Monday, May 12, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Mill Worker House Update : राज्य शासनाचे गिरणी कामगारांना मुंबईबाहेर पाठवण्याचे धोरण

Mill Worker House Update : राज्य शासनाचे गिरणी कामगारांना मुंबईबाहेर पाठवण्याचे धोरण

मुंबई : म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींनी आणि संक्रमण शिबिरांनी मराठी माणसाला जसे बेघर केले, तसे मुंबईतील बंद गिरण्यांनीही या मराठी माणसाला आश्रयाची जागाच ठेवली नाही. हे गिरणी कामगार आणि मुंबईकरांचे भूषण ठरलेले डबेवालेही आता मुंबईबाहेर फेकले गेलेत. दादर, भायखळा, लोअर परळ, वरळी, चिंचपोकळी, इत्यादी ठिकाणी कापड गिरण्या होत्या. या गिरण्या बंद झाल्यानंतर त्याच ठिकाणी गिरणी कामगारांना घरे द्यावीत, अशी मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे.



म्हाडाने विविध सोडतींमधून १३ हजार ४५३ गिरणी कामगारांना मुंबईत स्वान, अपोलो, एलफिन्स्टन, कोहिनूर, स्वदेशी, मुंबई, पिरामल, गोकुळदास, बॉम्बे डाईंग २७, २८ आणि श्रीनिवास या गिरण्यांच्या जागेवर घरे दिली आहेत; गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत जागा शिल्लक नसल्याचे १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. आजही हजारो गिरणी कामगार घरांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यासाठी मुंबईबाहेर शेलू येथे ३० हजार आणि वांगणी येथे ५१ हजार घरे बांधली जात आहेत. ही घरे साडे नऊ लाखांत दिली जात आहेत. त्यासाठी १६ हजार रुपये हप्ता फेडावा लागेल. घराचे भाडे मात्र ३ हजार रुपयेच येईल. ही गिरणी कामगारांची फसवणूक आहे. यामुळे लाखभर गिरणी कामगार मुंबईबाहेर फेकला जातोय, अशी भावना 'गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समिती'चे अध्यक्ष आनंद मोरे यांनी व्यक्त केली.

Comments
Add Comment