम केले असेल, स्वतःला कसे सिद्ध केले असेल याचा अंदाज येत होता. मंजम्मा यांच्या सोबत कार्यक्रम करणाऱ्या काही कलावतीही आल्या होत्या. सभागृहात लोककलेशी संबंधित बरीच मंडळी उपस्थित होती.
डॉ. प्रकाश खांडगे आणि शैला खांडगे या दांपत्याने गेली २५ वर्षे भारतातील निरनिराळ्या प्रांतांतील लोक कलावंतांना सन्मानाने व्यासपीठावर आणण्याचे काम कसे केले ते मी काही काळ त्या टीममध्ये निवेदिका म्हणून काम करताना पाहिलेच होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रम सुरू झाला. डॉ. मृण्मयी भजक यांचे गोड आवाजातील अभ्यासपूर्ण निवेदन सुरू झाले ‘महाराष्ट्र कला सांस्कृतिक मंच’च्या अध्यक्ष डॉ. सुखदा खांडगे व सचिव शैला खांडगे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.
डॉ. प्रकाश खांडगे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने १९९९ मध्ये षण्मुखानंद सभागृहात झालेला लोककलेचा उत्सव अभिनव होता. जत्रेत आणि गावाच्या उत्सवांमध्ये नृत्य करणाऱ्या लोककलावंतांना नागर रंगभूमीवर प्रथमच स्थान मिळाले होते. डॉ. प्रकाश खांडगे यांनी त्यासाठी अपार कष्ट केलेले होते आणि त्यांच्या पत्नी शैलाताई त्यांचा हातच बनल्या होत्या. त्यांची कन्या सुखदा जिने आता डॉक्टरेट मिळवलेली आहे, ती त्यावेळी लहान होती. पण लोककला म्हणजे काय हे समजून घेत मोठी होत होती. लावणी नर्तिकांचे कार्यक्रम आयोजित करणे सोपे नसते. जरा कुठे मनासारखे नाही झाले, तर भांडणे, शिव्या यांनाही तोंड द्यावे लागते. पण सर्वांचे कलाकार म्हणून आदराचे स्थान ठेवून कार्यक्रम नीट पार पडला. प्रमोद नवलकरांसारखी मंडळी प्रेक्षकांमध्ये तेव्हा उपस्थित होती. सुप्रसिद्ध निवेदक प्रदीप भिडे, नरेंद्र बेडेकर आणि मी नाट्यमय निवेदन करीत कार्यक्रम रंगवला होता. या कार्यक्रमात आता प्रसिद्धी पावलेल्या सुरेख पुणेकर आणि राजश्री नगरकर या प्रथमच मुंबईच्या थिएटरमध्ये सादरीकरण करीत होत्या. त्यांनी आपल्या कौशल्याने स्वतःला सिद्ध केले. त्यामुळे नंतर लगेचच गडकरी रंगायतन, शिवाजी मंदिर, पनवेल महोत्सव येथे लावणी महोत्सव रंगले. केवळ लावणी नर्तिकाच नाही, तर इतर लोककलावंतांनादेखील त्या महोत्सवात स्थान होते. लोककलेचा जागर तेव्हापासून प्रेक्षकांसाठी सुरू झाला. मात्र त्यापूर्वी कित्येक वर्षे डॉ. प्रकाश खांडगे, एक पत्रकार व संपादक असूनही लोककलेचा अभ्यास आणि संशोधन करीत होते. डॉ. गणेश चंदनशिवे आणि डॉ. मोनिका ठक्कर या मंडळींची त्यांना सतत साथ होती.
आज ‘लोकरंगनायिका’या पुस्तकाच्या प्रकाशनाचे वेळी ज्येष्ठ पत्रकार राही भिडे म्हणाल्या, प्रकाश खांडगे यांनी जे काम केले आहे ते खूप महत्त्वाचे आहे. लोककलावंतांवर अनेकांनी लिहिलं असेल पण खेड्या-पाड्यांतून, गावागावांतून त्यांना आणून नागर रंगभूमीच्या बरोबरीने त्यांना स्थान द्यायचं हे खूप मोठं काम आहे. शिवाय लोककलेवर संशोधनात्मक पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेतच. राजश्री नगरकर यांचे तर एवढे उन्नयन झाले आहे की, त्यांचे संपूर्ण घरच आता सुशिक्षित झाले आहे. मुलगा आणि सून दोघेही आयएएस आहेत. ‘पद्मगंधा प्रकाशन’च्या ‘लोकरंगनायिका’ या पुस्तकाचे मंजम्मा यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी प्रकाशक अभिषेक जाखडे उपस्थित होते. पुस्तकावर विवेचन करताना डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या, या पुस्तकात ज्या दशनायिकांचे शब्दचित्र डॉ. प्रकाश यांनी रेखाटले आहे त्यांचा झगडा कलेसाठी तर आहेच पण जगण्यासाठी सुद्धा आहे. हा झगडा त्यांनी सतत सुरू ठेवला आहे. त्यातून आपली वाट काढली आहे आणि यश संपादन केले आहे.
या पुस्तकात डॉ. प्रकाश खांडगे यांनी ज्या स्त्रियांचे चरित्र लिहिले आहे त्या बहुतेक सर्व आज पद्म किंवा संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त आहेत. पण सुरुवातीला बहुतेकांच्या वाट्याला उपेक्षाच आली. बहुतेकींचे कुटुंबाकडून किंवा ठेकेदारांकडून शोषण झाले. मात्र या सर्व परिस्थितीत त्यांनी कला सोडली नाही आणि यशाच्या टप्प्यावर पोहोचल्या. ‘लोकरंगनायिका’तील लिखाण कालनिर्णयच्या सांस्कृतिक दिवाळी अंकांमधून सुरुवात करून आज पुस्तक रूपाला पोहोचले आहे. लावणी नर्तिका राजश्री नगरकर यांनी लोककलावंतांसाठीच्या कार्याबद्दल ऋण व्यक्त केले.
प्रकाशन समारंभानंतर पद्मश्री मंजम्मा यांची डॉ. व्यंकटेश आणि डॉ. प्रवीण भोळे यांनी प्रकट मुलाखत घेतली. मंजम्मा यांना कानडीशिवाय दुसरी भाषा येत नसल्याने डॉ. व्यंकटेश त्यांना दुभाषाचेसुद्धा काम केले. मंजम्मा यांनी त्यांचा खडतर व हृदयद्रावक जीवन प्रवास उलगडून सांगितला. आत्महत्येच्या विचारांपासून स्वतःला परावृत्त करून त्यांनी कलेला इतके वाहून घेतले की, त्यांना कर्नाटकमध्ये अमाप प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळाली. राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविद यांच्याकडून पद्मश्री स्वीकारताना त्यांनी नकळतपणे प्रोटोकॉल झुगारून राष्ट्रपतींच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद दिला आणि यात कोणालाही वावगे वाटले नाही. हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक मोठाच विजय होता.
[email protected]