महापालिका आयुक्तांचे नवी मुंबईकरांना आवाहन
नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातील व्दितीय क्रमांकाचे मानांकित शहर म्हणून नवी मुंबई नावाजली जात असताना सर्वेक्षणात सातत्याने लाभत असलेल्या उच्च मानांकनामुळे नवी मुंबईसह देशातील ३ शहरांचा ‘सुपर स्वच्छ लीग’ हा विशेष गट यावर्षी जाहीर करण्यात आलेला आहे. नवी मुंबईचा सुपर स्वच्छ लीगमध्ये समावेश होणे ही सर्व नागरिकांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असली तरी स्वच्छतेच्या दृष्टीने आपली जबाबदारी अधिक वाढविणारी गोष्ट आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या दृष्टीने नागरिकांनी अधिक जागरूक होऊन कृतीशील सहभाग घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करतानाही नवी मुंबईच्या मानांकनाचे श्रेय नागरिकांना देतानाच आपल्या वाढत्या जबाबदारीचे भानही आयुक्तांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे विभागवार नेमलेल्या पालक अधिकारी यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नियमित क्षेत्रीय भेटी वाढवून स्वच्छतेकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार संबंधित सर्वच अधिकारी, कर्मचारी आपल्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत.
स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे कचऱ्याचे निर्मितीच्या ठिकाणीच ओला, सुका व घरगुती घातक अशा तीन प्रकारे कचरा वर्गीकरण केले जाणे. यामध्ये नागरिकांनी अधिक सतर्क होऊन आपल्या घरातील तसेच कामाच्या – व्यवसायाच्या ठिकाणी निर्माण होणारा कचरा वेगवेगळा ठेवला जाईल व महापालिकेच्या कचरा गाड्यांमध्येही वेगवेगळा दिला जाईल याकडे अधिक काटेकोर व बारकाईने लक्ष द्यावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
ग्रिव्हेन्स रिड्रेसल प्रणालीचा प्रभावी वापर करावा
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सुजाण नागरिकांनी कचरा वर्गीकरण हा आपला प्राधान्यक्रम समजून त्यादृष्टीने अधिक सक्रिय होत कार्यवाही करावी तसेच घराप्रमाणे आपला परिसर स्वच्छ राहील याकडे काटेकोर लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये प्रत्यक्ष सहभागी होत नागरिकांचा प्रतिसाद स्वत:, तर नोंदवावाच व आपल्या संपर्कातील इतरांनाही अभिप्राय नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करावे तसेच शहर स्वच्छतेत आपले योगदान देत ग्रिव्हेन्स रिड्रेसल सिस्टीमचा प्रभावी वापर करावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
सिटीझन फिडबॅकला सुरुवात
स्वच्छ सर्वेक्षण २०२४ ची प्रक्रिया सुरू झाली असून यामधील एक महत्वाचा भाग असलेल्या ‘नागरिकांचा प्रतिसाद’ अर्थात ‘सिटीझन फिडबॅक’ नोंदविण्यास स्वच्छ भारत मिशनमार्फत सुरुवात झाली आहे. याकरिता https://sbmurban.org/feedback या लिंकवर क्लिक करून वेबसाईटवर नागरिकांनी शहर स्वच्छतेविषयीचा आपला अभिप्राय नोंदवायचा आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाने आपल्या मोबाईलवरून नवी मुंबई शहराच्या देशातील सर्वोत्तम मानांकनासाठी सर्वेक्षणात विचारल्या जाणाऱ्या १० प्रश्नांची सर्वोत्तम उत्तरे देऊन आपल्या शहराचे मानांकन उंचवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. याकरिता पालिकेच्या वतीने विविध माध्यमांचा वापर करून प्रतिसाद नोंदविण्यासाठी नागरिकांपर्यंत वेबसाईटची लिंक तसेच क्यूआर कोड पोहोचविण्यात येत आहे. नवी मुंबईकराने सामाजिक जबाबदारी म्हणून स्वत: १० प्रश्नांची सर्वोत्तम उत्तरे नोंदवावीत.