‘मराठी’ भाषा ही आपली जननी आहे. या भाषेला समृद्ध इतिहास व परंपरा लाभलेली आहे. याच भाषेतून आपण आपल्या भावना, विचार प्रभावीपणे व्यक्त करीत आहोत आणि म्हणूनच काळाच्या ओघात भाषेच्या स्वरूपात कधीही बदल न होणारी, अलौकिक सौंदर्य लाभलेली कुलीन, सुसंस्कृत, उच्च, सभ्य व चिरकाल टिकणारी भाषा म्हणून आपण अभिजात भाषेला म्हणजेच पर्यायाने ‘मराठी’ भाषेला मनापासून मानतो. मागील महिन्यात केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात भाषा’ हा दर्जा प्रदान केलाय, याचा मनस्वी आनंद आहे. पण मी मराठी भाषेची अभ्यासक असल्याने माझी आई सुंदर आहे, अभिजात आहे, असे मला मनापासून वाटत असल्याने मी लिहिलेली व माझे पती आतिश सोसे यांनी संपादित केलेली ‘अभिजात मराठी’ व ‘माय मराठी’ या शीर्षकांची पाठ्यपुस्तके सीबीएसई व आयसीएई शाळांमधून पूर्व प्राथमिक ते आठव्या इयत्तेपर्यंत मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्रभर शिकविली जात आहेत, त्याचा शासनाद्वारे, अभ्यासकांद्वारे गौरव केला जातोय आणि आज आमच्या तीन दशकांहूनही अधिक मराठी भाषिक लेखन व कार्याला यानिमित्ताने सन्मानच लाभल्याने अत्यानंद झाला आहे, अशी भावना मनाला फार समाधान देत आहे.
आपले राज्य महाराष्ट्र. आपल्या राज्याची मातृभाषा, राजभाषा ही मराठी. भाषेला आपण आपली आई म्हणतो. त्या अर्थाने आपली ‘मराठी भाषा’ आता ३ ऑक्टोबर २०२४ पासून ‘अभिजात भाषा’ म्हणून गौरविली गेली आहे.अभिजात भाषा म्हणजे चिरकाल टिकणारी व सौंदर्यप्रधान असलेली सुसंस्कृत भाषा होय. असे म्हटले जाते की, इ. स. पू. २०७ मध्ये ब्राम्ही लिपी आणि मराठी भाषेतील शिलालेख सापडला. इ. स. पू. तीनशे वर्षांपूर्वी मराठी भाषा बोलली जात होती. मराठी भाषेत काळानुरूप बदल होत गेले. आद्यकाल, यादवकाल, बहामनीकाल, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ, इंग्रजांचा काळ आणि पेशवे काळ या दरम्यान मराठी भाषेत वृद्धी झाली.
सर्वप्रथम सातवाहन राजांनी मराठी भाषेचा वापर व्यवहार, प्रशासनात केल्याचा दाखला मिळतो. त्यानंतर यादवांच्या काळात मराठी संस्कृती व भाषा भरभराटीस आली. इ .स. ११८८ मध्ये आद्यकवी मुकुंदराज यांनी ‘विवेकसिंधू’ तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी इ. स. ११९० मध्ये ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ लिहून मराठी भाषेला राजाश्रय मिळवून दिला. इ. स. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्वतंत्ररीत्या निर्मिती होऊन मराठी राजभाषा घोषित करण्यात आले. मुकुंदराज, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, रामदास, श्रीधर, मुक्तेश्वर, मोरोपंत यांच्यासह अनेक कवींना मराठी भाषेचे आद्य कवी मानले जाते.
आता ही भाषा जगभरात बाहात्तर देशांमध्ये व भारतातील छत्तीस राज्यात बोलली जाते. अधिकृत भाषांमध्ये मराठी भाषेला पंधरावा क्रमांक मिळाला. सुमारे अकरा कोटींहूनही अधिक लोक मराठी भाषा बोलतात. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. पण त्यासाठी केंद्र सरकारचे काही निकष ठरलेले होते. जसे-भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे १५०० ते २००० वर्षं जुना हवा, प्राचीन साहित्य हवे, जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटते, दुसऱ्या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी, ‘अभिजात’ भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी, असे प्रारूप ठरलेले असल्याने त्यानुसार मराठी भाषा ही अभिजातच आहे, यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून एक अभ्यासपूर्ण अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केला होता. प्रारंभी जेव्हा ही भाषा बोलली गेली, तेव्हा महारट्ठी-महरट्ठी-मऱ्हाटी-मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला, असं या अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्रीय भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्षं जुनं असल्याचे पुरावे असल्याचेही या अहवालात म्हटलं आहे.
त्यानुसार ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जाहीर करून ‘मराठी भाषेला’ गौरव मिळवून दिला. भारत सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, पाली, प्राकृत, उडिया आणि आसामी अशा अकरा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यामुळे आता या भाषांसाठी काही संस्था नव्याने उभारल्या जातील. तसेच या भाषांमधल्या प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक तरतूदही केली जाईल. मराठी भाषेसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये भरीव अनुदान स्वरूपात दिले जाईल. त्यामुळे मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे, भारतातील सर्व चारशे पन्नास विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे, प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे, महाराष्ट्रातील सर्व बारा हजार ग्रंथालयांना सशक्त करणे, मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे अगदी सुलभ होईल. त्या अर्थाने मराठी भाषेला लाभलेला हा अभिजात भाषेचा अलंकार निश्चितच गौरवणीय असाच आहे.
दि. २७ फेब्रुवारी हा ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ आहे. कविवर्य कुसुमाग्रज एक श्रेष्ठ आधुनिक कवी, कथाकार, समीक्षक, कादंबरीकार व नाटककार म्हणून कुसुमाग्रज प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर हे असून त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने लेखन केले आहे. त्यांची जन्मतारीख २७ फेब्रुवारी १९१२ ही असून त्यांचे जन्मस्थळ पुणे आहे. त्यांचा मृत्यू १० मार्च १९९९ रोजी झाला.जीवनलहरी, विशाखा, किनारा, कौंतेय, नटसम्राट ही त्यांची वाचकप्रिय पुस्तके आहेत.महाराष्ट्राचेच नव्हे तर जगभरातील मराठी रसिक आणि वाचकांचे अत्यंत आवडते लेखक, कवी म्हणून कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. त्यांचे साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातील मौलिक योगदान, ‘मराठी भाषा’ ही ज्ञानभाषा व्हावी, यासाठी त्यांनी घेतलेले अविरत परिश्रम, ‘ज्ञानपीठ’ या सर्वोच्च पुरस्काराने त्यांचा झालेला सन्मान इत्यादी या सर्व गोष्टींचा बहुमान ‘माय मराठी’ भाषेचा गौरव आणि कुसुमाग्रजांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन म्हणून महाराष्ट्र शासनाने दि. २१ जानेवारी २०१३ रोजी शासन निर्णय काढून दि. २७ फेब्रुवारी (कविवर्य कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा अध्यादेश काढला. त्या दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात हा दिवस अतिशय उत्साहात व आनंदात साजरा करतात. निश्चितच या वर्षातला हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळाल्याने संस्मरणीय राहील, ही भावना मनाला आनंद देणारी आहे.
सर्वांना ‘मराठी राजभाषा गौरव दिना’च्या मनापासून शुभेच्छा…!
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…