मुंबई : कंत्राटी बस चालकांमुळे एकीकडे अपघात वाढत असून बेस्टचे नाव बदनाम झाले असतानाच आज भायखळा येथे कंत्राटी बस चालकाने एका महिलेला धडक दिली त्यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
टाटा मोटर्स लिमिटेड या कंत्राटी कंपनीची बेस्ट बस ए १३४ या बस मार्गावर प्रबोधनकार ठाकरे उद्यान शिवडी बस स्थानक ते बॅकबे आगार दरम्यान धावत होती आज सकाळी ७ वा. ५५ मि. ही बस भायखळा दूरध्वनी केंद्र येथे आली असता या बसमधून अस्मा तय्यब बाली ( वय ८६ ) ही महिला बसमधून उतरली व लगेच तिने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच वेळेस बस चालकाने बस सुरू केली असताना बसचे डावी बाजू व बसच्या चाकाची धडक त्या महिलेस बसली व ती महिला खाली पडून तिच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली.
बस चालक व वाहकाने त्या महिलेला त्वरित जे जे रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तेथे तिला मृत घोषित केले. बस चालक व वाहकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे