भालचंद्र कुबल
असं म्हणतात की, सुखं किंवा दुःखं आलं की ते भरभरून येतं, ढिगाने येतं, पोतं पोतं भरून तुमच्या दारी पडतं, तसं काहीसं या आठवड्याचं झालंय. १००व्या नाट्यसंमेलनाचे भरगच्च कार्यक्रम सुरू आहेत. मनसेने आयोजित केलेला “अभिजात” सोहळा सुरू आहे. रवींद्र नाट्यमंदिराचा आणि अर्थातच पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संकुलाचा नूतनीकरण सोहळा, असे लिहायला उद्युक्त करणारे इव्हेंट्स, ‘मी व्हर्सेस मी’ आणि ‘असेन मी नसेन मी’, ‘रणरागिणी ताराराणी’सारखी नव्याने प्रकाशित झालेली नाटके, अशी अनेक सुखं या आठवड्यात हात जोडून उभी आहेत. त्यात दोन दिवसांनी यशवंत नाट्य मंदिरात नाट्य संमेलनासाठी लेट एंट्री मारताच अजित भुरेला सामोरे जावे लागले आणि ‘अरे काय यार, अनेक थिएटरचे बंगाली भाषेतील ‘अक्षरिक’ आणि पाँडिचेरी येथील वेलीपडई थिएटर मूव्हमेंटचे तमिळ भाषेतील ‘नादापावाडई’ ही काय नाटकं होती, यु मिस द फीस्ट…!” असं “एंट्रीचा हिरमोड” नामक स्किट संपवून पुण्याच्या “आता तू मला खा…!” या दीर्घांकाकडे वळलो. अ.भा.म.ना.प.चे अध्यक्ष प्रशांत दामलेंनी ठरवूनच टाकलेय, “ईस बार ये इलाका मेरा है, पहले संमेलनसे ज्यादा ही दूंगा, नही तो माटुंगा”
(ही आपली उगाच, बोलबच्चनगिरी) त्यामुळे यशवंतचा माहोलच भरगच्च भासत होता. महत्त्वाचं हे देखील नमूद केलं पाहिजे की, वैजयंती आपटेंमुळे काही कार्यक्रमांचं फेसबुक लाईव्ह बघता येत होतं. हा तुटपुंजा वृत्तांत तुम्ही जेंव्हा वाचताय तेंव्हाही या कार्यक्रमांची रेलचेल संपलेली नाही. त्यामुळे वरील सर्व कार्यक्रमांचा धांडोळा एकाच लेखात घेतला की, मी “एडिटर्स प्रेशर” मधून सुटलो, असा हा सुटेबल विचार आहे, तर असो…! आंब्याला मोहोर आणि नाट्यसृष्टीला नाटक फुटण्याचा हा महिना मानला जातो. साधारणपणे दिवाळी नंतर येऊ घातलेली नाटके जानेवारी फेब्रुवारीत स्थिरावतात. मग मार्केटिंगसाठी पायंडा पडलेले सन्मान गौरव सोहळे पार पडले की, मगच नाटक पडते कारण तोवर निर्माता पार उसवलेला असतो. प्रेक्षक आणि नाटकामधला धागा केवळ मनोरंजनाची वीण घट्ट नसल्यामुळे तुटलेला असतो. मग तो निर्माता सरसकट आपल्या नाटक निवडीचे अपयश प्रेक्षकांवर फोडून मोकळा होतो. या वर्षी “बंद असलेली नाट्यगृहे” हे नवे कारण पडेल निर्मात्यांसाठी पुरेसे होते. ठाण्याचे गडकरी, परळचे पाडलेले दामोदर, नुतनीकरण सुरू असलेले प्रभादेवीचे रवींद्र अशी तीन महत्त्वाची थिएटर्स बंद असल्यावर निर्मात्यांनी जगावं की, मरावं असा यक्ष प्रश्न उभा ठाकला असतानाच, रवींद्रच्या उद्घाटनाची बातमी येऊन पोहोचली आणि नाट्यवर्तुळात आनंद की हो जाहला…! एक रवींद्र सुरू होणे म्हणजे नाट्य निर्मात्यांसाठी आशेची शंभर दालने उघडण्यासारखे आहे, असे म्हणतात. एकाच संकुलात नाट्य प्रयोगासाठी तीन नाट्यगृहे, तालमींसाठी अनेक दालने, नॅनो सभागृह, प्रदर्शन दालनं अशा अनेक सोयींनी युक्त असं संकुल पुनःश्च कार्यरत होणार म्हटल्यावर गहिवरून येत नसेल तो नाट्यनिर्माता कसला? तर २ मार्चला हा उद्घाटन सोहळा मंत्री महोदयांच्या हस्ते पार पडेल. त्याची यथायोग्य बातमी लावली जाईलच.
१०० व्या नाट्य संमेलनाच्या मुंबई विभागाच्या तुकड्याचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडले. ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे आणि मोहन आगाशे नाट्य परिषदेच्या कार्यकारीणी समवेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे म्हणाले की, ‘आज एवढ्या वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या प्रयत्नांमुळे मराठी भाषेव्यतिरिक्त एवढा मोठ्या नाट्य महोत्सवाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले हे खरंच कौतुकास्पद आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आपल्या ध्येयाच्या दिशने ज्या पद्धतीने एक एक पाऊल पुढे टाकते आहे, त्यासाठी त्यांचे मनापासून अभिनंदन केले पाहिजॆ. जग झपाट्याने बदलत चाललं आहे त्यासाठी नाटकाच्या माध्यमातून मराठीच्या बाहेर जाऊन बघण्याचा प्रयत्न तितक्या गांभीर्याने आजवर झाला नाही. वेगवेगळ्या भाषेच्या नाटकाच्या माध्यमातून दृष्टिकोन बदलण्याची सुरुवात करता येऊ शकते. त्यासाठी अशा नाट्य महोत्सवाची अत्यंत गरज होती, ही सुरुवात आहे. संघटनेत वेगवेगळ्या विचारधारेची माणसं एकत्र आली की, बदल घडायला सुरुवात होते.
हे बदल आज एवढ्या वर्षांनी प्रकर्षाने दिसू लागले आहेत. त्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित होणाऱ्या प्रत्येक उपक्रमाचं कौतुक झालं पाहिजे.” या संमेलन तुकड्यात सादर झालेल्या नाटकांचे निरीक्षण पुढे सविस्तर करणारच आहे, कारण दखल घ्यावी अशी नाटके या संमेलनाच्या निमित्ताने पहायला मिळाली. आजच्या नाटकांबाबत उहापोह करणारा परिसंवादही उत्तम रंगला. अद्वैत दादरकर आणि संदेश बेंद्रे विषयाचा अभ्यास करून आले होते. पुण्याच्या परिसंवादाचा अनुभव असूनही नीरज शिरवईकर प्रभावी ठरले नाहीत, पुढील परिसंवादात ते यशस्वी ठरतील अशी आशा बाळगायला हरकत नाही…!
या सर्व गदारोळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेला अभिजात सोहळा पुस्तक प्रदर्शन आणि कवी संमेलन एक सुप्पर हिट इव्हेंट ठरलाय. राज ठाकरे यांनी गोळा केलेले मान्यवर आणि त्यांना सादर करायला लावलेल्या मराठी कविता, ही संकल्पनाच मुळी दाद द्यायला लावणारी होती. यावरही विस्तृत लिहिण्यावाचून गत्यंतर नाही. तेंव्हा पुढील काही आठवडे घडून गेलेल्या या सोहळ्यांचे कवित्व माझ्या निरीक्षण लिखाणातून पाझरत राहील.