पाकिस्तानी नंबरवरून मुंबई पोलिसांना मेसेज
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्यानंतर आता मुंबईतील मंत्रालयात असलेल्या मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना आला आहे. हा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना व्हाट्सअँपवर पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका पाकिस्तानी नंबरवरून मुंबई वाहतूक पोलिसांना व्हाट्सअँपवर बुधवारी (दि. २६) दुपारी हा धमकीचा मेसेज आला होता. हा मेसेज आल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. धमकीचा मेसेज करणाऱ्या व्यक्तीने त्याचं नाव मालिक शहाबाज हुमायून राजा देव असं सांगितलं आहे. लवकरच या व्यक्तीला अटक केली जाईल असं पोलिसांनी सांगितले आहे.
Eknath Shinde : इडीची पिडा पाठी लागलेल्या अधिकाऱ्यावर उपमुख्यमंत्री संतापले!
उपमुख्यमंत्र्यांना बॉम्ब हल्ल्याची धमकी दिल्यानंतर काही दिवसांनी मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी आली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. लवकरच धमकीचा मेसेज पाठवणाऱ्याचा शोध घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. वारंवार येणाऱ्या या धमक्यांमुळे मुंबई पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. या धमकी प्रकरणात राज्य शासनाच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष आहे. राज्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा नीट व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.