नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीच्या सुरक्षा व्यवस्थेबोबत समन्वय बैठक आज, शुक्रवारी पार पडली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता या बैठकीला उपस्थित होत्या. या बैठकीत कायदा सुव्यवस्थेसह रस्त्यांच्या समस्या आणि इतरही मुद्द्यांवर चर्चा झाली.
बैठकीनंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांमध्ये समन्वयाची आवश्यकता असलेल्या विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली. ज्याप्रमाणे इतर राज्यांमध्ये डबल इंजिन सरकार काम करत आहे, त्याचप्रमाणे दिल्लीतही डबल इंजिन सरकारचा एक वेगळा चेहरा दिसेल, सर्व समस्या समन्वयाने सोडवल्या जातील. दिल्लीतील लोकांना 100 टक्के सुरक्षा पुरवली जाईल. अशा समन्वय बैठका मासिक बैठकांच्या स्वरूपात असतील आणि आम्ही दिल्लीला चांगल्या सुविधा देऊ, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आम आदमी पक्षावर टीका करताना गुप्ता म्हणाल्या की, जेव्हा जेव्हा केंद्र सरकारने दिल्लीला मोठ्या समस्या निर्माण करणाऱ्या छोट्या मुद्द्यांवर तपशील मागितले तेव्हा मागील राज्य सरकारने ते देण्यासाठी कधीही सहकार्य केले नाही. तर बैठकीत चर्चेत आलेल्या विषयांची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाल्या की, शांतता समित्या, पोलिस स्टेशन पातळीवर जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना यावर चर्चा झाली. महिलांच्या सुरक्षेवरही चर्चा झाली. आम्ही लवकरच यावर सविस्तर धोरणे बनवण्यावर काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली.