हिरकणी गीतांजली वाणी
माय आमची मराठी
हिरे मोत्याचे अक्षर
होई जुळवणी त्याची
तिला शोभे शब्दसर…
माय मराठीवर लिहिलेल्या कवितेच्या माझ्या या ओळी मला खूप आवडतात. अलीकडेच अथक प्रयत्नांनी मराठी भाषेला अभिजात मराठी असा उच्च दर्जा प्राप्त झाला आहे. माणसाची ओळख होण्यास एक महत्त्वाचा गुण म्हणजे त्याचे उत्कष्ट संभाषण किंवा संवाद साधणे. जेव्हा हा संवाद आपल्या मातृभाषेतून आपण साधतो तेव्हा त्याची गोडी काही वेगळाच आनंद देऊन जाते. भारत हा वैविध्यपूर्ण संस्कृतीने नटलेला, भिन्न जाती, भिन्न भाषा, पेहराव, भिन्न रहाणी, खानपान असे विविधतेतून एकता जपणारा देश आहे. त्यात महाराष्ट्राची खरी ओळख ही मराठी भाषेने होते. आपल्याला मराठी माणसं असं संबोधले जाते. म्हणजेच आपल्या भाषेवरून आपली ओळख होते. मराठी ही आपली मातृभाषा आहे. मराठी माणसांनाच ती अजून पुरेशी समजली नाही. कारण प्रत्येक प्रांतानुसार तिचा लहेजा बदलतो. उदाहरण द्यायचं झालंच तर मुंबईकर बोलतात ती मिक्स मराठी असते असं बरेच जण म्हणतात, म्हणजे मुंबईकरांची मराठी ही अस्सल मराठी नसते थोडी हिंदी आणि थोडी मराठी असे एक मिक्सचर संवादातून जाणवते. त्याचे कारण मुंबई महानगरीत भारताच्या कानाकोपऱ्यांतून आलेली जनता मराठीला आपलंस करून संवाद साधण्याचा प्रयत्न करते. त्यामुळेच ती मिक्स असल्यासारखे वाटते. आणखी महत्त्वाची बाब म्हणजे इंग्रज भारत सोडून गेले पण त्यांची इंग्रजी खूप अत्यावश्यक आहे हे भारतीयांच्या गळी उतरवून गेले. त्यामुळे अलीकडे अगदी रोजच्या संभाषणात देखील आपण स्वतःसुद्धा पूर्ण शुद्ध मराठी बोलत नाहीत. स्वतः स्वतःचे एकदा निरीक्षण करा… आपण संभाषण करताना कितीतरी इंग्रजी शब्द आपल्या बोलण्यात येतात. असे का असा प्रश्न जर कुणाला पडत असेल तर त्यांनी मराठीची नावाजलेली साहित्यिक संपदा अभ्यासावी. त्यावेळी समजेल की आपण मराठीला फार हलक्यात घेतलंय… मराठी दिसते तशी बापडी नाही बरं का!! शिकायला गेलात तर अभ्यास करताना दमछाक होईल एवढं व्याकरण, वर्णमाला कठीण आहे. तरीही ती वैभवसंपन्न आहे. स्वतःचच उदाहरण इथे देईन मी… ग्रंथालय आणि माहिती शास्त्रात मी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे… बापरे केवढं हे लांबलचक पहिल्यांदाच जाणवलं. कारण मराठीत कधी उच्चारलेच नाही. इंग्रजीमध्ये लायब्ररी सायन्स किंवा LIS हे म्हणायला आणि लक्षात ठेवायला सोप्प हे डोक्यात फिट्ट झालय. पण खरंच आपली मराठी ज्ञानाने ओतप्रोत समृद्ध असली तरीही तांत्रिकदृष्ट्या शिकणे अवघड आहे कारण ती मराठी आहे.भिन्न प्रांतात तिचा लहेजा वेगळा पाहायला मिळतो जसे की, जळगाव किंवा उत्तर महाराष्ट्रातील मराठी, कोकणातील मराठी, विदर्भातील मराठी… ज्या त्या प्रांतानुसार तिचे स्वरूप थोड्याफार प्रमाणात बदलते पण ओठांवर सहज रेंगाळणारी मराठी भाषा मराठी माणसाचा अभिमान आहे, महाराष्ट्राची शान आहे.
थोर संतांनी जसे की, ज्ञानेश्वर, मुक्ताई, एकनाथ, तुकाराम, जनाबाई, कवी कुसुमाग्रज – वि. वा. शिरवडकरांनी, बहिणाबाई सारख्या अशिक्षित कवयित्रीने, पू. ल. देशपांडे सारख्या विनोदविराने, विंदा करंदीकरांनी, व. पू. काळेनी, मंगेश पाडगावकरांनी, वसंत कानेटकरांनी, शांता बाई शेळकेंनी आणि या सर्वांसारख्या अनेक दिग्गज साहित्यिक मंडळींनी त्यांच्या लेखणीतून वैविध्यपूर्ण दर्जेदार साहित्याची निर्मिती करून तिचे अस्तित्व टिकविण्याचा, तिची अस्मिता राखण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे आणि त्यांच्या प्रेरणेतून आजही कित्येक नवोदित लेखक, कवी निर्माण होत आहेत. मराठीचा कुठलाही लेखन प्रकार असो मग ते म्हणी, वाक्प्रचार, चारोळी, आठोळी, गीत, गझल, अभंग, भारूड, पोवाडा, लावणी, नाट्यपद अशा अनेक साहित्यांतून उठून दिसणारी, मराठी माणसाची कलागुणातून प्रतिमा उजळ करणारी मराठी ही मनामनावर अधिराज्य करते. ज्यांची बोलीभाषा मराठी नाही त्यांना सुद्धा तिचा मोह आवरत नाही. अलीकडे सोशल मीडियाचे वाढते प्रस्त आहे. तिथे काही सिने कलाकार ज्यांना मराठी येत नाही तरी त्याचे उठावदार उच्चार उच्चारून लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न करताना आपण बघतो जसे की राम राम पाहुणं, आता माझी सटकली, च्या मायला, कसं काय मंडळी… हस्ताय ना… टेलिव्हिजनवरील विविध मालिकातील प्रसिद्ध संवाद त्याचे अनुकरण करून मनोरंजन करणारी मंडळी देखील बरीच बघायला मिळते.
मातृभाषेचा लळा माणसातील माणूसपण जिवंत ठेवतो असे मला वाटते. शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्याचा अभिमान असणारी मराठी युगानुयुगे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवाहित होते आणि सर्वांना आपलंस करून घेते. आधुनिक युगात तिचा वापर, तिचे अस्तित्व राखण्यासाठी आपल्याला सर्व मिळून प्रयत्न करावा लागेल आणि मग फक्त वर्षातला एक दिवस २७ फेब्रुवारी तिचा गौरव दिन न राहता नित्य दैनंदिनी तिचा गौरव थाटामाटात होत राहील. तिचा हा अमृत कलश सदैव मातृभाषा प्रेमानी ओथंबलेला राहील.
कडे, कपारी किल्ल्यात
माय माझी गाजणारी
नाळ नात्याची जोडते
डोह अमृत होणारी.