पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेचा आगामी वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प राजकीय हस्तक्षेपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले अर्थसंकल्प सादर करताना त्यात पुणेकरांसाठी काय नवे देणार? यात कोणत्या कामाला प्राधान्य असणार याची उत्सुकता आहे. याचा उलगडा ४ मार्च रोजी होणार असून, आयुक्त या दिवशी स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
पुणे महापालिकेवर प्रशासक असल्याने आयुक्तांकडून मांडला जाणारा अर्थसंकल्प अंतिम केला जातो. प्रशासक काळात सादर केला जाणारा हा तिसरा अर्थसंकल्प असणार आहे. आयुक्त भोसले यांनी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी विधान भवनात बैठक घेतल्याने विरोधकांकडून त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यातच चंद्रकांत पाटील यांनीही भाजपच्या माजी नगरसेवकांना त्यांना आवश्यक निधी मिळेल असे आश्वासन दिले आहे.
त्यामुळे आयुक्त भाजपच्या सोईचा अर्थसंकल्प तयार करत असल्याचा आरोप केला. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या अर्थसंकल्पात कोणत्या घटकांवर भर असणार आहे?, काय नवे प्रकल्प पुण्याला देणार? की राजकीय प्रभाव असलेला अर्थसंकल्प सादर करणार याकडे लक्ष लागले आहे. ४ मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता आयुक्त स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर करतील. तेथेच लगेच मुख्यसभेची मान्यता ही दिली जाणार आहे. यासंदर्भात नगरसचिव विभागास आयुक्तांनी पत्र दिले आहे.