कर्जत : पळसदरी ते खोपोली दरम्यानच्या रेल्वे स्थानकांवर ४९ सीसीटीव्ही कॅमेरे मार्च २०२५ पर्यंत बसविण्यात येणार असल्याचे रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया दिल्ली या कंपनीने सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांना लेखी स्वरूपात कळविले आहे. रेल्वे स्थानकांवर एखादी घटना घडली की सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज घेऊन पोलीस यंत्रणा त्याचा तपास करीत असते. मात्र कर्जत ते खोपोली दरम्यानच्या पळसदरी, केळवली, डोलवली, लौजी आणि खोपोली या स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने एखाद्या घटनेचा तपास करताना पोलिसांना अडचण येते. या बाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन पंकज ओसवाल यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली असता मध्य रेल्वे प्रशासनाने कर्जत ते पळसदरी दरम्यानच्या रेल्वे स्थानकांच्या सर्व्हे केला आहे आणि लवकरच पळसदरी रेल्वे स्थानकावर सात, केळवली रेल्वे स्थानकावर तीन, डोलवली रेल्वे स्थानकावर चार, लौजी रेल्वे स्थानकावर तीन आणि खोपोली रेल्वे स्थानकावर ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे सांगून कर्जत रेल्वे स्थानकावर ३८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचे लेखी स्वरूपात
कळविले आहे.
ओसवाल यांनी सदर कॅमेरे कधी बसविण्यात येणार आहेत, अशी विचारणा केली असता सदर काम हे रेल्वे ने रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीकडे दिले आहे व या बाबतीत आपण रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीकडे पाठपुरावा करा असे सूचित केले होते. त्यानुसार या ओसवाल यांनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीकडे विचारणा केली असता या कंपनीने, सदर कामांची अंमलबजावणीचे काम टप्याटप्याने सुरू आहे व अंमलबजावणीचे काम जून २०२३ मध्ये पूर्ण होईल व सदर रेल्वे स्थानकावर कॅमेऱ्याची सुविधा २०२३ जुलैपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता आहे असे ओसवाल यांना कळविले; परंतु ते काम पूर्ण न झाल्याने ओसवाल यांनी आपला पाठपुरावा सतत सुरूच ठेवला होता व आता सदर काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.